मंगळवार दि.४ नोव्हेंबर २०२५

त्रांगड….
विचित्र आघाड्यांची शक्यता…

ज्योतिप्रसाद सावंत…
आजरा नगरपंचायतीकरता निवडणूक कार्यक्रम केंव्हाही जाहीर होऊ शकतो. निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकंदर परिस्थिती व सुरू असणाऱ्या हालचाली पाहता नगरपंचायतीमध्ये विचित्र व अशक्य अशा आघाड्या अस्तित्वात येण्याची शक्यता दिसू लागली आहे. जिल्ह्यातील व राज्यातील राजकारणाला फाटा देत या आघाड्या होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायतीवर अण्णाभाऊ गटाचे पर्यायाने ताराराणी आघाडीचे वर्चस्व राहिले. अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्याकडे नगरपंचायतीचा कारभार राहिला. नगरपंचायतीतील नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षातील एकंदर रुबाब (?) पाहून यावेळी इच्छुकांची संख्या वाढली आहे. मावळत्या सभागृहातील अनेक नगरसेवक यावेळीही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ताराराणी आघाडी, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांना गत निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळाले होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याने व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये उभी फूट पडल्याने येत्या निवडणुकीत आघाड्यांचे संदर्भ बदलले आहेत.
पुन्हा एक वेळ नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी अशोक चराटी व त्यांच्या समर्थकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. कोणत्याही एका गटाला/पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचणे यावेळी अशक्य आहे. यामुळे सोयीच्या व राजकीय मतभेद बाजूला ठेवून समविचारी मंडळींच्या (?) आघाड्या स्थापण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
कांही आघाड्यांमध्ये व्यक्तीद्वेषाचे राजकारणही सुरू झाले आहे. यामुळे जुळत आलेल्या आघाड्याही विस्कटत चालल्या आहेत. तर नवीन आघाड्या उदयास येऊ लागल्या आहेत.या सर्व प्रकारात अनेकांच्या वाट्याला ‘सासू’च येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीस चराटी यांच्या गटाकडून अशोक चराटी हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असा शिक्कामोर्तब करून नगरसेवक पदांच्या उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. दुसरीकडे अबूताहेर तकिलदार यांचे प्रचार फलक आतापासूनच शहरभर झळकू लागले आहेत. अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, सुधीर कुंभार, परशुराम बामणे हेदेखील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
होत असलेल्या आघाड्यांमध्ये प्राधान्याने शहरातील सर्वच प्रमुख नेतेमंडळींच्या वारसांना राजकीय दृष्ट्या स्थिर स्थावर करण्याच्या धडपडीमुळेच विचित्र आघाड्या तयार होत आहेत हे स्वतंत्र सांगण्याची सध्यातरी गरज वाटत नाही.
आवाक्यापलीकडील खर्चामुळे अनेकजण रिंगणाबाहेर…
सध्या सर्वच निवडणुकांमध्ये येणारा प्रचंड खर्च हा निश्चितच सर्वसामान्यांना पेलणारा नाही . नगरपंचायती करताही अनेक जण इच्छुक असूनही केवळ खर्चाच्या धास्तीने पात्रता असूनही निवडणूक रिंगणाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

आजरा आगाराला शहाणपण येणार कधी…?
गोवा राज्य परिवहन महामंडळाने सुरू केल्या पणजी -आदमापुर- कोल्हापूर फेऱ्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वारंवार प्रवाशांनी मागणी करूनही प्रवाशांच्या विविध फेऱ्यांच्या या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता द्यायच्या आणि इतर आगारांनी संबंधित मार्गावर बस फेऱ्या सुरू केल्या की त्यांचे उत्पन्न पहात बसायचे असा प्रकार आजरा आगाराकडून सुरू असून आगाराला शहाणपण येणार तरी कधी ? असा सवाल उपस्थित होण्याजोगी सध्या परिस्थिती आहे.
आगाराने अनेक मार्गावरील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. आगार होण्यापूर्वी सांगली, इचलकरंजी, मुरगुड, गारगोटी, घटप्रभा यासह विविध फेऱ्या सुरू होत्या. आगार झाल्यानंतर मात्र या फेऱ्या बंद होत गेल्या. गारगोटी, आदमापूर, मुरगुड या मार्गावर जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. गाड्या बदलत प्रवास करणे अडचणीचे होत असल्याने या मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात आहे. ही मागणी गांभीर्याने घेतली गेली नसतानाच गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पणजी- आदमापुर -कोल्हापूर अशा बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची कोकणासह आदमापुरला जाण्याची सोय झाली असली तरी आजरा आगाराने हा प्रयोग करणे फारसे अवघड नव्हते.
अजूनही आगाराने या मार्गावर बस फेऱ्या सुरू केल्यास त्याला निश्चितच प्रतिसाद मिळू शकतो. पण हे शहाणपण येणार कधी ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे

आजरा शहरातील क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करावी
शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा येथील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे व पाच कोटी रुपये खर्चून सुरू असणाऱ्या मैदानातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात गेली ५ वर्ष आजरा गांधीनगर येथे क्रीडा संकुलाचे काम चालू आहे. यामध्ये क्रीडा संकुलाची इमारत पूर्ण होऊन २ वर्ष झाली तरीही इमारत क्रीडा विभागाने खेळाडूंसाठी खुली केलेली नाही. आजरा तालुक्यातील खेळाडू वेगवेगळ्या खेळात जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात यश मिळवत आहेत. तर दुसरीकडे क्रीडा संकुलाची इमारत धुळखात पडलेली आहे. निवेदन देऊनही क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांनी कोणताही कर्मचारी नेमणूक केलेली नाही. त्याच बरोबर मैदानाच्या कामासाठी ५ कोटी रुपये खर्च केलेला असून अद्यापही मैदान किंवा धावपट्टी पूर्ण झालेली नाही. उलट या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.यासाठी शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने क्रीडा संकुल गांधीनगर येथे शुक्रवार दि.७ रोजी सर्व प्रकाराची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी करून संबंधीतावर कडक कारवाई करावी यासाठी निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन संबंधित विभागांना देण्यात आले असून निवेदनावर शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख युवराज पोवार, रोहन गिरी, अमित गुरव, सुयश पाटील आदींच्या सह्या आहेत.

हैदर नगर मध्ये पाणीपुरवठा योग्य दाबाने व नियमित करा
अन्याय निवारण समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील हैदरनगर वसाहतीतील रहिवाशांच्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व हैदरनगर वसाहतीचे नागरिक यांच्या वतीने मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,नगरपंचायतीमार्फत हैदरनगर वसाहतीसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी सध्या त्या भागात अत्यंत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे, ज्यामुळे रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर समितीने नगरपंचायतीकडे
पाणीपुरवठ्यातील तांत्रिक दोषांचा तातडीने शोध घेऊन सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, संपूर्ण वसाहतीत योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा तसेच हैदरनगर परिसरात लवकरच होणाऱ्या रस्त्यांच्या कामांपूर्वी पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत व दोषमुक्त करावा, जेणेकरून नंतर दुरुस्तीच्या कारणास्तव नव्याने केलेले रस्ते उकरण्याची वेळ येणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर हैदरनगर वसाहतीमधील रहिवाशांच्या सह्या आहेत.
निवेदन देतेवेळी अन्याय निवारण समिती अध्यक्ष श्री. परशुराम बामणे , जोतीबा आजगेकर, मिनीन डिसोझा, मदन तानवडे,
जावेद पठाण, रौनक कारेकर, अली भडगांवकर, सुभाष कांबळे,ईलहान भडगांवकर हजर होते.

पावसाची उघडीप…
सुगीची कामे वेगावली
कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिली असल्याने लांबलेली सुगीची शेती कामे वेगावली आहेत. कारखाना गळीत हंगामास सुरुवात झाली आहे.
ऐन सुगीच्या कालावधीत पावसाने जोरदार व सातत्याने हजेरी लावल्यामुळे यावर्षी सुगी लांबली आहे. काल दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. वातावरण स्वच्छ राहिल्याने शेतकरी वर्गाने भात कापणीसह मळणीला प्राधान्य दिले. दिवसभर शिवारे गजबजून गेली होती. एकीकडे भुईमूग काढण्यासह भात कापणी व मागणीची कामे वेगावली असताना दुसरीकडे गेले आठ-दहा दिवस बसून असणाऱ्या साखर कारखान्यांच्या तोडणी व ओढणी यंत्रणा सक्रिय झाल्या असून वाहतुकी करता सुलभ असणाऱ्या रस्त्याशेजारील उसाच्या उचलीस प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरीही जमिनीमध्ये पाणी असल्याने कापणी केलेले भात ओढवून मळणीसाठी इतरत्र नेताना शेतकरी वर्गाची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.


