

कुपवाड येथील तरुणाचा आजऱ्यात मृत्यू

कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली येथील परशुराम वसंत शिंदे या ३५ वर्षीय तरुणाचा आजरा आंबोली मार्गावर हॉटेल सरकार समोर आकस्मिक मृत्यू झाला.
परशुराम हे तेलाचा टँकर घेऊन सावंतवाडीला गेले होते. तेथे टॅंकर रिकामा करून पुन्हा मिरजेच्या दिशेने जात असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी टँकर सरकार हॉटेल समोर थांबवला. तेथेच ते बेशुद्ध झाले. उपचारासाठी त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परशुराम हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. आजरा पोलिसात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


नार्वेकर पेट्रोल पंपाचे आजऱ्यात उत्साहात उद्घाटन

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या नार्वेकर पेट्रोल पंपाचे उद्घाटन गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे व सौ. पद्मजा आपटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
पेट्रोल पंपाचे मालक नामदेवराव नार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आजऱ्यासह कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन एमआयडीसी येथे सुरू करण्यात आलेल्या या पंपावर पेट्रोल डिझेल सह पावर पेट्रोलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीला २४ तास सेवा, प्रथमोपचार सुविधा, मुबलक पाणी, सुरक्षित पार्किंग, मोफत हवा, महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृह, आग प्रतिबंधक साधने अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच सीएनजी गॅस सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, अल्बर्ट डिसोझा, विलास नाईक, अमृत पाटील, संजयभाऊ सावंत, सौ. रचना होलम, राजू होलम, रणजीत देसाई,सौ. मनीषा देसाई, गोविंद पाटील, केशव खामकर, दशरथ होलम, आनंदराव पोवार,अशोक जांभळे, सहदेव नेवगे, सतीश कोगेकर,सुरेश मिटके, लहू पाटील, नंदकुमार सरदेसाई, निवृत्ती कांबळे, गुणाजी होलम, श्रीकांत हातकर, संभाजी देसाई (हिरलगे)पांडुरंग पाटील, सुरेश रेडेकर गणेश नार्वेकर, कृष्णा कदम,अभिषेक देसाई, साईश गोटेकर,सौ.स्वप्नाली पोवार,सुजाता नार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सूर्यकांत उर्फ रोहित नार्वेकर यांनी आभार मानले.


व्यक्तित्व निखरण्यासाठी वाचा, अभिव्यक्त व्हा- डॉ. शिवाजीराव होडगे

शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत आजरा महाविद्यालयातील भाषा भगिनी मंचच्या वतीने ‘भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुडचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजीराव होडगे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वतःहून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्यासाठी भाषिक कौशल्य विकास अत्यंत गरजेचा असून त्यामुळे माणसाचे आंतरिक सौंदर्य घडते. पण भाषिक कौशल्य विकासासाठी प्रामुख्याने वाचन क्षमता विकसित करून अविरत व्यासंग जपणे अत्यावश्यक आहे. तरच आपले अंतरंग बाह्यांगासह निखरेल. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. होडगे म्हणाले, अभिव्यक्त होण्यासाठी आधी विचारांची साठवण व्हावी. त्यासाठी विविध अभिजात लेखकांच्या पुस्तकांचे केवळ वाचनच नव्हे तर पारायणे करावीत. बोलण्याची शैली, आवाजातील लयदारपणा आणि देहबोलीतून आपले अभिव्यक्त होणे विकसित केल्यास व्यक्तिमत्वास वेगळा घाट मिळेल. यावेळी त्यांनी काही सुप्रसिद्ध वक्त्यांसह कार्यकर्ते आणि अभिनेत्यांच्या व्हीडिओ क्लिप्स ऐकवल्या. कार्यशाळेतील दुपारच्या सत्रात मार्गदर्शक डॉ. निलेश शेळके यांनी लेखन कौशल्यातील किरकोळ पण मोठा घोळ करू शकणाऱ्या दोषांबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रत्यक्षिकांद्वारे केले. तसेच नवनिर्मिती प्रक्रियाही उदाहरणांसह स्पष्ट केली. ‘भाषा -भगिनी मंच’ समन्वयक डॉ. अशोक बाचूळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना महाविद्यालयात आयोजित सर्वच उपक्रम विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरतील असेच असतात. त्याचा वेळीच लाभ घेत आपले करिअर घडवण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सादळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देत कार्यशाळा उद्घाटन झाले.
यावेळी अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. मल्हारराव ठोंबरे यांच्यासह आजरा, गडहिंग्लज, चंदगड परिसरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप सत्रात कुमारी आदिती देसाई आणि प्राध्यापिका विजया कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सहभागी सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, मुरगुडचे ग्रंथपाल श्री. तानाजी सातपुते, प्रा. अविनाश वर्धन, प्रा. शेखर शिऊडकर, प्रा. अलका मुंगुर्डेकर, प्रा. संतोष माने, प्रा. भिमराव शिंदे, प्रा. अनुराधा गोटखिंडे आदींसह भाषा-भगिनी परिवार सदस्य उपस्थित होते. प्रा.बाळासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी कार्यशाळा समारोप केला. डॉ. आनंद बल्लाळ आणि प्रा. स्मिता पाटील यांनी आभार मानले.




