
पाऊस वाढला
प्रशासन ॲलर्ट मोडवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून हिरण्यकेशी व चित्रा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊ लागल्याने प्रशासन ॲलर्ट मोडवर गेले आहे. साळगाव बंधाऱ्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. प्रशासन एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आजरा ते चंदगड रस्त्यावर कासारकांडगाव -जेऊर या गावाच्या मध्ये रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड व झाडे-झुडपे घसरून रस्त्यावर आल्याने काही कालावधी करता हा रस्ता वाहतुकीकरता बंद झाला होता.स्थानिक प्रशासन व वन विभाग मार्फत सदर दगड व झाडे-झुडपे बाजूला करून रस्ता खुला करण्यात आलेला आहे.वाहतूक सुरळीत सुरू आहे.
या परिसरातील स्थानिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आले आहेत. दिवसभर पावसाचे प्रमाण थोडेफार कमी असले तरीही रात्रीच्या वेळी मात्र जोरदार पाऊस होत आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस समाधानकारक असून भातरोप लावण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

साथीच्या रोगाबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचे काम सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये डेंग्यू टायफाईड चे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य विभाग दक्ष झाला असून घरोघरी भेटी देऊन आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी माहिती घेऊन साथीच्या रोगांपासून बचावण्यासाठी आवश्यकता दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर. जे. गुरव,
आरोग्य सहायक जे .एच .साबखान
आरोग्य निरीक्षक अतुल पथरवट,आरोग्य सेवक रोहित शेंडे,आशा सेविका यांच्या पुढाकाराने सदर मोहीम राबवली जात आहे.
विशेषता डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत.

चिमुकल्यांची आषाढी एकादशी (व्यंकटराव प्राथमिक शाळा)

निधन वार्ता
दाजी पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाजन गल्ली,आजरा येथील दाजी तुकाराम पाटील ( वय ७७ वर्षे) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून ,नातू असा परिवार आहे.

पाऊस पाणी

आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री मध्यम प्रकल्पामध्ये ७९.५३ % (१५०० दशलक्ष घनफूट )इतका पाणीसाठा झाला असून आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये ८९% (११०६ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा झाला आहे. उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये ५६.८०% (१९०.५३६) दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.


