mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.२५ जानेवारी २०२६

चालत्या चार चाकीने घेतला पेट…
सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – गडहिंग्लज मार्गावर हाजगोळी तिठ्ठ्याच्या पुढील बाजूस काल शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चालत्या महिंद्रा एस यु व्ही चारचाकीने अचानक पेट घेतल्याने चार चाकी आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने चालकासह इतर प्रवाशांनी गाडीची पाठीमागील काच फोडून बाहेर पडण्यात यश मिळवल्याने जीवित हानी झाली नाही.

याबाबत प्रत्यक्ष दर्शिंनी दिलेली माहिती अशी …

सोहाळे येथून गडहिंग्लजच्या दिशेने सदर चार चाकी चालली असताना गाडीच्या पुढील बाजूस धूर येऊ लागल्याने गाडी थांबवली. परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेतला. याच दरम्यान आजरा येथील मंजूर मुजावर, मौलाना खालीप हे गडहिंग्लज वरून आजऱ्याच्या दिशेने येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी थांबून गाडीतील प्रवाशांना पाठीमागील बाजूने बाहेर काढले व आजरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. परंतु दरम्यानच्या कालावधीत चार चाकी पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

शॉर्टसर्किटने सदर आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

गजरगाव येथे तरुणाची आत्महत्या


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गजरगाव ता. आजरा येथील विशाल आनंदा कोंडुस्कर ( वय २५ वर्षे) याने घराच्या छताच्या लोखंडी वाशाला गळफास घेऊन शनिवार दिनांक २४ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबतची वर्दी अशोक गणपती खुळे रा. गजरगाव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.

शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादीला विजयी करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हाजगोळी खुर्द गावचा कायापालट करण्यासाठी व शाश्वत विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केले.

हाजगोळी खुर्द ता. आजरा येथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष देसाई व भादवण पंचायत समितीच्या उमेदवार सौ. जयश्री गाडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ बोलत होते.

यावेळी आजरा कारखान्याचे चेअरमन मुकुंद देसाई, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मारुतराव घोरपडे, दिपक देसाई, गणपतराव सांगले, संभाजीराव तांबेकर, विजय वांगणेकर, संजय येजरे, अनिकेत कवळेकर, आनंद घाडगे, हाजगोळी खुर्द येथील डॉ. सुधाकर जाधव, माजी उपसरपंच रवींद्र जाधव, प्ररसु सुतार, बाबुराव सुतार, विश्वास जाधव, रघुनाथ गिलबिले, लता जाधव, सरिता केसरकर, गीताताई सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निधन वार्ता
पॉल फर्नांडिस

आजरा येथील गोवा स्थित उद्योजक पॉल जॉन फर्नांडिस यांचे गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ४३ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी व आई असा परिवार आहे. उद्या सोमवारी आजरा येथे त्यांचा दफन विधी होणार आहे.

शांताबाई गुरव

धामणे ता. आजरा येथील शांताबाई शंकर गुरव ( वय ८४ ) वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगी, नात, नात,नातसून असा परिवार आहे.

गणपती पाटील

आरदाळ ता. आजरा येथील गणपती भीमराव गेंगे- पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवा सोसायटीचे सदस्य सुनील गेंगे पाटील यांचे ते वडील होत.

आजरा साखर कारखान्यात फायर सेफ्टी सेमिनार संपन्न


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गवसे ता. आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये ‘ फायर अँड सेफ्टी ‘ याविषयी सेमिनार उत्साहात संपन्न झाले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या सेमिनारचं आयोजन करण्यात आले होते.

साखर कारखान्यामध्ये सुरक्षा विभागाकडील कर्मचारी हा कायम तीन शिफ्ट मध्ये काम करत असतो त्यामुळे खास करून सुरक्षा विभागाकडील कर्मचाऱ्यांसाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कारखान्यात आगीसारख्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावयाची, आपल्याकडे असणाऱ्या हायड्रंट सिस्टीमचा वापर कसा करावयाचा, फायर इन्स्टिट्यूशन कसे वापरायचे, असेंबली पॉईंट चा वापर कसा करायचा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य कसे करावे . याविषयीची सविस्तर माहिती आणि डेमो दाखवण्यात आले. सेमिनार मध्ये ट्रेनर म्हणून गडहिंग्लज येथील दीप फायरचे अरविंद देसाई यांनी काम पाहिले. यावेळी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, सेफ्टी ऑफिसर् रमेश देसाई यांच्यासह इतर विभागाचे ही प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एस. के.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!