शनीवार दि. २० सप्टेंबर २०२५


महागोंडमध्ये शेळ्यांची चोरी

उत्तूर : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
महागोंड ता. आजरा येथील हर्षद लक्ष्मण पाटील यांच्या महागोंड होन्याळी मार्गावरील तळीमाळ शेतातील घरात बांधण्यात आलेल्या ४२ हजार रुपये किमतीचे ६ शेळ्या व १ बोकड चोरीला गेल्याची फिर्याद हर्षद लक्ष्मण पाटील रा. महागोंड यांनी पोलिसात दिली आहे. चार दिवसांपूर्वी सातेवाडी/लाटगाव येथून म्हैस चोरून नेल्याचा प्रकार घडल्यानंतर आता महागोंड येथे शेळ्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने पशुपालकांनी शेतामध्ये जनावरे बांधायची की नाहीत? असा समान उपस्थित होत आहे.
घराचा दरवाजा तोडून महागोंड येथील चोरीचा सदर प्रकार घडला आहे.
पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

आजरा येथे आज बांबू लागवड तंत्रज्ञान व हस्तकला कार्यशाळा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून आजरा येथे बांबू लागवड तंत्रज्ञान व हस्तकला कार्यशाळेचे आज शनिवार (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. येथील आजरा महाविद्यालयावरील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम होईल. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), आजरा महाविद्यालय आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन यांच्यावतीने कार्यक्रम होईल.
वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सह- पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक,खा. छ. शाहू छत्रपती, खा. धैर्यशिल माने, आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, विनय कोरे (सावकर), राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, राहूल आवाडे, शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यकार्यकारी अधिकारी एस. कार्तिकियन, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रवींद्र तानड, आयएसईसीचे कार्यकारी संचालक प्रमोद कुमार, आयआयटी मुंबईचे मानद सल्लागार राजाराम देसाई, आयएसईसीचे सहा प्राध्यापक विलास जाधव, अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी, आत्मा समितीचे माजी अध्यक्ष इंद्रजीत देसाई हे विशेष उपस्थित राहणार आहेत.
कोकण कृषी विद्यापिठाचे सहा. प्राध्यापक डॉ. अजय राणे, बांबू हस्तकला प्रशिक्षक दिनेश ढोले हे मार्गदर्शन करणार आहेत.

अन्यथा वन विभागावर मोर्चा…
वनविभागाच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये हत्ती,गवे,रानडुक्कर माकडे,ससे यासह इतर प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.झाल्या नुकसानीची अत्यंत जुजबी स्वरूपात भरपाई मिळत आहे. म्हसोबा, चाळोबा यासारखी बहुजनांची क्षेत्र पालक दैवते जंगल हद्दीत येतात त्या-त्या देवांच्या वार्षिक उत्सवासाठी, यात्रेसाठी परवानगी मिळावी यासह विविध मागण्या परिक्षेत्र वनाधिकारी वनविभाग आजरा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुख्यवन संरक्षक, उपवन संरक्षक यांचे सह आजरा येथे बैठक न झाल्यास वन विभागाच्या कार्यालयावर तालुक्यातील शेतकरी मोर्चा घेऊन येतील असा इशारा देण्यात आला आहे.
वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कांही शेतकऱ्यांनी पीक घेणे बंद केले आहे. यापूर्वीही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या होत्या. परंतु बैठकांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. शेतकऱ्यांकडून मोर्चे,आंदोलने, निवेदने देणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले नाही गेल्याने ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सदर बैठक न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कॉं. संपत देसाई, संजयभाऊ सावंत, प्रकाश मोरुस्कर, अमानुल्ला आगलावे,शांताराम पाटील ,रवींद्र भाटले, काशिनाथ मोरे,बयाजी येडगे, दशरथ घुरे, भीमराव माधव, नारायण भडांगे, बाळू जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

माझी वसुंधरा ६.० अभियानातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा विजेत्यांचा गौरव

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
(मंदार हळवणकर)
उत्तूर : माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत ग्रामपंचायत कसबा उत्तूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किरण आमणगी होते. स्वागत व प्रास्ताविक महेश करंबळी यांनी केले. विजेते अनुक्रमे अवनी अभिजीत देसाई, सतिश तानाजी इंजल, किरण गंगाधर हराळे आणि डॉ. राजश्री सुहास देसाई यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून के. के. कुंभार, सुहास पोतदार, बी. बी. पाटील आणि सौरभ वांजोळे यांनी काम पाहिले. यावेळी सौरभ वांजोळे, बी. बी. पाटील व किरण हराळे यांनी मनोगते व्यक्त केली.या प्रसंगी उपसरपंच समिक्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य संजय उतूरकर, राजू खोराटे, भैरू कुंभार, मिलिंद कोळेकर, अनिता घोडके, स्पर्धेचे प्रायोजक विश्वनाथ सावेकर, ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील तसेच स्पर्धक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सरपंच किरण आमणगी यांनी मानले.

पाऊस थांबता थांबेना…
नवरात्र उत्सव मंडळांसमोर उपक्रम राबविण्याबाबत प्रश्नचिन्ह…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मे महिन्यात सुरू झालेला पाऊस सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ओलांडून गेला तरी थांबण्याचे नाव घेत नसल्याने दोन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिकसह करमणुकीचे कार्यक्रम राबवताना अनेक मर्यादा येताना दिसत आहेत.
आजरा शहरासह तालुक्यांमध्ये नवरात्र उत्सव मोठा दणक्यात साजरा केला जातो. यावर्षी पाऊस सातत्याने सुरू असल्याने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्या होत्या. तीच परिस्थिती आता नवरात्र उत्सवामध्ये ही निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे सातत्याने पावसाची हजेरी सुरू असल्याने भरमसाठ पैसे मोजून विविध कार्यक्रम ठरविताना विचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांना आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवावर पावसाचे सावट कायम आहे.
पंडित दीनदयाळ विद्यालयात पालक मेळावा संपन्न

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये पालक मेळावा पार पडला. प्रथम प्रकाश प्रभू यांनी सर्व पालकांचे स्वागत केले. मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी प्रास्ताविक केले . विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती , विद्यार्थ्यांमधील शिस्त , विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण याबद्दल चर्चा केली. शालेय उपक्रमांची माहिती सांगितली. उपक्रमांतून विद्यार्थी कसा घडतो, उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, भविष्यात त्याला या उपक्रमांचा फायदा कसा होतो ,विद्यार्थी धाडसी होतात ,विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सहकार्याची भावना निर्माण होते याबद्दल माहिती सांगितली.त्याचप्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन शाळेत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या शिबिरामध्ये सहभाग महत्त्वाचा असतो. संस्कार शिबिरांमुळे विद्यार्थ्याला शिस्तीचे धडे मिळतात, श्रमाचे महत्त्व समजते .फक्त शैक्षणिक प्रगती न बघता विद्यार्थी इतर कलेमध्ये कसा निपुण होईल याकडे शाळेचे लक्ष असते. यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात शालेय उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे मुलांना आपल्या पाल्याबद्दल पालकांची जबाबदारी काय आहे या सर्वांचा आढावा त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत घेतला.
संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांनी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांसाठी शाळा देत असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष त्याचप्रमाणे पालकांची पाल्याविषयीची जबाबदारी, आपल्या पाल्यासाठी थोडा वेळ देणं किती गरजेचं आहे याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. आपल्या पाल्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, त्याच्याशी पालक म्हणून आपण संवाद साधला पाहिजे याबद्दल पालकांशी चर्चा केली. यानंतर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. यामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात घटक चाचणी एक निकालावर चर्चा करण्यात आली. विद्या कुंभार यांनी शाळेत होणाऱ्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सांगितली.
मेळाव्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सूत्रसंचालन आणि आभार प्रकाश प्रभू यांनी मानले.

स्वस्थ नारी सशक्त परिवार ‘ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
*”स्वस्थ नारी सशक्त परिवार”* अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय आजरा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्र.१ यांचे मार्फत आजरा हायस्कूल आजरा येथील विद्यार्थिनींची व महिला शिक्षकांची आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. स्वाती रेडेकर डॉ. सुरजित पांडव फार्मासीस्ट सारिका शिंदे आरोग्य परिचारिका सुषमा साठे यांनी आरोग्य तपासणी व उपचार केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.अजित तोडकर व इतर शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.


