


अपघातात तरुणाचा मृत्यू

आजरा:प्रतिनिधी
कानोली ता. आजरा येथील आशिष वामन सुतार या तरुणाचा राणी बेलूर,बंगलोर( कर्नाटक) येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
३२ वर्षीय आशिष बेंगलोर येथे डिझायनर म्हणून कामाला होता. त्याची कोल्हापूर येथे बदली झाल्याने तो कोल्हापूरला मोटरसायकल घेऊन येत होता . रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात झाला व त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला. आशिष याच्या पश्चात आई-वडील, भाऊ,भावजय असा परिवार आहे.
हरहुन्नरी आशिष याच्या निधनाने कानोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. आज त्याचा मृतदेह गावी आणला जाणार आहे.



हरपवडे येथे पशुपालकांना मार्गदर्शन

आजरा : प्रतिनिधी
ग्रामपंचायत हरपवडे ता. आजरा येथील ग्रामसभेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM)योजनेअंतर्गत शेळी गट, कुक्कुटपालन, वराह पालन,वैरण विकास, भारत पशुधन ॲपवर जनावरांची नोंदणी करणे, लाळ खुरकत लसीकरण चे महत्व, व लसीकरण करून घेणे, तसेच हरपवडे पैकी धनगरवाड्यातील धनगर बांधवाना गाईचे कशी देखभाल,सकस चारा, स्वच्छ पिण्याचे पाणी, परिसर स्वछता याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे (विस्तार अधिकारी )पंचायत समिती आजरा, यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वाटंगी येथे श्री रवळनाथ गृहतारण संस्थेचे उद्घाटन

आजरा: प्रतिनिधी
वाटंगी ता.आजरा येथे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री रवळनाथ सहकारी गृहतारण संस्था मर्यादित, वाटंगी या संस्थेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर ,वाटंगीचे सरपंच संजय पवार, संदीप चौगले, सरपंच सिरसंगी, स्वाती गुरव, उपसरपंच वाटंगी, सुरेश देसाई, माजी नायब तहसीलदार, शिवाजीराव गिलबिले, अध्यक्ष शिवराज संस्था समूह,बाबाजी नाईक, संचालक जनता बँक इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला .
संस्थेचे चेअरमन विजय देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.
यावेळी जयवंतराव शिंपी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संजय पोवार (सरपंच) यांनी गावामध्ये गृहतारण संस्थेमुळे सभासदांची सोय होणार असून ग्रामस्थांनी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
संदीप चौगले, शिवाजीराव गिलबिले मनोगत व्यक्त केले.उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी संस्थेकडे ५० लाखाच्या ठेवी जमा झाल्या.
कार्यक्रमप्रसंगी उत्तम जाधव,रमेश तेजम महाराज,आप्पासो कुराडे,सी.आर.देसाई, सुनील देसाई,,रोमन करवालो , बस्तू डायस ,बाळू तेजम , पो.पाटील पुंडलिक नाईक,सुनील जाधव ,प्रकाश कुंभार,निलेश सासुलकर ,बाबुराव नार्वेकर ,सुरेश शिंगटे हालेस डिसोझा , संतोष बिरजे , अशोक धडाम,शंकर वांद्रे ,इंदुताई कुंभार ,सुनीता सोनार ,हौशाबाई जाधव , अशोक जाधव ,विठ्ठल नांदवडेकर,विठ्ठल बिर्जे,मा.शामराव खुळे ,मा.बाळू चौगले ,मा.पुंडलिक गिलबिले.,मा.पांडुरंग कुंभार ,मा.महादेव कसलकर तसेच गावीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचालक मदन देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.



फलक रेखाटनाचे अवघड कौशल्य शिकत आहेत ‘व्यंकटराव’चे विद्यार्थी…

आजरा:प्रतिनिधी
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व चित्र, शिल्प कलेमध्ये व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य कला शिक्षकांमार्फत होताना दिसते.
खडू-फळा हा शिक्षकांचा श्वास. या प्रचलित व परंपरागत चालत आलेल्या फलकलेखन या पद्धतीमध्ये काळ्या फळ्यावर पांढऱ्या व रंगीत खडूच्या साह्याने अक्षर लेखन व चित्र रेखाटन करणे हा कौशल्याचा भाग आहे फळ्याचा काळा भाग ठेऊन पांढऱ्या अथवा रंगीत खडूने चित्र काढणे, तसेच पांढऱ्या कागदावर रंगाने चित्र काढणे यामध्ये भरपूर फरक आहे त्यामुळे हे कौशल्य व ताळमेळ विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्याकडून सुंदर चित्र निर्मिती करून घेण्याचे काम कलाशिक्षक कृष्णा दावणे करीत आहेत.

सध्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फळ्याशी मैत्री करायला शिकवत आहेत. विद्यार्थीही तासनतास फळ्यासमोर उभे राहून आपल्या मनातील भाव, रंग, रेषेच्या माध्यमातून उमटवताना दिसत आहे.
७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उमेश केरकर, साहिल इंगळे, श्रीशैल कुंभार (इयत्ता दहावी), साहिल मटकर, सिद्धार्थ सुतार, सक्षम पाटील, या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतीय सैनिक रेखाटून राष्ट्रप्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. त्याच्या या कलाकारीतून त्याच्यात उद्याचा एक उत्कृष्ट चित्रकार दिसत आहे.



गौरव…
” आदर्श शिक्षक पुरस्कार ” प्रशांत गुरव यांना प्रदान

आजरा तालुका पेन्शनर संस्था,आजरा व साहित्य सेवा संस्कृती मंडळ, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेन्शनर डे’ निमित्त व्यंकटराव हायस्कूल,आजरा,चे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना ‘राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,कला,क्रीडा, आरोग्य,तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा, विविध उपक्रम इ क्षेत्रातील अष्टपैलू कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशराव आपटे(जि.प.सदस्य,कोल्हापूर) व प्रमुख वक्ते अशोक येजरे (सिंधुदुर्ग मराठा शिक्षक संघ सल्लागार), आजरा तालुका पेन्शनर्स संस्थेचे अध्यक्ष बी.डी.ढोनुक्षे ,उपाध्यक्ष महंमदगौस तकीलदार,सरचिटणीस एस.टी.हळवणकर, कार्यकारिणी सदस्य एस.जी.इंजल, के.एम.पाकले, व्ही.एस.कांबळे,एस.जी.देसाई, व्ही.आर.बुवा, आशा खटावकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.



निवड…
सी.आर.देसाई

भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा चिटणीसपदी माजी प्राचार्य सी.आर. देसाई यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.




