बुधवार दि.५ नोव्हेंबर २०२५

शाळेतील तिसऱ्या डोळ्याची चोरी...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या आजरा येथील उर्दू हायस्कूल मधील चार सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेल्या प्रकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सलीम महम्मदहनीफ शेख यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली असून या प्रकरणी मदरसा कॉलनीतील एका संशयितने आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सदर चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तीन नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित संशयिताने इतर दोन सहकाऱ्यांच्या सोबत शाळेच्या आवारात प्रवेश करून शाळेच्या पोर्चमधील बुलेट कॅमेरे, डोम-दोन सीसीटीव्ही कॅमेरे असे साहित्य लंपास केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

महिलेचा अपघाती मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंढरपूर येथे कार्तिकी वारीसाठी गेलेल्या निंगुडगे ता. आजरा येथील सौ. इंदुबाई भिकाजी परीट (वय ६९ वर्षे) यांचा रस्ता ओलांडताना सोलापूर नजिकच्या मार्गावर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे.

निवडणुकांचे बिगूल वाजले…
आघाड्या बांधणीसाठी हालचाली वेगावल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाड्यांच्या मागणीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. १० नोव्हेंबर पासून निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. ऐनवेळी गडबड नको म्हणून प्रभागवार प्राथमिक उमेदवारांची चर्चा व निश्चिती करण्यास सुरुवात झाली आहे.
सद्यस्थितीस अशोक अण्णा चराटी/भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन एक आघाडी तर दुसरीकडे काँग्रेस, अन्याय निवारण समिती, शिवसेना उबाठासह उर्वरित मंडळी एकत्रित येऊन आघाडी स्थापन होण्याची चिन्हे आहेत.
उमेदवार निश्चितीसाठी कालावधी कमी असल्याने दोन्ही आघाड्यांकडून सक्षम उमेदवारांवर खाजगीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.तशा संबंधितांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून कागदपत्रांची जमवाजमव करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एकंदर परिस्थिती पाहता यावेळी निवडणूक अत्यंत चुरशीने होणार हे स्पष्ट होत आहे. दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल.
निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणाही सक्रिय झाली आहे.

नगराध्यक्ष पदाचा मीच दावेदार… मंजूर मुजावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्वसामान्यांशी असणारे जवळचे संबंध, समाजकार्याची आवड व तरुण उमेदवार म्हणून आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा मीच दावेदार असून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणुकीला सामोरे जाणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्ते मंजूर मुजावर यांनी व्यक्त केला.
मुजावर म्हणाले, गरीब, श्रीमंत, जात, धर्म या पलीकडे जाऊन आपण कोरोना कालावधीसह आजतागायत सामाजिक कार्य करत आलो आहोत. कोणालाही व कसल्याही प्रकारची मदत देण्यात आपण कधीच मागे हटलो नाही. सध्या शहराला प्रस्थापित मंडळींशिवाय नव्या चेहऱ्याची नगराध्यक्ष म्हणून गरज आहे. नगरपंचायत झाल्यापासून शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून तो अंमलात आणण्याची गरज आहे . यामध्ये आपण कोठेच कमी पडणार नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रस्थापितांच्या विरोधात आपण येत्या नगरपंचायत निवडणूकीला सामोरे जाणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातून सुरेश मिटके यांना उमेदवारी मिळावी…
पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्याच्या पश्चिम भागातील कोणत्याही उमेदवाराला आजतागायत जिल्हा परिषदे करता उमेदवारी मिळालेली नाही. सुरेश मिटके हे पश्चिम भागातील सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले व समाज मान्य नेतृत्व आहे. यामुळे यावेळी त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी मतदारसंघाच्या व तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्याकडे कार्यकर्त्यांनी संघटीतरीत्या केली आहे.
सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची अनेक कामे मार्गी लावण्यात मिटके यांचा पुढाकार राहिलेला आहे. बुडीत क्षेत्रातील वाढीव रकमेचा दावा दाखल करणे, प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळवून देणे, गावठाण मधील घरांचा निवाडा, प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात घरे बांधता येतील अशा पद्धतीने पाठपुरावा करणे, दूध संस्था, पतसंस्था, विकास सेवा संस्था यामध्ये असणारा प्रदीर्घ अनुभव, भागातील तरुणांना दिलेला रोजगार, प्रकल्पग्रस्तांना राखीव कोठ्यातून गोकुळ मध्ये केलेली नोकर भरती या विविध कामांमध्ये ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी आजरा साखर कारखाना संचालक गोविंद पाटील, जनता बँकेचे संचालक संतोष पाटील, प्रकाश मोरूस्कर, उदय कोडक, अविनाश हेब्बाळकर, देवदास बोलके, संजय गुरव, गोपाळ ढोकरे, सहदेव प्रभू, विष्णू पाटील यांच्यासह पश्चिम भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आलेले आहे.
निवेदनात म्हंटले आहे, सततच्या पावसामुळे सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिकांचे नुकसान होत आहे. भाताने जमिनीवर लोळण घेतली असून पावसामुळे त्यांची कापणी करणे अडचणीचे झालेले आहे. नागली पिकाचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. सोयाबीन, भुईमूग, भात आणी ऊस पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पुरेसे उत्पादन मिळणार नाही. आधीच कर्जाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी पावसामुळे घाईला आलेला आहे. त्याच्या कष्टाची परिसीमा उरलेली नाही. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सोडवण्यासाठी त्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी काँ. शांताराम पाटील, कॉ. धोंडिबा कुंभार,संजय घाटगे, नारायण राणे, शांताराम हरेर, मनपा बोलके, सुनिल कडाकणे, विठ्ठल बामणे, गणपती ढोणूक्षे, हिंदूराव कांबळे यांच्यासह भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.


