सोमवार दि.२४ मार्च २०२५


चोरीची मोटरसायकल जवळ बाळगली…?
एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा -महागाव मार्गावर सीड फार्म येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहनांची ही चालान मशीन द्वारे तपासणी करून कारवाई करत असताना तौसिफ बशीर भडगावकर (रा. दर्गा गल्ली, आजरा) याचे जवळ हिरो कंपनीची एचएफ डीलक्स विना नंबर प्लेट दुचाकी पोलीसांना आढळून आली.
सदर गाडीची कोणतीही कागदपत्रे नसून पोलिसांनी याबाबत भडगावकर याचेकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने व सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तौसिफ भडगावकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे असे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची फिर्याद संजय शामराव जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पन्हाळकर करीत आहेत.
गाड्या खरेदी करताना सावधानता बाळगावी
अलीकडे दुचाकी गाड्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीच्या गाड्या विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वापरलेल्या दुचाकी गाड्या खरेदी करत असताना सर्व कागदपत्रांची शहानिशा करून व सत्यता पडताळून गाड्या खरेदी कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मलिग्रे येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यशोदा फाऊंडेशन व संयुक्त वाघाची तालीम मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या.
यावेळी मलिग्रे पंचक्रोशीसह दुंडगे गडहिंग्लज येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी संकेत देवेकर, सुरज माने व श्रीतेज पाटील यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. यावेळी संयुक्त वाघाची तालीम मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव, डॉ .सुदामा हरेर,शिवानंद आसबे, प्रदीप जाधव, नाना नेसरीकर, दत्तात्रय आडसोळ, सुशांत पोटे, ओमकार शिंदे, प्रणव पताडे, शितेष पोवार, तालिब मकानदार याच्या सह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

उत्तूरमधील युवकाचे
झाले मरणोत्तर नेत्रदान

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर,येथील रोहित राजेंद्र विभुते (वय ४०) या युवकाचे मरणोत्तर नेत्रदान झाले. उत्तूर गावातील हे तिसरे नेत्रदान आहे. तर चळवळीतील १०९ वे नेत्रदान ठरले. कर्त्या मुलाच्या अकाली निधनाचे दु:ख बाजूला ठेवून नेत्रदानाचा निर्णय घेणाऱ्या विभुते कुटुंबीयांचे समाजातून कौतुक होत आहे.
रोहितला दोन दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असतानाच आज सकाळी त्याचे निधन झाले. रोहितच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दरम्यान, रोहितचे आजोबा मधुकर पोकळे यांचेही नेत्रदान झाले आहे. ते उत्तूरमधील पहिले नेत्रदान होते. नेत्रदानाबाबत माहिती असल्याने विभुते कुटुंबीयांनी दु:खातून सावरत रोहितचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गडहिंग्लज येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने उत्तूर येथे येऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
रोहितच्या पश्चात वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे.

जिल्हास्तरीय श्री रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गणित विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय श्री रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत आमच्या व्यंकटराव हायस्कूचा विद्यार्थी कु.अद्वैत महादेव पाटील इ. ५ वी हा विद्यार्थी प्रज्ञा प्रमाणपत्र धारक झाला.
त्याला श्री. ए.वाय. चौगुले यांचे मार्गदर्शन व संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी व सर्व संचालक , आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा ,प्राचार्य श्री .आर जी कुंभार पर्यवेक्षिका सौ. शेलार व्ही.जेसर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक. यांचे प्रोत्साहन लाभले.

सिरसंगीत विद्यार्थ्यांचा खाद्य मेळावा

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या खाद्य पदार्थांचा मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सरपंच संदिप चौगले यांच्या हस्ते खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्याध्यापक एम. नागुर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वडापाव, दाबेली, पावभाजी , मिसळ पाव, चिकन ६५, इडली डोसा, शितपेये असे विद्यार्थ्यांनी स्टाॅल लावले होते.
खाद्य महोत्सवाला आजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई संचालक दिगंबर देसाई , तालुका संघाचे संचालक मधुकर येलगार, उपसरपंच सरीता कुंभार, अशोक चौगुले, सी.आर. देसाई, सुभाष चौगुले , संतोष चौगले , प्रकाश कानडे, पांडुरंग टकेकर, अमृत देसाई, धोंडीराम देसाई, दत्तात्रय येलगार, सागर कुंभार , निलेश सुतार, सुरेश येलगार ,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

छाया वृत्त...

शहरामध्ये अनेक ठिकाणी दिवसेंदिवस सांडपाणी निचऱ्याची समस्या गंभीर होत असून यामुळे रोगराई वाढण्यास हातभार लागत आहे.

निधन वार्ता
काशिनाथ परीट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मासेवाडी गावचे प्रतिष्ठीत नागरिक व मासेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे माजी कार्यकारी संचालक श्री. काशीनाथ दत्तू परीट (वय ५९ वर्षे ) यांचे शनिवार दिनांक २२ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.


