

अर्बन बँक झाली… जनता बँकही झाली तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याच्या बिनविरोधचे काय…???
सभासदातून केला जात आहे प्रश्न
ज्योतिप्रसाद सावंत
सद्यस्थितीला आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे अशोकअण्णा चराटी, मुकुंदराव देसाई व जयवंतराव शिंपी यांनी आपआपल्या नेतृत्वाखालील आजरा अर्बनसह जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोधचा पायंडा सुरू करून सहकारला एक नवी दिशा देण्याचं काम केले असले तरी होऊ घातलेल्या आजरा तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये हाच फॉर्म्युला वापरला जाणार का ? असा प्रश्न आता सभासदांमधून उपस्थित केला जात आहे.तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखाना निवडणुकीवरीलही खर्चाचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने निवडणूक बिनविरोध का होऊ नये? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
आजरा तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजरा अर्बन बँक, स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था या दोन संस्थांपाठोपाठ जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात प्रमुख नेते मंडळींना यश आले आहे.त्यामुळे या संस्थांवरील निवडणूक खर्चाचा बोजा कमी होण्यास निश्चितच हातभार लागला आहे. चांगल्या पद्धतीने चाललेल्या या संस्थांमध्ये निवडणुका लावून अडचणीत आणण्यापेक्षा विद्यमान कारभाऱ्यांवर विश्वास ठेवून सभासदांनी बिनविरोधला हातभार लावला आहे.
या प्रमुख आर्थिक संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळे तालुक्यातील सहकाराने एक नवी दिशा जिल्ह्यातील सहकार चळवळीला घालून दिली आहे. आता खरी कसोटी आहे ती तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखाना या दोन महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्याची…
अशोकअण्णा चराटी व मुकुंदराव देसाई यांनी ‘एकमेका सहाय्य करू” अशी भूमिका घेत अर्बन बँक व जनता बँकेची निवडणूक बिनविरोध पार पाडली.यामध्ये जयवंतराव शिंपी यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली तर ‘भाजपाची’अशी ओळख असणाऱ्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूकही बिनविरोध करण्यात जनार्दन टोपले यांना यश आले.
असे असले तरी तालुका खरेदी विक्री संघामध्ये राष्ट्रवादी व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुधीर देसाई यांचे वर्चस्व आहे.सुधीर देसाई व अशोकअण्णा चराटी, जयवंतराव शिंपी यांचे विळ्या -भोपळ्याचे सख्य आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची भूमिका काय राहणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सुरू असणारा राजकीय संघर्ष पाहता तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक जोरात होणार अशी चर्चा आहे. जी अवस्था तालुका खरेदी विक्री संघाची आहे तेच दुखणे आजरा साखर कारखान्यामध्येही आहे. गेली पाच वर्षे राजकीय संघर्षामुळे कारखाना अडचणीत आला.तर दोन वर्षे बंद ठेवण्याची नामुष्की ही कारभाऱ्यांवर आली आहे. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी व सत्तांतर याचा परिणाम ही आजरा साखर कारखाना निवडणुकीवर होणार आहे. एकीकडे आम. हसन मुश्रीफ व आम. सतेज पाटील तर दुसरीकडे आमदार प्रकाश आबीटकर ,अशोकअण्णा चराटी, जयवंतराव शिंपी दंड थोपटतील असे दिसू लागले आहे. आमदार राजेश पाटील यांच्यासमोर धर्मसंकट राहणार आहे.
तरच सहकारात आदर्श….
केवळ आर्थिक संस्था बिनविरोध झाल्यानंतर तालुक्याने सहकाराला नवी दिशा दिली असे नाही. त्याचबरोबर तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकाही बिनविरोध पार पडल्या तरच आजरा तालुका सहकारात आदर्शवत म्हणता येईल. मात्र हे तितके सोपे निश्चितच नाही.


आजरा शहर विकास आराखड्यावर चर्चेसाठी उद्या संयुक्त बैठक …
भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या मागणीला यश
आगरा शहराचा शहर विकास आराखडा नगररचना विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर हरकती मागण्यात आल्या आहे त. आजरा शहरवासीय या आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत या पार्श्वभूमीवर आराखड्यात असणाऱ्या त्रुटींवर बोट ठेवत भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी आक्रमक भूमिका घेत शहरवासीयांची बैठक बोलवून सदर आराखडा समजावून सांगावा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने उद्या सोमवार दिनांक २७ रोजी सकाळी अकरा वाजता केवळ याच विषयावर विशेष बैठक बोलावली आहे.
आजरा नगरपंचायत कार्यालयात नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आजरा शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी आहेत. या आराखड्याबाबत शहरात उलट- सुलट मते व्यक्त होत आहेत. यावर चर्चा करण्यासाठी नगर विकास खात्याचे अधिकारी व नागरीकांची संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाच्यावतीने मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे करण्यात आली होती.
शहर विकास आराखड्याबाबत शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहराच्या पूर्व आणि दक्षिण बाजूला अनुक्रमे हिरण्यकेशी व चित्री या बारमाही वाहणा-या नद्या आहेत. नदीपात्रापासून ५०० मीटर पूर नियंत्रण रेषा आहे. तसा कायदा असतानाही पात्रालगतचे गट नंबर रहिवासाकरीता (पिवळा पट्टा) आरक्षित केले आहेत. तर काही ठिकाणी विशिष्ट समाजाच्या मालकी हक्काच्या स्मशानभूमीतून रस्ते अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व विषयांबाबत शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे हे नाकारता येत नाही. याची माहिती नागरीकांना व्हावी, आराखड्यातील त्रुटी दूर करता याव्यात याकरीता नगरविकास विभागाचे अधिकारी व नागरीकांची व्यापक बैठक आयोजित करावी अशी मागणीही जोर धरत होती.
हरकत घेण्याचा कालावधी संपत आल्याने व हरकत प्रक्रिया किचकट असल्याने शहरवासीय आक्रमक झाले होते. अखेर नगरपंचायत प्रशासनाने उद्या सोमवारी नगरपंचायत सभागृहात बैठक आयोजित केली असून या बैठकीला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही केले आहे.

केंद्रीय मंत्री शिंदे उद्या
आजरा येथे येणार…

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता आजरा शहरांमध्ये येत असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी दिली.
अण्णा-भाऊ सांस्कृतीक सभागृह आजरा येथे ते नवयुवा मतदारांशी थेट संवाद साधणारा आहेत २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

🟤शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा…कांद्याने केली माती, ८२५ किलो कांदा विकून व्यापाऱ्यालाच १ रूपया परत देण्याची वेळ*

◾सध्या कांद्याचे दर नीचांकी पातळीवर आले असून, राज्य आणि केंद्र सरकारकडून उपाययोजना होत नसल्याने कांद्याचे दर रोजच घसरत आहेत. सोलापुरातील शेतकऱ्याला दोन रुपयांचा धनादेश मिळाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्याच सोलापुरात ८२५ किलो कांदा विकून व्यापाऱ्यालाच एक रुपया परत देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील दाऊतपूर येथे राहणारे बंडू भांगे यांनी सोलापूर बाजार समितीत ८२५ किलो कांदा जावळे या आडत व्यापाऱ्याकडे आणला होता. या कांद्याला एक रुपये प्रतिकिलो दरही मिळाला नाही. प्रतिक्विंटल 1१०० रुपये दराने ८२५ किलो कांदा विकला गेला. शेतकरी बंडू भांगे यांना ८२५ रुपये मिळणार होते; परंतु आडत व्यापाऱ्याने हमाली , तोलाई आणि वाहतूक खर्च असा एकूण ८३६.४६ रुपयांचा खर्च झाला. म्हणजे विक्रीपेक्षा १.४६ पैसे जादा खर्च झाले. त्यामुळे बंडू भांगे यांना विक्रीचे ८२५ रुपये तर मिळाले नाहीच. उलट आडत व्यापाऱ्याला १ रुपया ४६ पैसे द्यायची वेळ आली. एकीकडे शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत असताना दर मात्र कोसळत आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी कोसळला आहे.
संगमनेरात शेतकऱ्याने कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर
कांद्याची आवक वाढल्याने दर मोठय़ा प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर अक्षरशः ट्रक्टर फिरवला. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता.
मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला असून, कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या, असे म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे. थोरात यांच्या शेतात कांद्याची पात खाण्यासाठी शेळ्या-मेंढ्या आणि कांदा नेण्यासाठी माणसांची झुंबड उडाली होती.


