mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.२१ मार्च २०२५   

अखेर ‘ते’ सापडले
दहा गुन्हे उघडकीस

सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी चेन स्नॅचिंग यासारखे प्रकार अवलंबणाऱ्या उत्तम राजाराम बारड ( वय ३१ रा. धामोड ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) व अजिंक्य सयाजी केसरकर (वय ३२ रा. मत्तिवडे ता. चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सदर कारवाई केली आहे.

      दोघेही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून सुमारे १५६ ग्रॅम सोन्याचे दागिने १६८ ग्रॅम चांदीच्या वस्तू,चोरीची मोटरसायकल, गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा ९ लाख ३१ हजार ३८६ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

      घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, जनावर चोरी, चेन स्नॅचिंग अशा विविध गुणन्ह्यामध्ये त्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे ‌

     उत्तूर – गारगोटी मार्गावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार १६ फेब्रुवारी रोजी झाला होता.त्या गुन्ह्यामध्येही या दोघांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. ‌

आजऱ्यातून मोटरसायकल लांबवली

         आजरा – मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा नगरपंचायतीसमोर उभा केलेली नवीज बशीर खेडेकर ( रा.आमराई गल्ली, आजरा) यांच्या मालकीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवारी दुपारच्या दरम्यान लांबवली.

       याबाबतची वर्दी खेडेकर यांनी पोलीसांत दिली असून आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जखमी सांबराला वन विभागाकडून जीवदान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोरीवडे ता. आजरा येथे सचिन कुंभार यांच्या शेततळ्यात पडून जखमी झालेल्या सांबराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार केले. दिवसभर त्याला देखरेखीखाली ठेवून गुरुवारी सायंकाळी वन अधिवासात सोडण्यात आले.

      यावेळी वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

इटेतील आगीत मेसकाठी, काजू झाडांचे नुकसान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     इटे (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत मेसकाठी (बांबू), काजू, आंबा, फणस, जांभूळ यांची झाडे भक्ष्यस्थानी पडली. शार्ट सर्किट मुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. आज दुपारी तीनच्या सुमाराला आग लागली.

      इटे गावाजवळ रामचंद्र लक्ष्मण पाटील, बाबूराव लक्ष्मण पाटील, रामचंद्र महादेव पाटील, बाळू महादेव पाटील, नामदेव भैरु फगरे, कृष्णा सटु पाटील, पांडुरंग भरमाना पाटील, बाळु पोवार या शेतकऱ्यांची जमिन आहे. त्यांच्या शेतात आज दुपारी तीनच्या सुमाराला अचानक आग लागली. उन्हाच्या तीव्र झळा व वाळलेला पालापाचोळा यामुळे आग पसरत गेली. आगीत सुमारे पाच एकरातील मेसकाठी काजू, आंबा, फणस, जांभूळ ही झाडे जळाली. आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात शेतकऱ्यांना यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

आजरा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या दर्जाची होणार चौकशी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा नगरपंचायतीच्या वतीने शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमुना दर्जा पाणी (Urgent Sample Quality Check) करणे व इतर चालू असलेल्या कामाबाबत चौकशीचे आदेश भुदरगड-आजराचे प्रांताधिकारी हरीश सूळ यांनी आजरा नगरपंचायतीला दिले आहेत.

      आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा नळपाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिले होते. याची दखल घेत प्रांताधिकारी सूळ यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आदेश देत आजरा शहर अंतर्गत पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमूना दर्जा तपासणी (Urgent Sample Quality Check) करावी व इतर चालू असलेल्या कामाबाबत चौकशी करुन आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीला आपल्या स्तरावर कळवावे व कार्यवाहीचा अहवाल प्रांत कार्यालयाला सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.

चौकशीचा ससेमीरा सुरू…

      आजऱ्याची नवीन नळ पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या योजनेतील अनेक बाबींबद्दल वारंवार चौकशी करूनही माहिती मिळत नसल्याने अखेर वरिष्ठांकडे याबाबत दाद मागण्यात आली होती. या योजनेच्या दर्जा तपासणीचे आदेश झाले आहेत. योजनेतील बऱ्याच गोष्टी लवकरच बाहेर पडतील. असे या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितले.

उत्तुरच्या लक्ष्मीदेवी मूर्तीचे विधिवत विसर्जन

          उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तूरची महालक्ष्मी यात्रा १६ मे रोजी होणार आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे जीर्णोद्धार करावयाचे असल्याने जुन्या लक्ष्मी मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

      सकाळी लक्ष्मी यात्रा कमिटी व महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटी समिती यांच्या उपस्थितीत जिर्णोद्धार समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश तौकरी व मीनाक्षी तौकरी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई ,कल्लाप्पा नाईक, सुधाकर सावंत, सतीश सुतार, मुकुंद पाटील व गुलाबचंद सैनी यांच्या हस्ते विविध होम व उत्तरांग पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, महेश करंबळी, संजय उत्तूरकर, गौरव धुमे, सर्व मानकरी भाविक व पुजारी यांच्या उपस्थितीत मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी वैशाली आपटे, वनिता आपटे, गंगाधर हराळे, आशा हराळे, लक्ष्मी मंदिराचे पुजारी, भैरु कुंभार , पुंडलिक पाटील , संदेश रायकर, संजय धुरे,गणपत यमगेकर, यात्रा कमिटी सदस्य, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मलिग्रे येथे जिल्हा स्तरीय कमिटीचे उत्साही स्वागत

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे ता. आजरा या गावाची आर.आर. पाटील (आबा) सुंदर गाव योजना अंतर्गत ( स्मार्ट ग्राम) तालूका स्तरीय स्पर्धेसाठी मुल्यमापन करणे करीता, पन्हाळा तालूका पंचायत समिती, गटविकास अधिकारी श्रीमती सोनाली माडकर विस्तार अधिकारी भोसले व आर. एम तळपे याच्या समितीने पहाणी करून मुल्यमापन केले. या समितीचे गावच्या सीमेवर स्वागत केले. महिला लेझीम पथकाने आपली कला सादर केली. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा जोतीबा फुले विद्या मंदिर, गावातील सर्व मंदिरे, वाचनालय, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सांडपाण्याचे व गटार स्वच्छता, पाणंद रस्ता, ग्रामपंचायत कामकाजचे मुल्यमापन केले. यावेळी माजी सरपंच समिर पारदे यांनी प्रास्ताविकात गावातील विविध उपक्रम व संस्था संघटनांची माहिती दिली.

     सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करणेत आले. ग्रामपंचायत अधिकारी धनाजी पाटील यांनी गावातील विविध उपक्रम व फोटोग्राफी त्या अनुषंगाने कागदपत्र कमिटीला सादर केली. यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती सोनाली माडकर यांनी लोकांनी केलेले उत्साही स्वागत व उपक्रमांची नोंद घेत, ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी पंचायत समिती आजरा ग्रामविस्तार अधिकारी पि. टी. कुंभार, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा तर्डेकर, शोभा जाधव, कल्पना बुगडे, रेश्मा बुगडे, राजू नावलगी, सचिन सावंत, पोलिस पाटील मोहन सावंत यांचे सह मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते आभार उपसरपंच चाळू केंगारे यांनी मानले.

मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजरा ह्या आजरा तालुक्यातील नोंदणीकृत डॉक्टरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन “ EUPHORIA 2025 ” उत्साहात पार पडले .

      आजरा तालुक्यातील डॉक्टर्स आणि लहान मुला- मुलींनी गाणी, नृत्य आणि विविध कलाविष्कार सादर केले . डॉ चंद्रशेखर देसाई , डॉ रोहित देसाई , डॉ दिशा राणे – देसाई आणि डॉ सुष्मा देसाई हे स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      डॉ. दिपक सातोस्कर , डॉ. अंजनी देशपांडे , डॉ. प्रवीण निंबाळकर आणि डॉ. दिपक हरमळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले .

      डॉ. रोहित देसाई यांनी ‘उच्च रक्तदाब’ आणि डॉ. दिशा देसाई यांनी ‘विविध नेत्रविकार आणि त्यावरील उपाय ‘ ह्या विषयांवर सर्व डॉक्टर्सना मार्गदर्शन केले .

       वार्षिक स्नेहसंमेलन आणि कौटुंबिक स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रामुख्याने डॉ.अनिल देशपांडे , डॉ. गौरी भोसले , डॉ. अंजनी देशपांडे , डॉ. सुरजीत पांडव , डॉ‌. रोहन जाधव आणि मेडिकल असोसिएशन मधील सर्वच सदस्यांनी योगदान दिले .डॉ.भरत मोहिते आणि डॉ‌.गौरी भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

      मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा चे अध्यक्ष डॉ.प्रवीण निंबाळकर यांनी आभार मानले .

निधन वार्ता
इंदूबाई सावंत

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली येथील इंदूबाई धनाजी सावंत (वय ७० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पती, मुलगा,तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. वारकरी संप्रदायाचे धनाजी सावंत यांच्या त्या पत्नी होत.

 

संबंधित पोस्ट

mrityunjay mahanews

आजरा कारखाना निवडणूक अपडेट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!