
खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न…
मृतदेहासह महिला ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खोपोली / रायगड येथे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महिलेला पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी रंगेहात पकडल्याने एका मोठ्या घटनेचा उलगडा करण्यात आजरा पोलिसांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हसुरसासगिरी मुळगाव व मनगुत्ती सासुरवाडी असणाऱ्या सुनीता सुभाष देवकाई या सध्या खोपोली (रायगड) येथे राहतात. त्यांचे व गजेंद्र सुभाष बांडे (वय ३८) रा.खैरी प्लॉट, ता.जिंत्तूर जि.परभणी यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधातून गजेंद्र यांनी सुनीता यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले होते.
लग्न करून घे अन्यथा माझे पैसे परत दे असा तगादा सुनीता यांनी गजेंद्र यांच्याकडे लावला होता. व्यवसायाने पत्रकार असणाऱ्या गजेंद्र याने सुनिता यांना लग्नास संमती न दर्शवल्याने सुनिता हिने आपल्या सुळे ता. आजरा येथील अमित पोटे व मुलगा सूरज सुभाष देवकाई या साथीदारांच्या मदतीने २७ मार्च रोजी रात्री गजेंद्रला झोपेच्या गोळ्या देऊन दोघांच्या मदतीने हातपाय बांधून त्याचा गळा आवळून खून केला.
सदर घटना घडल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका बॅगेत मृतदेह भरून त्या भाडोत्री गाडीने आजऱ्याच्या दिशेने आल्या. कागल येथे लॉजवर चालकास झोपवून गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुळे येथील अमित पोटे साथीदारासह बाहेर पडल्या. स्थानिक पोलीस पेट्रोलिंगला जात असताना तेथे सदर महिलेने भाडोत्री आणलेली गाडी आढळून आली. गाडीच्या चालकाकडे चौकशी करताच संबंधित महिला शौचास गेली आहे असे सांगितले. बाजीराव कांबळे व अन्य पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तातडीने पाहिले असता. मृतदेह पेटवून विल्हेवाट लावण्याच्या स्थितीत बसलेल्या ठिकाणी एका बंद बॅगेत मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी मृतदेहासह त्यांना ताब्यात घेतले.

बाजीराव कांबळे
या घटनेची नोंद आजरा पोलिसात करण्याचे काम सुरू असून या कामी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, बाजीराव कांबळे, सुदर्शन कांबळे, दत्ता शिंदे, संतोष घस्ती, संदीप म्हसवेकर आदींनी भाग घेतला.
अन्य दोघांचा शोध सुरू
या गुन्ह्यात सामील असणाऱ्या अन्य दोघांपैकी एक अमित पोटे, सूळे ता.आजरा हा असून त्याच्यासह सूरज देवकाई यांचा पोलीस शोध घेत आहेत.



