mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हा

सातच्या बातम्या

शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५       

आरदाळच्या युवकाचा संर्पदशांने मृत्यू

.        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आरदाळ ता आजरा येथील विशाल विठ्ठल कांबळे ( वय – ४४) यांचा संपदर्शाने बुधवारी रात्री मृत्यू झाला.याबाबत आजरा पोलिसांत भाऊ विनोद विठ्ठल कांबळे यांनी वर्दी दिली.

      अधिक माहिती अशी…

     विशाल यास गुरुवारी सकाळी झोपेतून उठवत असताना तो उठत नव्हता म्हणून त्यास हाक मारून विनोद याने उठविण्याचा प्रयत्न केला असता तो काही प्रतिसाद देत नव्हता . त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता सर्पदंशाने त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याचे आढळले

      विशाल हा अविवाहीत होता . आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

भारत नगरवासियांचा विविध सुविधांसाठी आजरा नगरपंचायतीवर मोर्चा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरातील भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी रहीवाशांनी मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा काढला. मागण्यांच्याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपंचायतीच्या आचारात ठिय्या ठोकण्याचा इशारा देण्यात आला. भारत नगरपासून मोर्चाला सुरूवात करण्यात आली.तहसीलदार कार्यालय, संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ असा मोर्चा नगरपंचायतीवर गेला.

      आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली वीस ते बावीस वर्षापासून पायाभूत सुविधा नाहीत, रहिवाशांनी सुविधेबाबत अनेकदा तक्रार अर्ज दिलेले आहेत.मात्र याची दखल घेतली गेलेली नाही. भारतनगरमध्ये रस्ते करावेत. गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याची व्यवस्था करावी, खुल्या जागेमध्ये लहान मूलांसाठी अंगणवाडी, मुलांना खेळण्यासाठी बगीचा तयार करावा रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी. भारत नगर सुरू असणाऱ्या कामांची यादी व कागदपत्रे संघटनेला मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या.

     या मागण्यांबाबत प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले व प्रविण बैले याच्याशी आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली.

      मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत,जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, मकसूद माणगावकर, चांगुणा सुतार तौषिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख,गुलाब शिकलगार, यासीन सय्यद यांच्यासह रहिवाशी सहभागी झाले होते.

सौ.प्रियांका जाधव व भारती डेळेकर यांची आदर्श सरपंच म्हणून निवड

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पेरणोली सरपंच सौ.प्रियांकाताई संतोष जाधव व सोहाळे सरपंच सौ भारती कृष्णा डेळेकर यांना पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती आजरा येथे आदर्श सरपंच म्हणून सन्मानीत करण्यात आले.

      राष्ट्रीय पंचायतराज दिवस पंचायत समिती आजरा येथे साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायमध्ये महिला सबलीकरण, ग्रामपंचायत अभियान, शासनाच्या विविध योजना गावांमध्ये प्रभावीपणे राबवल्याबद्दल पंचायत समितीकडून सौ. जाधव व सौ. डेळेकर ग्रामपंचायत सामाजिक आदर्श लोकनियुक्त सरपंच म्हणुन सन्मान करण्यात आला.

      यावेळी गट विकास अधिकारी श्री.संजय ढमाळ, तहसिलदार समीर माने ,सरपंच परिषद मुंबई कोल्हापुर जिल्हाप्रमुख जी. एम. पाटील तसेच पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी, सर्व विभाग प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

साखर कारखान्यामार्फत साखर वाटपास सुरुवात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांने सन २०२४-२५ या हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांनी पुरविलेल्या ऊसानुसार प्रति टन अर्धा किलो प्रमाणे व कारखान्याकडे शेअर्स भागभांडवल रक्कम १० हजार रुपये ते १५ हजार रुपयेच्या आतील सभासदांना २५ किलो व शेअर्स १५ हजार रुपयांचा पुर्ण भरणा केलेल्या सभासदांना ५० किलो साखर प्रति किलो २५ रुपये दराप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाचे सर्व शाखेतून सोमवार दि. २८ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ अखेर वाटप केली जाणार आहे.

      सभासदांना त्यांची साखर वितरण कार्ड घरपोच दिली जाणार असून, सभासदांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सही करून कार्ड वाटप करणेंस येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे देवून आपले कार्ड घेणेचे आहे. तसेच ऊस पुरवठादारांनी आपल्या संबंधित संघ शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड/बैंक पासबुक झेरॉक्स सही करून संघ शाखेत जमा करून साखर उचल करणेची आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.

श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेला, ४१,५९,५४३ इतका ढोबळ नफा, चेअरमन शिवाजीराव देसाई यांची माहिती

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली येथील श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर ग्रा.बि. शेती पतसंस्थेला सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ४१,५९,७४३ रूपये इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव देसाई यांनी दिली.

      संस्थेच्या आजरा व अडकुर या ठिकाणी दोन शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे भागभांडवल १ कोटी १० लाख २४ हजार इतके असुन, ठेवी १२ कोटी ७६, लाख ४८ हजार आहेत. तर १० कोटी १० लाख ३१ हजार इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे एकुण खेळते भांडवल १७ कोटी ४१ लाख ३१ हजार आहे. संस्थेची एकुण गुंतवणुक ५ कोटी २८ लाख इतकी आहे. वार्षिक उलाढाल ४० कोटी ८३ लाख २८ हजार इतकी असुन, एकुण फंडस् १ कोटी ३३ लाख आहेत. संस्था स्थापनेपासुन ऑडीट वर्ग अ असल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली.

      संस्थेच्या या यशामध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन यशवंत पाटील, संचालक श्री. इनास फर्नांडिस, पांडुरंग गुरव, यशवंत देसाई, चंद्रकांत गुरख, दिनकर कांबळे, वंदना चव्हाण, सुजाता कोडक, संस्थेचे व्यवस्थापक नेताजी पाटील, दिपक देसाई, सुभाष पंडित व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

छायावृत्त…   

 

      आजरा येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विद्युत सजावटीची काल चाचणी घेण्यात आली. शिवतीर्थ परिसर या विद्युत रोषणाईने उजळून गेला.

थोडक्यात…

       गांधीनगर परिसरातील रस्त्यांची पावसाने दुर्दशा झाली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!