mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि.१७ जानेवारी २०२६

चाफवडेचा भरत सांभाळतोय उद्योगपती अंबानी कुटुंबीयांचे किचन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील चाफवडे येथील भरत दादासाहेब मोकाशी हा तरुण सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरचे किचन सेफ / महाराजा म्हणून सांभाळत आहे. भरत यांची ही मजल निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोरोना महामारी पूर्वी भरत हे मुकेश अंबानी यांच्या वरळी/मुंबई येथील घरी काम करत होते. याच दरम्यान त्यांना तात्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काम करण्याची संधी मिळाली. कोरोना कालावधीमुळे त्यांना गावी परतावे लागले.

कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्यांचा काम मिळवण्यासाठी नव्याने संघर्ष सुरू झाला. छोट्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मिळेल तेथे काम करून त्यांनी आपला उदनिर्वाह चालू ठेवला. दरम्यान नुकताच पुन्हा एक वेळ त्यांना ईशा अंबानी यांच्या घरातून कामावर घेण्यासंदर्भात निरोप देण्यात आला. तातडीने भरत हे कामावर रुजू झाले असून पुन्हा एक वेळ अंबानी कुटुंबीयांच्या किचनचे प्रमुख बनले आहेत.

आजऱ्यातील चाफवडेसारख्या प्रकल्पग्रस्त गावातून भरत यांनी थेट अंबानींच्या किचनपर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे.

चुकीच्या निकषाच्या आधारे संचमान्यता देण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिनियमाचे उल्लंघन करून मा. संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी २००२४-२५ ची संभाव्य संच्मान्यता प्रसिध्द केली आहे. सदर संचमान्यता ही शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन अशा प्रकारचा शासन निर्णय करणे आणि त्या आधारे परिपत्रक काढून संचमान्यता देणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ही संचमान्यता, परिपत्रक आणि शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शाळा बचाव आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्वच शासकीय शाळा या १ ते ४ आणि १ ते ७ अशाच आहेत. असे असतांना १ ते ४ च्या वर्गाना १ ते ५ चे निकष व ६ ते ७ च्या वर्गाना १ ते ८ चे संचमान्यतेचे निकष लावले जात आहेत. गेली दहावर्षे असे चुकीचे निकष लावून संचमान्यता दिली जात आहे. चवथी पर्यंतच्या शाळांना पाचवी व सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचे वर्ग कुठेही जोडले नाहीत, त्यामुळे संचमान्यतेनुसार शिक्षक संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील श्रमिक कष्टकरी वर्गातील बहुजन समाजाच्या मुलांचे अपरिमित असे शैक्षणिक नुकसान होत आहे.

नैसर्गिक वाढीने वर्ग जोडणे बाजूलाच राहिले असून १५ मार्चच्या शासन निर्णयाने संचमान्यतेत अन्यायी निकष घातले आहेत. हे सरळ सरळ मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काच्या कायद्याचे भंग करणारे आहे. त्यामुळे कायद्याचा भंग करणारा शासन निर्णय तातडीने रद्द होणे आवश्यक आहे.

खरं तर वस्ती तिथे व गावं तिथे शाळा हे धोरण कायम ठेऊन पटसंख्येची अट न घालता प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक दिला पाहिजे. त्यासाठी सरकार अतिरिक्त बोजा पडत असल्याचे कारण देत आहे ते साफ चुकीचे आहे. कोणत्याही देशाचा विकास हा गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच होतो. गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणे हा या देशातील प्रत्येक मुलाचा मुलभूत हक्क आहे. संविधानातील ७ व्या अनुसूचीनुसार शिक्षणाचा समावेश समवर्ती सूचित केला आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीही यावर कायदा आणि धोरणे आखू शकता

वरील १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा आणि मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्य तरतुदीप्रमाणे सकारात्मक असा संचमान्यतेसाठी नवा शासन निर्णय करावा ही विनंती. राज्यात या निर्णया तीव्र असंतोष आहे. बालकांच्या हितासाठी पालकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागू नये असेही या पत्रात म्हटले आहे.

आदमापूर व इंचनाळ येथे विशेष बस फेरी सुरू करा…
तालुका एसटी प्रवासी संघटनेची मागणी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातून संत बाळूमामा मंदिर आदमापुर (ता. भुदरगड) व प्राचीन गणेश मंदिर इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. आदमापूर येथे दर महिन्याच्या अमावस्या दिवशी तसेच इंचनाळ येथे गणेश जयंती दिवशी मोठी यात्रा भरते. त्यामुळे आजरा-उत्तुर-गारगोटी-मुदाळतिठ्ठा-आदमापूर अशी बस फेरी अमावस्येदरम्यान नियमित सुरू करावी. तसेच यावर्षी २२ जानेवारी रोजी गणेश जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आजरा-हाजगोळी-कोवाडे-सरोळी-ऐनापुर-इंचनाळ अशी एकदिवशीय फेरी दिवसभर सुरू करण्यात यावी. या दोन्हीही फेऱ्यांना आजरा तालुक्यातील प्रवासी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे या फेऱ्या सुरू करण्याबाबतचे लेखी निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

निवेदनावर अध्यक्ष सचिन तेंडुलकर उपाध्यक्ष उदयसिंह सरदेसाई व सचिव विकास सुतार यांच्या सह्या आहेत.

रंगुबाई गुरव यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण (ता. आजरा) येथील रंगुबाई रामचंद्र गुरव (वय ९२ वर्षे) यांचे वार्धक्याने गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, तीन मुली तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्या अशोक गुरव ( भादवण सोसायटी संचालक) तसेच तुकाराम गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्या आई होत.

रक्षाविसर्जन सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

पेरणोली येथे बाळ केसरकर समर्थकांचा मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघामधील बाळ केसरकर यांच्या समर्थकांचा मेळावा पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आजरा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वसामन्यामधील व सर्वसमावेशक असा उमेदवार असावा अशी मागणी केली. घाटकरवाडीचे माजी सरपंच श्री.सुरेश पाटील यांनी आपण जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी केसरकर म्हणाले, सर्वांचे म्हणणे महायुतीच्या नेत्यांच्या समोर मांडून आपल्या उमेदवारांसाठी प्रयत्न करू.

यावेळी सुळेरान सरपंच श्री.शशिकांत कांबळे, किट्टवडे सरपंच लहू वाकर, हाळोली उपसरपंच लहू पाटील,मसोली उपसरपंच मनोज गुरव, किट्टवडे ग्रा.सदस्य सागर पाटील, बुरुडे ग्रा.सदस्य मंदार पेंडसे,हाळोली माजी सरपंच संभाजी कांबळे आदींनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी आबा पाटील/ विठटे, सुधाकर चौगुले, राजेंद्र कालेकर, प्रकाश शिंदे, शिवाजी पाटील, शिवाजी खामकर, सुभाष जोशीलकर, अविनाश राणे, सुयश लाड व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्यास साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गतवर्षी वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांस एन.सी.डी.सी.या वित्तीय संस्थेकडून रु.१२२ कोटी ६८ लाख लाख इतके दिर्घ मुदतीचे कर्ज मिळालेले आहे. सदर कर्जाचा विनियोग व वसुली बाबतची माहिती घेणे व तपासणी करणेकामी साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख श्री. यशवंत गिरी (संचालक अर्थ) यांनी प्रत्यक्ष कारखाना कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत विशेष लेखापरिक्षक श्री.आर.बी.वाघ, श्री. भोसले, श्री. धुमाळ उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्यांने एन.सी.डी.सी.या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग व तपासणी केले नंतर श्री. गिरी यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर आजरा कारखान्यांने एन.सी.डी.सी. कडून घेतलेल्या कर्जाचे दरमहा होणारे संपुर्ण व्याज नियमीत परतफेड केले असून कर्जाबाबतचे सर्व कागदोपत्री रेकॉर्ड सुव्यवस्थित ठेवलेले आहे. कर्जाच्या पुढील नियोजनाबाबत अर्थ विभाग प्रमुखांनी कारखान्यास मार्गदर्शन व सुचना केल्या.

यावेळी कारखान्याचे मा. चेअरमन श्री. मुकुंद देसाई तसेच व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई, संचालक श्री. अनिल फडके, श्री. गोविंद पाटील, कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत, चिफ अकौंटंट श्री. प्रकाश चव्हाण, डे. चिफ अकौटंट श्री. रमेश वांगणेकर इत्यादी उपस्थित होते.

छत्रपती युवा ग्रुप तर्फे उत्तूर येथे सत्कार


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचालित श्री छत्रपती युवा ग्रुप, उत्तूर यांच्यावतीने श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा व भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेल्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सीआरपीएफ मध्ये निवड झालेले रोहन चव्हाण व श्रेणिक रेडेकर आणि आदित्य कुंभार, सोहम जांभळे, ओंकार सावंत यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक विशेष…

जिल्हा परिषद पं.स. करता काल शुक्रवारी २३ अर्जांची विक्री काल असून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

 

संबंधित पोस्ट

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!