शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६

विहीर खोदताना पडून बापाचा मृत्यू…
मुलगा जखमी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विहीर खोदण्याचे काम करणाऱ्या आजरा येथील जाधव कुटुंबीयांमधील सुरेश दादाराव जाधव (वय ४८ वर्षे) याचा खोदत असलेल्या विहिरीत सुमारे ४५ फूट खाली पडून मृत्यू झाला तर त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मुलगा गणेश हा यारी तुटून पायावर पडल्याने जखमी झाला आहे. बांदा येथे सदर घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
सर्वोदय कॉलनी, आजरा येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबीयांचा विहीर खोदण्याचा व्यवसाय आहे. बांदा येथे त्यांचे विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हे काम सुरू असताना विहिरीच्या काठावर असणारे सुरेश हे विहिरीत पडले व गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलगा गणेश यांच्या पायावर यारी तुटून पडल्याने तोही जखमी झाला आहे. गुरुवारी सुरेश यांच्या मृतदेहावर आजरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बालक मृत्यू प्रकरणी अन्याय निवारण समिती आक्रमक
दोषींवर कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा राईस मिल परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या लाकडांच्यामुळे आजऱ्यात ११ वर्षीय गरीब मुलाचा बळी गेला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने वनविभागात पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
आजरा राईसमिल परिसरात बेकायदेशीर व बेवारस टाकण्यात आलेल्या लाकडांमुळे ११ वर्षीय आदर्श किरण पोवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही लाकडे बिगर परवाना असल्याने सॉ मिलपासून दूर टाकण्यात आल्याचा संशय असून, रात्री बेकायदेशीरपणे कापणी होत असल्याचेही आरोप आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही सुरक्षा न बाळगता लाकडे ठेवण्यात आल्याने गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरीक्षक व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देत दोषींवर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी, उपाध्यक्ष जोतीबा आजगेकर, मंजूर मुजावर, मदन तानवडे, संजय जोशी, दिनकर जाधव व संतोष बांदिवडेकर यांच्या सह्या आहेत. निवेदन सादर करताना बंडोपंत चव्हाण, मिनीन डिसोझा, सचिन बिरजे, डॉ. अशोक माने, जावेद पठाण व सईद मुल्ला उपस्थित होते.

निष्ठावंत शिवसैनिकांना जि.प.व पं. स. मध्ये पाठवण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजरा तालुका पक्षाची बैठक जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे व उपजिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत कार्यकर्त्यांनी घरची भाकरी खाऊन निष्ठावंत शिवसैनिकाला पंचायत समिती व जिल्हा परिषदेत पाठवू असा निर्धार केला तसेच लोकसभा व विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून शिवसैनिकांनी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांचा प्रामाणिक व कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रचार केला यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी गट यांनी शिवसेनेला सन्मानजनक जागा द्याव्यात.
गेली अनेक वर्ष शिवसेना हा पक्ष रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेची काम करत आहे तालुक्यातील अनेक प्रश्न सत्ता नसताना देखील जनआंदोलन मोर्चे काढून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण केली केलेली आहे सध्या देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात ग्रामीण जनतेचा रोष आहे भाजपच्या हुकूमशाहीला जनता कंटाळलेली आहे पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकू पाहणाऱ्या भाजपला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवूया असा निश्चय शिवसैनिकांनी केला.
यावेळी पेरणोली जिल्हा परिषदेसाठी युवराज पोवार, दिनेश कांबळे, पेरणोली पंचायत संगीता माडभगत, छाया आढाव, वाटंगी पंचायत समिती विश्वास किल्लेदार, कृष्णा पाटील,उत्तूर जिल्हा परिषद संजय येसादे, सागर वाघरे, उत्तुर पंचायत समिती आनंदा येसणे, रोहित डावरे,
भादवण पंचायत समितीसाठी संजय येसादे, सुनील डोंगरे यांची नावे सुचविण्यात आली.
समीर चांद,कृष्णा पाटील, जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी आभार मानले.
यावेळी उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, विश्वास किल्लेदार, विलास जोशीलकर, महादेव सुतार, महादेव होडगे, अमित गुरव, सुयश पाटील, लक्ष्मण परीट, रवी खोराटे, भिकाजी पाटील, राहू पाटील, महिला आघाडी सुमन देसाई, उमेश डेळेकर, तानाजी डोंगरे, भाऊ निवळे, संजयभाई, वसंत पवार, बाळू परीट,लक्ष्मण माडभगत, रवी गुडुळकर यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तुर येथे साकारत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून उतूर ता. आजरा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय साकारत आहे. सध्या रू. २५० कोटी मंजूर असलेला हा प्रकल्प पूर्ण होऊन सर्व अनुषंगिक सेवा सुविधांसह रु. १,००० कोटींच्या घरात जाऊ शकेल इतका व्यापक आहे. या महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य इमारतींसह, मुले आणि मुलींची वस्तीगृहे, सर्विस ब्लॉक्स, अधिष्ठाता बंगला, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने इतर सर्व इमारती, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटर्स, संरक्षक भिंत व अनुषंगिक भौतिक सोयीसुविधा ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगाने हा आढावा…….
भारतीय पारंपरिक निसर्गोपचार व योगशास्त्राला भारतासह सबंध जगभरातूनच मान्यता मिळालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तुर ता. आजरा उत्तुरच्या (ता. आजरा) उत्तरेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय साकारत आहे. या मेडीकल हबमुळे जागतिक दर्जाचे मेडिकल टुरिझम वाढून साहजिकच त्याचा परिणाम या परिसराच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय वृध्दीवरही होईल. सुरवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथे सुरू आहे. इमारत पूर्ण होताच ते उत्तूर येथे जाणार आहे.
■ दृष्टिक्षेपात निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय…
□ विविध नऊ बाह्यरुग्ण विभागांतून मिळणार रूग्णसेवा
□ सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त सहा आंतररुग्ण विभाग
□ सुसज्ज कॅज्युअल्टी विभाग
□ दरमहा १५, ००० हून अधिक रुग्णांना मिळणार सेवा
□ महाविद्यालय प्रवेश क्षमता: ६०
□ हॉस्पिटल बेड संख्या: १००
□ मुलांचे वसतिगृह क्षमता: २००
□ मुलींचे वसतिगृह क्षमता: २००
□ चिकित्सा केंद्र
□ बहुउदेशीय हॉल
□ योगा हॉल
□ योगावर आधारीत चालण्याचा ट्रॅक
□ स्टाफ कॉर्ट्स
□ सुसज् ग्रंथालय
□ सुसज्ज प्रयोगशाळा
□ नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र
□ ऑडिटोरियम
□ ट्रिटमेंट केंद्र
□ डायट सेंटर
□ स्विमिंग पूल
अशा अनुषंगिक सेवासुविधा आहेत.
स्थानिक अर्थकारणावर होणार परिणाम..!
निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाची ही जागा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांशी संलग्न आहे. केरळप्रमाणे येथेही “मेडिकल हब” निर्माण होऊन “ईंटरनॅशनल मेडिकल टुरिझम” वाढणार आहे. स्थानिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे. उत्तुर विभागातील गावांचे उत्तूर हे मुख्य केंद्र व बाजारपेठ आहे. बाहेरील प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व मुलांना बंगलो, फ्लॅट्स आणि खोल्या लागतील. शैक्षणिक साहित्यासह साहजिकच हॉटेल्स आणि खानावळ धंद्यालाही बरकत येईल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी पाच हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होईल. साहजिकच स्थानिक बाजारपेठेला महत्व येईल.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजना….!
या निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालयासाठी अडीच कोटी निधीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार होत आहे. आंबेओहळ प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यावरून आरसीसी विहीर बांधून चार किलोमीटर अंतराच्या सहा इंची एचडीपी पाईपमधून हे पाणी आणले जात आहे. रुग्णालय परिसरात दोन लाख लिटरची टाकी व फिल्टर हाऊससह पाणीपुरवठा होणार आहे.
प्रस्तावित राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र…..!
याच परिसरात १०० प्रशिक्षणार्थी क्षमता असलेल्या दहा एकर जागेवरील राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्राथमिक मान्यता मिळालेली आहे. साधारणता अडीचशे कोटी निधीतून एकाच छताखाली वैद्यकीयसह आयुर्वेदिक, दंतशास्त्र, होमिओपॅथी, पॅरामेडिकल या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहेत. शासकीय फिजिओथेरपी महाविद्यालय व रुग्णालय व पंचकर्म सेंटरही प्रस्तावित आहे.
अंतर्गत रस्ते, गटारी व रीटेनिंग वॉल….!
रुग्णालय परिसरात साधारणता १५ कोटींचे अंतर्गत रस्ते प्रस्तावित आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असून त्यांच्या दुतर्फा आरसीसी गटारी व रिटेनिंग वाॅलचीही तरतूद आहे.

आचारसंहीतेचे काटेकोर पालन करा : तहसीलदार समीर माने आजऱ्यात सर्वपक्षीय बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंडीतेचे काटेकोर पालन करा असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश यमगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजरा तालुक्यातील एक गट व दोन कमी झाल्याने तालुक्यात आता उत्तूर व पेरणोली असे दोन गण तर उत्तूर, भादवण, पेरणोली व वाटंगी असे चार गण आहेत. पेरणोली जिल्हा परिषद गटात सुमारे ४२ हजार तर उत्तूर गटात ४९ हजार इतके मतदार आहेत. निवडणूकीसाठी तालुक्यात १२७ मतदान केंद्रे असणार आहेत. शुक्रवार दि. १६ ते २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सर्व अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्विकारले जाणार असून अर्ज देणे व स्विकारण्यासाठी एक खिडकी योजनेची सोय करण्यात आल्याचे तहसीलदार माने यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार कार्यालयातूनच चालणार असल्याचे तहसीलदार माने यांनी सांगितले.
या बैठकीला संजय पाटील, सी. आर. देसाई, संदीप चौगले, शिरिष देसाई, जनार्दन नेऊंगरे, रणजित सरदेसाई, सुधीर सुपल, राजू पोतनीस, मानसिंग देसाई, अजित हरेर, किरण कोरे, श्वेता सरदेसाई, संतोष चौगले आदी उपस्थित होते.
सर्व परवानग्या घ्या…
निवडणूक काळात होणारे प्रचार कार्यक्रम, पदयात्रा यासह अराजकीय कार्यक्रम होणार असतील तर त्या कार्यक्रमांनाही परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमाचे नियोजन करताना आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्या असे आवाहनही तहसीलदार माने यांनी केले.

निधन वार्ता
निजाम लमतुरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नाईक गल्ली, आजरा येथील निजाम युसुफ लमतुरे ( वय ७४ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजरा नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार संचालकांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. यानंतर राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे सादर करण्यात आलेले ‘ दुर्गा ‘ हे नाटक या कार्यक्रमात सादर करण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रम हा नाट्यकलेतील नवरसांवर आधारित होता. नृत्य, नाट्यछटा, एकांकिका,रेकॉर्ड डान्स, गीत गायन, विनोदी डान्स, लावणी, तांडव नृत्य यातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी निर्मळे, विद्या कुंभार, संयोगिता वाळके व तेजश्री बुरुड यांनी केले.
वसंतरावदादा पाटील विद्यालयात भूगोल दिन उत्साहात संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारताचे ,जगाचे व महाराष्ट्राचे विविध नकाशे तसेच भौगोलिक आकृत्यांच्या, संकल्पनांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या, त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उत्तूर गावच्या नूतन उपसरपंच सौ.सुनीता संजय हत्तीर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. भूगोल विषयाशी संबंधित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे भूगोल शिक्षक श्री.किरण आमणगी यांनी भूगोल दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांच्यासह ऋषिकेश हळवणकर, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. राजकुमार राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
आजरा हायस्कूलचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा १००% निकाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूलने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत १००% निकाल मिळवून यश संपादन केले आहे.इंटरमिजिएट आणि इलिमेंटरी या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी ए आणि बी श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ए श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बी श्रेणीत २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सी श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इलिमेंटरी परीक्षेसाठी एकूण ७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ए श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बी श्रेणीत ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सी श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ए श्रेणीतील यशस्वी विद्यार्थी:
इंटरमिजिएट :
कु. अक्षरा पाटील, अनमसबा पटेल, अनुष्का पाटील, अथर्व वांद्रे, दिपा गावडे, धनश्री लाड, इफ्रा दरवाजकर, पौर्णिमा नलवडे, प्रज्ञा कुंभार, प्रांजल मोहिते, राजेश पाटील, कु. रिझा बुढ्ढेखान, ऋतूजा पाटील, संचिता पाटील, संदेश देसाई, सानिका कोकितकर, सानिका सावंत, सारिका कोकितकर, स्वरांजली देशमुख, वेदिका पोतदार.
इलिमेंटरी :
अनुप पाटील, आयुष पाटील, जान्हवी पाटील, कुशल शेडगे, ममता कांबळे, मनस्वी देसाई, प्रगती पाटील, प्रांजल कुंभार, प्रांजली मोरे, रिझा खेडेकर, रोहिणी पवार, सई यादव, साक्षी ओतारी, संजना इलगे, शादाब भडगावकर, सिफा खेडेकर, सिध्देश नांदवडेकर, सिया देसाई, तनया कुपटे, तन्मयी गाडे, वैष्णवी जाधव, नंदिनी सावंत, प्रणाली कुंभार.
या विद्यार्थ्याना चित्रकला शिक्षक श्री वाय .ए.शेटके , श्री टी. एम, पाटील व सौ व्ही.पी.हरेर यांचे मार्गदर्शन लाभले.

दिव्यांगांना आवाहन
दरवर्षीप्रमाणे नगरपंचायतीमार्फत दिव्यांग कल्याण कार्यक्रमानुसार दिव्यांग व्यक्तींकरिता ५% राखीव निधीचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यापुर्वी एकूण १०७ पात्र लाभार्थी असून सदर पात्र लाभार्थी यांनी चालू सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता लाभ घेणेसाठी हयातीचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक झेरॉक्स इ. कागदपत्रे दिनांक १६-२-२०२६ रोजी सायं.५-०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवसाखेरीज न. पं. कार्यालयात जमा करावीत.
तसेच ज्या दिव्यांग लाभार्थी यांनी मागील आर्थिक वर्षात आपले डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र इकडे जमा केलेले नाही त्यांनी डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त नवीन दिव्यांग व्यक्तींनी आपले नोंदणीकरिता मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन प्राप्त डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र (किमान ४० % व त्यावरील), नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलबाबतचे स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड व बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत इ. कागदपत्रांसह इकडील विहीत नमुना अर्जात दिनांक १६ फेब्रुवारी रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवसाखेरीज न. प. कार्यालयात सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही. याची सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी व दिव्यांग विभाग प्रमुखांनी केले आहे.


