शनिवार दि.२२ मार्च २०२५


इमारतीवरून पडून कारागिराचा मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
फॅब्रिकेशन कामाकरिता इमारतीवर चढलेल्या शिवाजी विष्णू माडभगत (वय ५० वर्षे रा. साळगाव, ता. आजरा) या कामगाराच्या उंचावरून खाली पडून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी…
शुक्रवार दिनांक २१ रोजी माडभगत हे काम करत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इमारतीवरून अचानकपणे खाली कोसळले व डोक्याला मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,आई, विवाहित मुलगी, जावई ,मुलगा असा परिवार आहे.
ते शिवसेना उ.बा.ठा. गटाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होते.

अन्यथा वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या उपद्रवासह अन्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर तीस तारखेपर्यंत मुख्य वनसरंक्षकासोबत आजरा येथे बैठक न झाल्यास ३१ तारखेला वन विभागाच्या कार्यालयाला मोर्चाने जाऊन टाळे ठोकण्याचा इशारा आज शेतकऱ्यांच्या जम्बो शिष्टमंडळाने परीक्षेत्र वन अधिकाऱ्यांना दिला.
हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे, ससे यासह इतर वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्याच्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई अत्यंत जुजबी असून शंभर टक्के नुकसान धरून शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई मिळावी,पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोस्तासारख्या धार्मिक परंपरेवर एक प्रकारे बंदी घातली असून शिमगा सणाच्या काळात ही बंदी शिथिल करणे याबरोबरच म्हसोबा, चाळोबा यासारखी बहुजनांची क्षेत्रपालक दैवते ही जंगल हद्दीत येतात, त्या त्या देवांच्या वार्षिक उत्सवासाठी यात्रेसाठी परवानगी मिळावी,५० हजारच्या आतील नुकसान भरपाई देण्याचे अधिकार परिक्षेत्र वनाधिकारी स्तरावर देऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी होणारा विलंब थाबविला पाहिजे,जंगल हद्दीलगत असलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सौरउर्जा कुंपण मिळाले पाहिजे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मयत झाल्यास मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने ती वाढवून दिली पाहिजे, पिकांची नुकसान करणारी रानडुकरे मारण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्याला आठ दिवसात परवानगी देण्यात यावी, वड, पिंपळ, ऐन, किंजळ, धामण यासारख्या स्थानिक प्रजातींची लागवड करण्याची मोहीम तातडीने हाती घेतली पाहिजे.
यासह अन्य मागण्यांच्या संदर्भात तातडीने वन विभागचे वनसरंक्षक व निर्णय घेऊ शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांसह तातडीने निर्णायक बैठक आयोजित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले.
कॉ. संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम , प्रकाश मोरुस्कर ,कॉ.शांताराम पाटील, दशरथ घुरे, कॉ. संजय तर्डेकर, रवींद्र भाटले, बयाजी येडगे , संजय घाटगे , काशिनाथ मोरे , भीमराव माधव
सुरेश पाटील, सुभाष देसाई , मारुती पाटील , जोतीबा चाळके , नारायण भडांगे ,
मुकुंद नार्वेकर , बाळू जाधव , निवृत्ती फगरे , उदय कोडक , गौरव देशपांडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.


लाटगाव- सातेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदेश दळवी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाटगाव (ता. आजरा) येथील लाटगाव- सातेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदेश यशवंतराव दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच वामन सुतार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य महादेव कांबळे यांनी दळवी यांचे नाव सुचविले.
मावळते उपसरपंच रणजित सरदेसाई यांनी नुतन उपसरपंच संदेश दळवी यांचा सत्कार केला. या वेळी सुनिल सरदेसाई, लता जाधव, संजीवनी शिंदे, सुरेखा चौगले, महादेव कांबळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मिरची खरेदीसाठी आजऱ्यात झुंबड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आठवडा बाजाराचे औचित्य साधून तालुका वासी यांनी काल शुक्रवारी मिरची खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
उन्हाळ्याचा कडाका वाढेल तसे महिला वर्गाला मिरची खरेदीचे वेध लागतात. मिरची खरेदी करणे, वाळवणे, निवडणे व त्याची पूड करणे ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची उपलब्ध असल्याने महिला वर्ग मिरच्या खरेदीस प्राधान्य देताना दिसतो.
काल शुक्रवारी आठवडा बाजारात १५०/- रुपये प्रति किलो पासून ३००/- रुपये प्रति किलो पर्यंतच्या मिरच्या उपलब्ध होत्या. सदर दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्याने मिरची खरेदीसाठी तालुकावासीयांनी गर्दी केली होती.

महिलांनी सकस आहार घेतला पाहिजे : मंगल मोरबाळे

महिलांना थकवा जाणवतो तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये एच. बी. व कॅल्शिअमची कमतरता असते. त्यासाठी महिलांनी सकस आहार घेतला पाहिजे असे मत महागाव मेडीकल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे यांनी व्यक्त केले. चैतन्य सृजन व सेवा संस्थेच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिवशंकर उपासे होते.
पाहुण्यांचा परिचय डॉ. अंजनी देशपांडे यांनी करून दिला. डॉ. शिवशंकर उपासे यांनी चैतन्य संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मोरबाळे म्हणाल्या, कर्करोग होऊ नये यासाठी मुलींनी काळजी घेणे आवश्यक आहे. कॅन्सर हा पेशींचा समुह असतो या पेशी मरत नाहीत. आहारात साखर, मैदा, मीठ यावर योग्य तो प्रतिबंध घालून आहार घ्यावा. महिलांनी आरोग्याचा विचार प्राध्यान्याने केला तर कुटुंब सुखी होईल असे त्यांनी सांगितले. उपस्थित महिलांच्या प्रश्नांची उत्तरे मोरबाळे यांनी दिली.
सौ. पुष्पलता घोळसे, प्रताप होलम, सुभाष पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. पी. बी. पाटील, रवींद्र देसाई, संतोष जाधव उपस्थित होते. सूत्रसंचलन सौ.मंजिरी यमगेकर यांनी करून आभार मानले.




