बुधवार २ जुलै २०२५


पेरणोली सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित

२३ जून २०२५ रोजीच्या शासनाच्या सुधारित आदेशानुसार करण्यात आलेल्या आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींकरता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत पेरणोली ग्रामपंचायत सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित झाले आहे.
ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या २३ पैकी २०१० ते आजतागायत नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव न राहिलेल्या ग्रामपंचायतींमधून एका ग्रामपंचायती करिता नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये बहिरेवाडी खानापूर व पेरणोली ग्रामपंचायतींचा समावेश होता. चिठ्ठी द्वारे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पेरणोलीचे नाव आल्याने पेरणोली सरपंच पद आरक्षित झाले आहे.
सोडतीवेळी तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, निवडणूक विभागाचे पालकर यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षणामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

हाजगोळी मार्ग वाहतुकी करता बंद…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसामुळे हाजगोळी बंधाऱ्यावरील रस्त्याला भगदाड पडल्यामुळे सदर मार्ग धोकादायक झाला असून आजरा तहसीलदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून सदर मार्गावरून पंधरा दिवस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण डागडुजी झाल्याशिवाय सदर बंधाऱ्यावरुन वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहतुकी करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजरा पंचायत समितीत कृषी दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंचायत समिती सभागृह, आजरा येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान – महाराष्ट्र शासन कृषी विभाग – तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आजरा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पंचायत समिती, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. मा. श्री. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी दिन व हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष तहसीलदार श्री. समीर माने, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी, आजरा श्री. भूषण पाटील, कृषी अधिकारी श्री. व्ही. आर. दळवी, कृषी विस्तार अधिकारी श्री. ए. बी. मासाळ, मंडळ कृषी अधिकारी, आजरा श्री. पी. ए. माळी उपस्थित होते. प्रमुख वक्ते श्री राहुल टोपले, मिशन ऑरगॅनिक यांनी नैसर्गिक व पारंपारिक शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी व रिसोर्स फार्मर श्री. सूर्यकांत दोरुगडे यांनी भात लागवड तंत्रज्ञान याबद्दल या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष तहसीलदार श्री. समीर माने यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा केली आणि शेतकऱ्यांना व्यापारी पिके घेऊन उत्पन्न कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये भात व नाचणी तालुकास्तरीय स्पर्धा विजेते यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभार्थींना अनुदान वितरण पत्रे देऊन सत्कार करण्यात आले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी तसेच पंचायत समिती कृषी विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीम. तृप्ती पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले व श्रीमती स्वामिनी दातीर, कृषी सेवक यांनी आभार मानले.
यावेळी मा. पालक मंत्री यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद करुन हेक्टरी १२५ टन उत्पादन मोहिमेबद्दल आवाहन केले व कृषि दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बामनादेवी पतसंस्थेच्या चेअरमनपदी आनंदा नार्वेकर तर व्हा. चेअरमनपदी सुनीता पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जेऊर ता.आजरा येथील बामनादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी आनंदा नार्वेकर तर व्हा. चेअरमन सुनीता पोवार यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी टी. आर. खणदाळे होते.
यावेळी माजी चेअरमन कृष्णा गुडुळकर, दशरथ घुरे यांनी मनोगते व्यक्त केली
यावेळी संचालक मारुती चव्हाण, शामराव गुडुळकर, बंडू गुडुळकर यांच्यासह नूतन संचालक उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर तानाजी मिसाळ यांनी आभार मानले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात कृषी दिन व डॉक्टर्स दिन उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पं. दीनदयाळ विद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आजरा पंचायत समिती आजराचे कृषी अधिकारी श्री. प्रदीप माळी व सहाय्य कृषी अधिकारी संदीप कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यालयात शेती औजारांचे प्रदर्शन भरण्यात आले होते. या प्रदर्शनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कृषी दिन का साजरा केला जातो? भारत हा कृषिप्रधान देश आहे असं का म्हटलं जातं? शेतीच्या वापरासाठी वापरण्यात येणारे नवनवीन यंत्रे, जुनी लाकडी अवजारे यांची इत्यंभूत माहिती व त्यांचे उपयोग विद्यार्थ्यांना अगदी समजेल अशा भाषेमध्ये सांगितले.
डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजराचे डॉक्टर सुरजित पांडव ,डॉक्टर स्वाती रेडेकर यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आजरा भावेवाडी बस फेरी पूर्ववत चालू करा…
चितळे भागातील ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा ते भावेवाडी पर्यंत बस बस सेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी चितळे, जेऊर, भावेवाडी, धनगर वाडा ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर बस सेवा पूर्ववत चालू करावी. बस सेवा खंडित झाली असून शाळेतकरी मुलांचे, जेष्ठ नागरिकांचे बस अभावी हाल होत आहेत याची तहसीलदार यांनी दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर श्री. संजय सांबरेकर,श्री. मारुती विटु गुरव, अजित राणे, आनंदा भुतुर्ले , दिगंबर सरदेसाई, विश्राम गुरे बंडू सुतार, धोंडीबा मळेकर यांच्या सह्या आहेत.

निधन वार्ता
श्रीमती लीला भोई

शिवाजीनगर, आजरा येथील लीला भोई (वय ७२ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून, जावई व दोन नातवंडे असा परिवार आहे.
जयसिंग होडगे

मसोली ता. आजरा येथील जयसिंग रामू होडगे ( वय ५२ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
शांता देसाई
निंगुडगे ता. आजरा येथील श्रीमती शांता रामचंद्र देसाई ( वय ६२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, दोन जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे.
श्री. संतोष रामचंद्र देसाई यांच्या त्या आई होत.




