

सावधान…
पण पैसे कोण देणार…?
आज-यात खरेदीचा नवा फंडा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतीच्या, बिगरशेतीच्या जमिनी, फ्लॅट खरेदी करणार, कायदेशीर कागदपत्रेही पूर्ण होणार पण पैसे कोण देणार ? या प्रश्नाचे उत्तर व्यवहारात गुंतलेल्या मंडळींकडून सापडत नसल्याने झालेल्या व्यवहारांची पैसे वसुली करताना संबंधित मंडळी अक्षरश: घाईला येत असून आजरा तालुक्यात सुरू असलेल्या या प्रकारांची चर्चा जोरात आहे. बडे बिल्डर, सर्वसामान्य शेतकरी यांना चुना लावणारी काही मंडळी अचानकपणे चर्चेत येऊ लागली आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की...
आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये झालेले रूपांतरण, शहरातून जाणारा नवीन महामार्ग यामुळे काही मंडळींच्या नजरा आता ठिकठिकाणी उभ्या राहत असणाऱ्या अपार्टमेंटमधील फ्लॅटसह महामार्गाशेजारील बिगर शेती व शेती उपयुक्त जमिनीकडे वळल्या आहेत. ही मंडळी आपल्या लाघवी बोलण्याने संबंधितांवर भुरळ पाडून नाममात्र रकमा संचकार स्वरूपात देऊन प्रसंगी खरेदी पत्र करून लाखोंच्या मालमत्ता खरेदी करून संबंधितांना उर्वरित रकमांसाठी ठेंगा दाखवताना दिसत आहे.
रुबाबदार राहणीमान, आलिशान गाड्या, आणि मोठ्या बोलण्याला भुलून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे व्यवहार संबंधितांशी केले आहेत. केवळ जमिनी नाही तर फ्लॅट खरेदी व्यवहारापोटी खरेदीपत्र पूर्ण केली आहेत, संबंधितांना संचकार रकमाही दिल्या आहेत. परंतु पुढच्या रकमा देण्यास हेतू पुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याने बांधकाम व्यावसायिक मंडळींच्या पदरी मात्र केवळ संचकारापोटी दिलेल्या रकमाच आलेल्या दिसत आहेत.
शहरामध्ये अशी गंडा घालणारी मंडळी आता चर्चेत येऊ लागली असून संपूर्ण तालुका व शहरवासियांनी असे व्यवहार करताना दक्षता घेण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे.
रोख रकमांचीही उचल…
याच मंडळींनी कांही स्थानिक व्यापारी व पैसेवाल्या मंडळींकडून विविध कारणे सांगून प्रसंगी व्याजाचे अमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर रोख रकमाही उचलल्या आहेत. ज्यांच्याकडून या रकमा घेतल्या आहेत त्यांना संबंधितांनी दिलेले धनादेश वाटत नसल्याने पैसे दिलेल्यांची अवस्था धड सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत.
दुभती जनावरे खरेदीमध्येही फसवणूक…
जो प्रकार जमीन व्यवहार व फ्लॅट खरेदीमध्ये होत आहे तोच प्रकार दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्री बाबत होत आहे. नाममात्र ॲडव्हान्स रकमा देऊन उर्वरित रकमा नंतर देण्याचे आश्वासन घेऊन जनावरे खरेदी केली जात आहेत. असे करताना संबंधित पशुपालकांचे चांगलेच हाल होत आहेत.

आजरा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आजरा तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. आजरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या हस्ते, आजरा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या हस्ते तर आजरा नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

येथील आजरा अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष रमेश कुरुणकर यांच्या हस्ते, जनता बँकेमध्ये अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते, बिरेश्वर पतसंस्था येथे उद्योजक भिकाजी पाटील यांच्या हस्ते,स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये अध्यक्ष जनार्दन टोपले यांच्या हस्ते, जनता शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते, व्यंकटराव हायस्कूल मध्ये अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते, पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते, आजरा साखर कारखाना कार्यस्थळी अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या हस्ते, अण्णा-भाऊ आजरा सहकारी सूतगिरणी मध्ये अध्यक्ष अन्नपूर्णादेवी चराटी यांच्या हस्ते,आजरा मर्चंटस् पतसंस्थेमध्ये अध्यक्ष रमेश कारेकर यांच्या हस्ते, आजरा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष दिवाकर नलवडे यांच्या हस्ते,जनता सहकारी गृहतारण संस्थेमध्ये अध्यक्ष मारुती मोरे यांच्या हस्ते, वाटंगी येथील सन्मित्र परिवारातर्फे अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, सहकारी संस्था येथेही ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले.
आजऱ्यातील रवळनाथ पतसंस्थेचे ध्वजारोहण ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते…

आजऱ्यातील रवळनाथ पतसंस्थेत स्वातंत्र्यदिनी होणारे ध्वजारोहण ज्येष्ठ सभासद व संस्थापक संचालक श्री. देगा शाहू डिसोझा, रा आजरा यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी आपण स्वतः ध्वजारोहण न करता ज्येष्ठ सभासदाचे हस्ते ध्वजारोहण करून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवून तालुकावासियांसमोर नवा आदर्श घालून दिला असून त्यांच्या या निर्णयाने त्यांच्यासह संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष शिंपी म्हणाले, समाजात आपण जे ताठ मानेने आणि अभिमानाने जगतो त्यासाठी अनेक मोठ्या लोकांचे योगदान आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे आपले नैतिक मुल्य आहे याची जाणीव आताच्या पिढीला कळावी या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून यापुढील काळातही असेच विविध उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प असल्याचेही अध्यक्ष शिंपी यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक डिसोझा यांचा सत्कार करण्यात आला. आपल्याला हा ध्वजारोहणाचा बहुमान दिल्याबद्दल ज्येष्ठ सभासद डिसोझा यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी, जेष्ठ मान्यवर व संस्था कर्मचारी उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयात तिरंगा रॅलीचे आयोजन

आजरा महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये राष्ट्रीय ध्वज होते आणि ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ ‘हर घर तिरंगा’ असा नारा देत विद्यार्थी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सादळे, पर्यवेक्षक प्रा. मनोज देसाई व अधीक्षक श्री योगेश पाटील होते .
या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी अधिकारी कॅप्टन संजय चव्हाण , प्रा विनायक चव्हाण, क्रीडा शिक्षक प्रा अल्बर्ट फर्नांडिस , क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील , एन एस एस प्रकल्पाधिकारी डॉ. रणजीत पवार यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होता.
व्यंकटराव मध्ये माझी शाळा…’ मृत्युंजय ‘ कारांची शाळा… फलक झळकला

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत व्यंकटराव प्रशालेचे माजी विद्यार्थी व ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांचे साहित्यिक योगदान व हायस्कूलमध्ये घेतलेले शिक्षण या पार्श्वभूमीवर आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या प्रोत्साहनातून व संचालक श्री. अभिषेक शिंपी यांच्या मार्गदर्शनातून प्रशालेसमोर माझी शाळा… मृत्युंजयकारांची शाळा… हा फलक लावण्यात आला. अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, सचिव श्री. एस. पी. कांबळे, संचालक श्री. सचिन शिंपी, श्री. अभिषेक शिंपी, श्री. पांडुरंग जाधव, श्री सुनील देसाई, प्राचार्य श्री. आर. जी कुंभार, श्री. ए.ए.पाटील, श्री.सूर्यकांत नाईक , श्री. कासार उपस्थित होते.
मलिग्रे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

मलिग्रे ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच शारदा गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी गावातील सर्व आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
आजरा तालुक्यातील टोल आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रक वाचन विष्णू जाधव यांनी केले. पत्रक वाटप डाॅ.सुदाम हरेर व शिवाजी भगुत्रे यांनी केले.
यावेळी विज महावितरण मंडळ याच्यावतीने व शासकीय योजनांची माहीती देण्यात आली. यावेळी मंडल अधिकारी संदीप कुरणे, तलाठी संजय माळी, ग्रामसेवक धनाजी पाटील, पोलिस पाटील मोहन सावंत ,माझी सरपंच समिर पारदे, अशोक शिंदे, गजानन देशपांडे माजी सैनिक आप्पा धुमाळे, सिताराम गाडे ,गणपती आडसोळ, चाळू कांबळे, वामन दरेकर, मोहन जाधव मुख्याध्यापक सुभाष पाटील, मनिषा सुतार, शशिकला घोरपडे यांच्या सह अंगणवाडी मराठी शाळा हायस्कूल चे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चित्री प्रकल्प परिसरात विद्युत रोषणाई

जलसंपदा विभागाच्या वतीने चित्री मध्यम प्रकल्प परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेली रोषणाई पर्यटकांचे चांगलेच आकर्षण बनत आहे.

आजरा ग्रामीण रूग्णालयात आरोग्य योजनांचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालय येथे १५ ऑगस्ट २०२४ पासून महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत ह्या योजना एकत्रित पणे सुरू केल्याने एकून बाराशे शहाण्णव आजारावर उपचार केले जाणार असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. अमोल पाटील यांनी सांगितले. तसेच ही योजना सर्व रेशन धारकांना उपयुक्त असल्याने तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचा आवाहन केले.
यावेळी सीएएच प्रक्रिया संवाद चे तालूका समन्वयक काशिनाथ मोरे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले .यावेळी त्यांनी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनांची माहिती दिली. आरोग्य मित्र तुकाराम कामत यांनी या योजनेच्या उपचारादरम्यान लागणारी कागदपत्रे व नियम याची माहिती दिली.

आरोग्य विभाग ॲलर्ट मोडवर…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यानगर आजरा येथील सौ. रंजना रमेश जाधव या ३० वर्षीय विवाहित महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आजरा आरोग्य विभाग ॲलर्ट मोडवर आला असून डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी ,वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना अधिकाऱ्यांकडून याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. कर्मचारी वर्गाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
वळीवडेची पार्श्वभूमी…
मृत सौ. रंजना जाधव व त्यांचे पती रंजना यांना डेंग्यूची लागण झाली तेव्हा गांधीनगर, वळीवडे (कोल्हापूर) येथे राहावयास होत्या. त्यानंतर त्या सासरी आजरा येथे आल्यानंतर येथील खाजगी रुग्णालयात, पुढे गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या.



