mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


तालुकावासीयांचा अंत पाहू नका…
टोलमुक्ती संघर्ष समितीचा इशारा

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर-बांदा महामार्गावरील टोलला आजरा तालुका शहरवासीयांचा विरोध आहे हे वेळोवेळी आम्ही दाखवून देत आहोत. त्यासाठी आंदोलने व शांततेने लढे सुरू आहेत. परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नसेल तर होणाऱ्या परिणामांना संबंधित घटकांना सामोरे जावे लागेल.आता तालुकावासीयांचा अंत पाहू नका असा इशारा आजरा येथे टोल मुक्त संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. समितीने टोलमुक्तीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

     टोलविरोधी आंदोलन गणेश चतुर्थीनंतर अधिक तीव्र केले जाणार असून, जनतेची ताकद दाखविणार असल्याचा इशाराही टोलविरोधी कृती समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिला.

     छत्रपती संभाजी महाराज चौकातून मोर्चाने आंदोलक आजरा तहसील कार्यालयासमोर आले व तेथे धरणे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी नागरिकांनी टोलविरोधाच्या घोषणा दिल्या. कायमस्वरूपी टोल हद्दपार करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी काँ. संपत देसाई, प्रभाकर कोरवी कॉ. संजय तर्डेकर, शिवाजी गुरव, प्रकाश मोरुस्कर, तानाजी देसाई, विजय देसाई, शांताराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.

    महामार्गाचे बांधकाम केंद्र सरकारच्या म्हणजे जनतेच्या पैशातून होत आहे, त्यामुळे टोल का? असा प्रश्न कॉ. संपत देसाई यांनी उपस्थित करत महिनाभरापूर्वी झालेल्या मोर्चावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेण्याचे, तर आमदार प्रकाश आबिटकर यांनी टोल भरावा लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. टोलबाबत आजरा तालुकावासीयांत तीव्र असंतोष आहे. टोलमुक्ती होत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा कॉ. देसाई यांनी यावेळी दिला.

   यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई, परशुराम बामणे, रवी भाटले, सी. डी.सरदेसाई, आदित्य रेडेकर, रशिद पठाण, दशरथ अमृते, विक्रम देसाई,तातुअण्णा बटकडली, विलास पाटील, संग्राम सरदेसाई, समीर मोरजकर ,गौरव देशपांडे, वाय. बी. चव्हाण, बंडोपंत चव्हाण, म्हंकाळी चौगुले, आरिफ खेडेकर, वाय. बी. चव्हाण, पांडुरंग सावरतकर, युवराज जाधव, ओंकार माध्याळकर,महेश पाटील, दयानंद भोपळे, गौरव देशपांडे,जुबेर माणगावकर, जुबेर सोनेखान व तालुकावासीय उपस्थित होते.

अनेकांच्या सावध भूमिका…

      इतर आंदोलनात आघाडीवर असणारी अनेक मंडळी टोल मुक्ती आंदोलनात मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. याची चर्चाही आता वेळोवेळी होऊ लागली आहे.

आंबेओहोळ धरण १०० टक्के भरले, पुनर्वसनाचे काय ? : शिवाजी गुरव

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    यावर्षी  सततधार पाऊस पडत असल्याने आंबेओहोळ धरण २१ जुलै रोजी १००% भरून सांडव्यातून पाणी पडू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी गेल्या त्यांना मात्र एका बाजूला धरण भरल्याचा आनंद आहे परंतु गेल्या २४ वर्षात वाट पाहून सुद्धा आमचे पुनर्वसन होत नाही याचे मात्र दुःख आहे अशी भावना पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची भावना आहे. त्यांच्या पुनर्वसनाचे काय ? असा प्रश्न शिवाजी गुरव, अध्यक्ष आंबेओहळ संग्राम संघटना यांनी उपस्थित केला आहे.

     धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी विकास सैनिक आहेत. सरकारने विकास सैनिकांच्या त्यागाचा विचार करून पुनर्वसन लवकरात लवकर करावे असे आवाहनही शिवाजी गुरव यांनी सरकारला केले आहे.

हरपवडे गावामध्ये बंद असणारी एसटी. पुन्हा सुरू….

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या अध्यक्षतेखाली हरपवडे गावातील ग्रामस्थांनी आजरा आगारामध्ये आगार व्यवस्थापकांकडे बस फेरी गावातून सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले व चर्चा केली.

     हरपवडे या गावी बंद असलेल्या एसटी. पुन्हा चालू करण्यासाठी विनंती करून २३ जुलैपासून फाट्यावरून जाणाऱ्या बसेस हरपवडे या गावी चालू कराव्यात अशी मागणी केली.आगार व्यवस्थापक विजयसिंह शिंदे व वाहतुक निरीक्षक राजेश मातले यांनी तातडीने हरपवडे या गावी एसटी सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

     यावेळी आजरा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदलकर, महेश दळवी, हरपवडे गावचे सरपंच सागर पाटील, आदिल मुल्ला, बबन लटम, देवदास गुरव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पाऊस पाणी

        आजरा शहरासह आजरा मंडलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ९९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आजतागायत एकूण १३९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री मध्यम प्रकल्प ९६.७३% इतका भरला असून १८२५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. चित्री प्रकल्पासह(११० मिलिमीटर) सर्फनाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. उचंगी प्रकल्पही तुडुंब भरला आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अखेर डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या मुख्याध्यापकासह लिपिकाविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!