mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 शिकार प्रकरणी आणखी तिघांविरोधात गुन्हा नोंद…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      २४ ऑगस्ट रोजी वनपाल गडहिंग्लज, वनरक्षक गडहिंग्लज, वनरक्षक मलिग्रे, वनरक्षक व वनमजूर यांनी बेलेवाडी हुll येथील भावेश्वरीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला असता शिकारीच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या संदीप श्रीपती जाधव,( रा. केळेवाडी, ता. भूदरगड, वय ३२ वर्षे), योगेश आनंदा गोते (रा. केळेवाडी पैकी तोंदलेवाडी, ता. भूदरगड, वय ३४ वर्षे ) यांना  मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले होते.

      संबंधितांचे मोबाईल तपासले असता मोबाईलमध्ये १५ फेब्रुवारी २०२४ रोजी २ रानडुक्करांची शिकार करण्याबरोबरच  साळींदर या वन्यप्राण्याच्या बिळासभोवती काट्या लावल्याचे दिसून येत आहे. त्यांचेवर वनरक्षक गडहिंग्लज यांनी कलम वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक झाली. याप्रकरणी आणखी तिघांना अटक झाली आहे.

      या तपासाबाबत अधिक चौकशी करताना मिळालेली माहिती अशी की…

       या प्रकरणातील अन्य काही जण पळून गेले होते. परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके व त्यांच्या सहका-यांनी याप्रकरणी आणखी सहा संशयीतांना काल गुरुवारी ताब्यात घेतले. यापैकी भिकाजी आनंदा जाधव (वय ३९ वर्षे रा. केळेवाडी ता. भुदरगड), विठोबा भाऊ शिंदे (वय ५५ वर्षे रा. केळेवाडी ता. भुदरगड) व रामचंद्र गणपती टेंबूगडे (वय ६० वर्षे, रा. पिंपळगाव ता. भुदरगड) यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने त्यांना अटक झाली आहे.

     आज शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचेही समजते.

‘ गंगामाई ‘ने तालुक्याच्या  चळवळींना बळकटी : आम.प्रकाश आबिटकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्याच्या साहित्यिक सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळकटी देण्याचे काम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराने केले आहे. असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.

     आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अद्यावत इमारतीसाठी नगर विकास विभागाच्या विशेष घटक योजनेतून आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून चार कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रा. अशोक बाचूळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

     आमदार आबिटकर पुढे म्हणाले, नवीन वास्तूच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यास हातभार लागणार आहे. वाचनाचा छंद जोपासला गेला पाहिजे. वाचनामुळे समृद्धता येते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृतीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. वाचनालयाची उभी राहणारी नवीन वास्तू आजऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे. विकास कामांच्या बरोबरच इतर कामाकडेही लक्ष देता आले याचे समाधान असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.

     इचलकरंजी संस्थानचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी वाचनाचीच आवड असणाऱ्या आपल्या पत्नीच्या नावे श्रीमंत गंगामाई वाचन मंदीराची स्थापना केली होती. या वाचन मंदीरातून लोकशाहीर द.ना.गव्हाणकर यांच्या सारखे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे साहित्यीक मृत्युजंय, छावा, युगंधर अशा कादंबऱ्यातून संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या लेखणीतून भूरळ घालणारे ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांसारखे नामवंत साहित्यीक याच मंदीरात घडले. आजरा शहराचे वैचारीक व्यासपीठ म्हणून या वाचन मंदीराची ओळख आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असताना सुसज्ज आणि समृध्द रूप या वाचनालयाला प्राप्त होत आहे. ४ कोटी ५० लाखांच्या कामाच्या माध्यमातून अद्ययावत इमारत बांधकाम होत असल्याचे स्पष्ट केले.

     यावेळी अशोकअण्णा चराटी, जयवंतराव शिंपी मुकुंदराव देसाई, सुधीर कुंभार यांचीही मनोगतपर भाषणे झाली.

      कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, डॉ.अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, डॉ.अंजनी देशपांडे, दशरथ अमृते , विजय थोरवत, जितेंद्र भोसले, रणजीत सरदेसाई, निखिल कळेकर यांच्यासह वाचनालयाचे सर्व संचालक व कर्मचारी, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

     आभार संभाजी इंजल यांनी मानले.

नगरपंचायती विरोधात ‘आशां ‘ चे आंदोलन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गुरुवार दिनांक २९ रोजी कोविड काळामध्ये काम करण्यासंदर्भात आजरा नगरपंचायतीकडून आदेश देण्यात आले होते. आदेशाप्रमाणे काम केल्यानंतर मागणी करूनही ठरलेले मानधन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ आशा स्वयंसेविकांनी आंदोलन केले.

       आशा सेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कामाला रुजू होऊन त्यांना दिलेले काम वेळोवेळी पूर्ण केले. त्यावेळी त्यांना प्रति महिना १०००/- रुपये मानधन देण्याचे नगरपंचायतीच्या वतीने मान्य करण्यात आले होते. परंतु तसे असले तरीही त्यांना केवळ तीन महिन्यांचेच मानधन अदा करण्यात आले. आशा सेविकांनी त्यानंतरही जवळपास दहा महिने नगरपंचायतीच्या सांगण्यावरून काम केलेले आहे. परंतु त्या कामाचा मोबदला त्यांना अद्याप देण्यात आलेला नाही याबद्दल आशा सेविकांनी अनेकदा नगरपंचायतीकडे तक्रार अर्ज केले होते. याशिवाय अनेक पक्ष व संघटनांच्या माध्यमातूनही त्यांनी केलेल्या कामाचे मानधन मागण्यासाठी आंदोलने केलेली होती, परंतु नगरपंचायतीने त्यांना दाद दिली नाही.

      बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने गेल्या एक महिन्यापासून या विषयाच्या संदर्भात नगरपंचायतीला निवेदने देणे, स्मरणपत्रे देणे अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले परंतु त्यालाही न जुमानल्यामुळे आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यात आले. यावेळी सर्व पीडित आशा सेविका उपस्थित होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष किरण के. के. यांच्या नेतृत्वामध्ये सदर आंदोलन करण्यात आले.

     यावेळी राहुल मोरे, अमित सुळेकर,संदीप दाभिलकर, स्वप्निल लांजेकर, काशिनाथ मोरे,जुबेर माणगांवकर, डॉ. उल्हास त्रिरत्ने, ज्योतिबा सुतार, द्वारका कांबळे इ. कार्यकर्ते आणि दिपा बुरुड, शीतल मोरबाळे, भारती माळी, लक्ष्मी कांबळे, विमल कसेकर, जबीन सोनेखान, इ. आशा सेविकांनी उपस्थित होत्या.

      आंदोलनाची दखल घेऊन नगरपंचायतीचे अधिकारी राकेश चौगुले यांनी सद्य परिस्थितीत नगरपंचायतीजवळ पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या प्रश्नावर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर तोडगा काढू असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पुन्हा ‘ बोंब मारो’ चा इशारा…

      यानंतर जर पंधरा दिवसात सदर मानधन दिले नाही तर येत्या १४ सप्टेंबर २०२४ रोजी नगरपंचायतीच्या आवारात हलगी वाजवून ‘बोंब मारो आंदोलन’ करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला..

 हारूर येथील स्टोन क्रशर बंद करण्याचा गावसभेत ठराव

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ग्रुप ग्रामपंचायत कानोली पैकी हारूर गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर बंद करण्याचा ठराव हारूर ग्रामस्थांनी मांडला, त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौं. सुषमा सुभाष पाटील होत्या, स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक संतोष कुंभार यांनी केले यावेळी कानोली आणि हारूर गावच्या विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली.

      शासनाच्या परिपत्रकांचे वाचन सभेत करण्यात आले, हारूर येथील स्टोन क्रशर मुळे आजूबाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे, शिवाय ड्रेनेज पाणी नदीत मिसळत आहे, त्यामुळे पाणी प्रदूषण वाढत आहे, अनेकवेळा सूचना देऊन देखील क्रशर व्यवस्थापन यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे क्रशर बंद करावे असा ठराव हारूर येथील ग्रामस्थांनी मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

      यावेळी हारूर येथील गायरान जमीनीत संवेदना फाऊंडेशन आजरा मार्फत वनौषधी पार्क उभारण्यात येणार आहे, याबाबत फाऊंडेशन अभिनंदनचा ठराव सुभाष पाटील यांनी मांडला. दोन्ही गावातील विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली,

       उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर, सदस्य सुधीकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील,सारिका भोसले, दीपाली सुतार, माया लोहार यांच्यासह सुरेश रेडेकर, विलास सुतार, संतोष रेडेकर मिलिंद पालकर, सयाजी सावंत, यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. आभार ग्रामसेवक कुंभार यांनी मानले.

लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश निपाणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथील लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश निपाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

      मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून मंडळाच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी शिवकुमार गुंजाटी, खजिनदार पदी अनिकेत शिंत्रे, सेक्रेटरी पदी अभिषेक रोडगी आणि अनुप चराटी, रुपेश डांग, अभिषेक हुक्केरी, शेखर शेट्टी, अनुप कुरुणकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!