mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रदेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरुवार  ३ जुलै २०२५         

जून महिन्यातच झाला विक्रमी ७५० मिलिमीटर पाऊस, शंभरभर घरांची पडझड

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये जून महिन्यात गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून जून महिन्यात २३ दिवसात तब्बल ७५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शासन दरबारी ६४ घरांची पडझड व १३ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र पडझडीचा आकडा शंभरवर गेला आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

      मान्सूनपूर्व पावसाला जोडूनच मान्सूनचे आगमन दमदार पद्धतीने झाले. सर्फनाला, आंबेओहोळ हे प्रकल्प जून महिन्यातच तुडुंब झाले असून चित्री प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यास चित्री प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                पुराचा धोका वाढला...

       वेळेआधीच तालुक्यातील पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने यापुढे जोरदार पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणी थेट हिरण्यकेशी व चित्री नदीपात्रात जाणार असल्याने विशेषता गडहिंग्लज भागात पुराचा धोका वाढला आहे.

बेपत्ता झाले… नव्हे ते तर पंढरीला गेले...

   

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील एका वाडी वजा छोट्या गावातील एक व्यक्ती पाच दिवसापूर्वी घरातून निघून गेली. ती परत न आल्याने कुटुंबीयांची घालमेल सुरू झाली. पै- पाहुणे मित्रपरिवार यांच्यासह आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी करण्यात आली. अखेर त्यांची बेपत्ता म्हणून आजरा पोलीस स्टेशनला नोंद झाली.

        कोणालाही काहीही कल्पना न देता सदर व्यक्ती गायब झाल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. प्रत्यक्षात मात्र संबंधित व्यक्ती पंढरपुरात दिसल्याचे कुटुंबीयांना समजले अखेर त्यांना गावी आणण्यात आले. त्याला सुस्थितीत पाहून कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

अडीच लाखांच्या मुद्देमालासह दोन मंगळसूत्र चोरटे जेरबंद

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अमंलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे व समीर कांबळे (भादवण) यांनी चंदगड व गडहिंग्लज भागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने चंदगड व गडहिंग्लज परिसरातील सीसीटीव्ही कॅमरे व गोपनिय बातमीदार यांचेकडुन माहिती घेऊन चंदगड व गडहिंग्लज मध्ये जबरी चोरी करणा-या दोघांना हरळी बुद्रुक येथून ताब्यात घेतले आहे.

      आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना गडहिंग्लज येथे स्प्लेंडर मोटर सायकल वरुन येणार असलेची गोपनिय माहिती मिळाली, मिळालेल्या माहितीच्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना गडहिंग्लज येथे सापळा रचुन स्प्लेंडर मोटर सायकलवरील देवेंद्र दिंगबर पताडे ( वय १९ रा. विठठल मंदीर, वरची गल्ली, हरळी बुदुक ता. गडहिंग्लज ) व बाळु परशराम नाईक (वय २८ रा. नाईकवाडी जरळी ता. गडहिंग्लज) या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली व गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी देवेंद्र पताडे याने गेल्या पाच सहा दिवसापुर्वी तो व त्याचा मित्र बाळु नाईक असे दोघांनी जक्कनहटटी रोड, निठुर येथुन रात्रीचेवेळी जात असताना एका घरामध्ये जावुन घरातील वयस्कर महिलेकडे पिण्याचे पाणी मागणी केली व महिलेच्या गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसडा मारुन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मंगळसुत्र तुटुन तेथेच पडले .

त्यावेळी वयस्कर महिलेने आरडा ओरडा केलेने घरातील वयस्कर इसम व एक लहान मुलगा तेथे आला ते दोघेजण त्यांचेकडे येत असलेचे पाहुन दोघांनी कोयत्याने वयस्क इसमास व लहान मुलास मारहाण करुन जबर जखमी करुन तेथुन पळुन गेल्याचे सांगितले तर आरोपी देवेंद्र पताडे याने व त्याचा साथीदार असे दोघांनी गेल्या सहा महिन्यापुर्वी गडहिंग्लज येथील निर्जनस्थळी एका वृध्द महिलेला चाकुने मारहाण करुन तिचे गळयातील बोरमाळ व मंगळसुत्र चोरी केल्याचे सांगीतले.

     पोलिसांनी गुन्हयात चोरीस गेलेली बोरमाळ व मंगळसुत्र असा १४ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल , मोबाईल मोटरसायकल असा एकुण २,४०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

कौतुकास्पद…

स्वखर्चातून केली रस्त्याची डागडुजी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, वाहने जाताना खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचे शाळकरी मुले महिलावर्ग व वयोवृद्धांवर उडणारे शिंतोडे त्यातून निर्माण होणारी समस्या, रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना येणाऱ्या अडचणी, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष या सर्व बाबींचा विचार करून युवा कार्यकर्ते रणजीत सरदेसाई यांनी स्वखर्चातून मुरुम टाकून या समस्येवर मात करण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

      गांधीनगर मार्गावरील या रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावरील खड्डे मुजवावेत या मागणीकडे लक्ष देण्यास प्रशासनाला सवड नाही. त्यामुळेच सरदेसाई यांच्यासारख्या कार्यकर्त्यांने स्वखर्चाने केलेल्या या कामाचे कौतुक तर होत आहेच परंतु नगरपंचायतीच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकंदर कारभाराबाबत संताप ही व्यक्त होत आहे.

      धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ, गांधीनगरच्या कार्यकर्त्यांनी देसाई यांचा यथोचित गौरव करून आभार मानले आहेत.

संताजी पूल प्रश्नी उद्या शिवसेनेचे रास्ता रोको

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा-बुरुडे- महागांव रोडवर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून याबाबत आम्ही स्वतः अनेक वेळा संपर्क साधला व संबंधीत उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनी यांना वारंवार भेटून संबंधीत रस्त्याच्या दुरुस्तीची व सदर रस्त्यावरील संताजी पुलाची दुरुस्तीची मागणी केली परंतू, सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसेच या मार्गावरील बुरुडे येथील संताजी पुल याची मर्यादा संपली असून सदर पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ४ रोजी ठिक ११ वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे व उपजिल्हा प्रमुख श्री. संभाजी पाटील यांचे नेतृत्वाखाली संबंधीत रस्त्यावर व संताजी पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

      सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थित ठेवून तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन मिळावे तसेच सध्या मंजूर केलेल्या इस्टेमेंट मध्ये सीड फार्म ते वाटंगी फाटा संताजी पुलासहीत या रस्त्याच्या दुरुस्ती काम मंजूर करावे शिवाय सदरचे आंदोलन थांबविले जाणार नाही याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

      यावेळी सुनिल डोंगरे उपतालुका प्रमुख,
ओंकार माद्याळकर शहर प्रमुख , संजय येसादे तालुका संघटक,युवराज पोवार तालुका प्रमुख, श्रीम. वैशाली गुरव सरपंच,  सुनिल बागवे उपसरपंच, बुरुडे, सौ. प्रमिला पाटील उपसरपंच, हात्तिवडे, विलास जोशिलकर सरपंच मेंढोली, महेश पाटील उपजिल्हा प्रमुख, युवासेना ,चंदर पाटील उपतालुका संघटक, समीर चाँद उपशहर प्रमुख ,दिनेश कांबळे विभाग प्रमुख, सुयश पाटील, उपतालुका प्रमुख, युवासेना,सौ. गीता देसाई महिला आघाडी प्रमुख, शिवाजी आढाव उपतालुका प्रमुख, संजय कांबळे ग्रा.पं. सदस्य आदी उपस्थित होते.

बुरूडेतील भावेश्वरी सेवा संस्थेची १०० टक्के कर्ज वसुली

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बुरूडे येथील श्री भावेश्वरी विकास सेवा संस्थेची संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झाली. संस्थेने ४५ लाखांवर मध्यम मुदत व पीक कर्ज वाटप केले होते. ३० जूनपूर्वी या संस्थेने शंभर टक्के कर्ज वसुली केली. याकामी संस्थेचे चेअरमन डॉ. दिपक सातोस्कर, व्हा. चेअरमन सुनील बागवे, सर्व संचालक, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, बँक निरिक्षक विजय कुंभार, संस्थेचे सचिव दत्तात्रय पाटील यांचे सहकार्य लाभले. 

     आज आरोग्य शिबीराचे आयोजन…

      आजरा तालुक्यातील सहकारी संस्थातील गटसचिव यांची आरोग्य तपासणी आज गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत सहाय्यक निबंधक कार्यालय, आजरा येथे करण्यात येणार आहे.

     शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेची संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

निधन वार्ता
डॉ. शिवाजी कातकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेद्रेवाडी ता. आजरा येथील डॉ. शिवाजी उर्फ अविनाश भाऊसाहेब कातकर ( वय ७२वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे व दोन भाऊ असा परिवार आहे. अशोक कातकर यांचे ते बंधु होत. दिवस कार्य ११ जुलै रोजी पेद्रेवाडी येथे आहे.ते उल्हासनगर जि. ठाणे येथील शांतीनगर येथे डॉक्टरी सेवा बजावीत होते.

 

संबंधित पोस्ट

कोवाडे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

अखेर पेरणोली-हरपवडे धनगरवाडा “प्रकाश’मय

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

mrityunjay mahanews

मुंगूसवाडी येथे मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!