mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५       

पहलगाम’ घटनेचा आजरा तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा.

      पहलगाम येथे भारताच्या पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा आजरा येथे उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी चौकात काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांनी दहशतवादाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

      शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यालयापासून शिवसैनिक घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी चौकात आले. यावेळी पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता केंद्र शासनाने तातडीने उपाययोजना करावी, आतंकवादी पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली.

    यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, संजय येसादे, गिरणी कामगार संघटनेचे कॉ. शांताराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून पहलगाम येथील घटनेचा निषेध केला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, रवी तळेवाडीकर, राजू बंडगर, महेश पाटील,रवी सावंत, संभाजी इंजल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

‘आजरा’च्या संचालक मंडळाची खासदार शरद पवार यांच्याशी भेट

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी कारखान्याचे संचालक मंडळासमवेत देशाचे नेते खासदार श्री. शरद पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रावर सदिच्छा भेट घेतली.

      या भेटीवेळी कारखान्या समोरील असलेल्या अडचणी बाबत चर्चा झाली. यावेळी गवसे व दर्डेवाडी ही गांवे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत. या बाबत मार्ग काढण्याचे आश्वासन खा पवार यांनी दिले.

     यावेळी व्हाईस चेअरमन श्री. सुभाष देसाई , जेष्ठ संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, श्री. रणजीत देसाई, श्री. अशोक तर्डेकर, श्री. रशिद पठाण, श्री. दिगंबर देसाई, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजाराम होलम, कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत, सेक्रेटरी श्री. व्यंकटेश ज्योती व डेप्युटी चिफ अकौंटंट श्री. रमेश वांगणेकर इत्यादी उपस्थित होते.

भारत नगरवासियांचे आंदोलन सुरूच..

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी रहीवाशांनी मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा काढून मागण्यांच्याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपंचायतीच्या आवारात ठिय्या ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. यानुसार सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच राहिले.

      आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली वीस ते बावीस वर्षापासून पायाभूत सुविधा नाहीत, रहिवाशांनी सुविधेबाबत अनेकदा तक्रार अर्ज दिलेले आहेत.मात्र याची दखल घेतली गेलेली नाही. भारतनगरमध्ये रस्ते करावेत. गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याची व्यवस्था करावी, खुल्या जागेमध्ये लहान मूलांसाठी अंगणवाडी, मुलांना खेळण्यासाठी बगीचा तयार करावा रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी. भारत नगर सुरू असणाऱ्या कामांची यादी व कागदपत्रे संघटनेला मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

      मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत,जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, मकसूद माणगावकर, चांगुणा सुतार तौषिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख,गुलाब शिकलगार, यासीन सय्यद यांच्यासह रहिवाशी सहभागी झाले आहेत.

निधन वार्ता
सौ.लक्ष्मीबाई पाटील

            उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     उत्तुर ता. आजारा येथील सौ लक्ष्मीबाई दौलतराव पाटील (वय ७० वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

       आंतरभारती शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दौलतराव पाटील यांच्या त्या पत्नी व ॲड. सौ सुनीता संजय पोवार यांच्या त्या मातोश्री व ॲड.संजय पोवार यांच्या सासुबाई होत .

पहलगाम हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.जुम्मा नमाज नंतर एकत्र येत हातावर काळ्या पट्टया लावून निषेध केला.

      पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.काश्मीर मध्ये शांतता निर्माण झाली असताना हा भ्याड हल्ला म्हणजे शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. अशा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

      यावेळी आलम नाईकवाडे, मौलाना अब्दुल रहेमान कांडगांवकर, डॉ.ए.एस.दरवाजकर, अबू पठाण, फैयाज पठाण,रजाक सोनेखान,फारुक नसरदी, हुसेन सोनेखान, जमील निशानदार, मौलाना जकरीया काकतीकर,इजाज काकतीकर, रियाज लमतुरे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

       आजरा शहरातील प्रत्येक मशिदीसमोर नमाज नंतर एकत्र येत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.

रवळनाथतर्फे यमगेच्या बिरदेव डोणे याचा सत्कार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे यमगे, ता. कागल येथील कु. बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याबद्दल रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

       केवळ १० गुंठे जमीन आणि मेंढपाळाचे काम अशा प्रतिकुल परिस्थितीत त्याने जिद्दीने उच्च शिक्षण घेतले आणि प्रशासकीय सेवेत जाणेचा निर्णय घेतला. त्याने अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रम घेऊन आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले, त्याचे हे उत्तुंग यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

       रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल चौगुले यांनी त्याची माहिती घेतली आणि सध्या तो वास्तव्यास असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील जोडकुरळी येथे जाऊन त्याचा हा सत्कार करण्यात आला.

       रवळनाथतर्फे नेहमीच समाजातील यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो तसेच त्यांना प्रोत्साहन दिले जाते ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जावेत या उद्देशाने रवळनाथ परीवारातील कांही मंडळीनी एकत्र येऊन गडहिंग्लज व आजरा येथील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित, झेप अकॅडमी सुरु केली असल्याचे श्री. एम. चौगुले यांनी यावेळी सांगितले.

     बिरदेव डोणे याने आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी रवळनाथचे संचालक श्री. महेश मजती, ज्ञानदीप प्रबोधिनीचे संचालक श्री. नंदकुमार शेळके (सी.ए.), रवळनाथचे चिक्कोडी शाखेचे सल्लागार श्री. प्रशांत वरदाई आदी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे आजपासून पारायण सोहळा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा श्री क्षेत्र रामतीर्थ ता. आजरा येथे आज शनिवार दिनांक २६ एप्रिल ते शनिवार दिनांक ३ मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ह. भ. प. अर्जुन जाधव महाराज शिप्पूर तालुका हुक्केरी हे व्यासपीठ अधिष्ठान सांभाळणार आहेत.

      या कार्यक्रमांतर्गत दररोज पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी १ ते ५ गाथा पारायण सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री आठ ते दहा कीर्तन व त्यानंतर भोजन प्रसाद होणार आहे.

      पारायण कालावधीत मान्यवरांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ३ मे रोजी सकाळी आठ ते दहा ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे, तर याच दिवशी सकाळी दहा वाजता महाप्रसाद आयोजित केला असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

चांदेवाडी येथे मारामारी… सात जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा धुमाकूळ… ट्रॅक्टर सह बैलगाडी केली पलटी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!