mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


उत्तुर येथे चोरी…
सोन्या चांदीचे दागिने लंपास

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    उत्तुर ता. आजरा येथे श्रीमती सुजाता सुभाष धुरे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करून घरातील सुमारे ६६ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुनी पोस्ट गल्ली, उत्तूर येथे राहणाऱ्या सुजाता धुरे या ६ जुलै ते १० जुलै या कालावधीत बाहेरगावी गेल्या असता अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची फिर्याद सुजाता धुरे यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

किणे येथील चंद्रकांत शेंदरकर यांची ‘नासा’ मध्ये निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     किणे ता. आजरा येथील चंद्रकांत विष्णू शेंदरकर यांची ‘नासा’ या संशोधन केंद्र मध्ये निवड झाली आहे. दादर /मुंबई स्थित शेंदरकर हे गिरणी कामगारांचे चिरंजीव असून आजरा तालुक्यातून ‘नासा’ संशोधन केंद्रामध्ये निवड झालेला तो तालुक्यातील एकमेव विद्यार्थी आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जागतिक लोकसंख्या दिनानिमीत्ताने जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

     या कार्यक्रमाच्या माहिती फलकाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय आजरा चे रूग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी श्री. विजय थोरवत यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल पाटील यानी हा दिवस साजरा करण्या मागील हेतू विशद केला. तसेच आरोग्य सेवक श्री युनुस सय्यद यांनी लोकसंख्या दीनाची उपस्थिताना माहिती दिली.

       या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. शामसुंदर सागर डॉ. तेऊरवाडकर ,सौ.ऊर्जादवी पाटील व सौ.वैशाली पाटील अधिपरिचारीका व श्री. गंधाडे, श्री. उपासे, श्री. सोपान बुधवंत, श्री. मकानदार, श्री. कुराडे व नागरिक उपस्थित होते.


लोकसंख्या वाढ सकारात्मक घेतल्यास देशाचा विकास घडवून आणता येईल : 
डॉ.वृषाली हेरेकर.

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आजरा महाविद्यालयामध्ये भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने लोकसंख्या विस्फोट एक आव्हान या विषयावर प्रा. डॉ. वृषाली हेरेकर, शिवराज कॉलेज, गडहिंग्लज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

     याप्रसंगी बोलताना वृषाली हेरेकर म्हणाल्या, की, वाढती लोकसंख्या सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळली तर या कार्यकारी लोकसंख्येचा वापर देशातील साधनसंपत्तीच्या विकासासाठी करता येतो. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करता येते. या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तू व सेवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचवून अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणता येतो.
देशातील मृत्यूदर कमालीचा घटत असल्याने लोकसंख्या विस्फोट होत आहे. वाढत्या लोकसंख्येने आरोग्य, बेकारी, साधनसंपत्तीचा तुटवडा, पर्यावरण प्रदूषण व ऱ्हास होत आहे. या करिता लोकसंख्येचे वाढ कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये लोकसंख्याविषयक शिक्षण देण्याची गरज आहे. याशिवाय जनजागृतीची आवश्यकता आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विकासाचा व वाढत्या लोकसंख्येचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासामध्ये होत आहे. असे प्रतिपादन केले. पर्यावरण संवर्धनासाठी शाश्वत विकासाची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक, श्री. योगेश पाटील, डॉ. सलमा मणेर, प्रा. शेखर शिऊडकर, डॉ. आप्पासो बुडके, डॉ. धनंजय पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     स्वागत व प्रास्ताविक डॉ. संजय चव्हाण, प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.अनिल निर्मळे, आभार डॉ. महेंद्र जाधव व सूत्रसंचालन आणि आयोजन डॉ. रणजीत पवार यांनी केले.

भाजपाची बैठक उत्साहात


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार आजरा मंडलची बैठक उत्साहात पार पडली.

     या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर होते. यावेळी माजी जिल्हाधक्ष्य हिंदुराव शेळके,जेष्ठ नेते बाबा देसाई, मंडल अध्यक्ष अनिरुद्ध(बाळ)केसरकर, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ .दीपक सातोसकर, भाजपा जिल्हा चिटणीस सी. आर. देसाई सर,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश मुळीक, अभियांत्रिकी सेल जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, तालुका सरचिटणीस अतिशकुमार देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना चराटी , तालुका अधक्षा वर्षा बागडी ,शहर अधक्षा माधवी पाचवडेकर , भाजपा तालुका उपाध्यक्ष लहू वाकर, सुरेश पाटील,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष संदीप गुरव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संग्राम पाटील,संदीप पाटील यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती करू नका…
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे महावितरण ला निवेदन

        आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    हमहावितरण कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असल्याबद्दलचे धोरण जाहीर केले आहे. तसेच हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्स नुसार मीटरचा खर्च प्रति मीटर रुपये बारा हजार याप्रमाणे आहे. प्रीपेड मीटर साठी केंद्र सरकारचे प्रतिमिटर ९०० रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी रु. १११००/- इतका खर्च कर्ज काढून केला जाणार आहे. या कर्जास ग्राहक या नात्याने कदापिही मान्यता असणार नाही व हे मीटर ग्राहक स्वीकारणार नाहीत .

     त्यामुळे हा खर्च लादण्याचा प्रयत्न महावितरणने करू नये. हे मीटर्स वापरणार नसल्यामुळे मीटर वापराची सक्ती करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ व ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.

     यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे आजरा तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, शंकरराव शिंदे, संभाजीराव इंजल ,प्रकाश देसाई, महादेवराव पवार, दत्तात्रय मोहिते, सि.डी. सरदेसाई,सी.आर. देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाऊस -पाणी

चित्री मध्यम प्रकल्प पाणीसाठा ११४६ दशलक्ष घनफूट ( ६०.७७%)

आंबे ओहोळ मध्यम प्रकल्प पाणीसाठा १०२४ दशलक्ष घनफूट (८३%)


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण…ओढ्याच्या पाण्यात पडून किटवडे येथील एकाचा मृत्यू…जनता बँकेने नवउद्योजक निर्माण केले : खासदार संजय मंडलिक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

स्वामी विवेकानंद पतसंस्था ही जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था : चंद्रकांत दादा पाटील…कोरीवडे येथे चोरी…आजरा तालुक्यात जोरदार पाऊस

mrityunjay mahanews
error: Content is protected !!