mrityunjaymahanews
अन्य

अनुसया पोवार यांचे निधन

अनुसया पोवार यांचे निधन.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. सीमा पोवार यांच्या सासु व तत्कालीन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक पोवार यांच्या मातोश्री अनुसया रामचंद्र पोवार यांचे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६९ वर्षे होते.

     त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले , सूना, नातवंडे असा परिवार असून आज शनिवारी सकाळी ११ वाजता वडाचा गोंड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोलकाता प्रकरणी आज आज-यात वैद्यकीय संघटनांचा निषेध दिन…
वैद्यकीय सेवा बंद राहणार

          आजरा – मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टरवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या आजरा तालुक्यातील सर्व डॉक्टर्सच्या संघटनेने आज शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ निषेधदिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते उ‌द्या रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी सर्व क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स मधील सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरु ठेवल्या जातील.

     अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित ओपीडी कार्य करणार नाहीत आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. भारत देशातील सर्व डॉक्टर्सना आपल्या डॉक्टरांच्या न्याय्य मागण्यांसाठी देशाची सहानुभूती हवी आहे. या पार्श्वभूमीवर आजरा तहसीलदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

      यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रँच आजराचे अध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर,सेक्रेटरी डॉ.अनिल देशपांडे, मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे अध्यक्ष डॉ. प्रविण निंबाळकर,उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील कातकर,निमा अध्यक्षा – डॉ अंजनी देशपांडे,
आजरा होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीपक हरमळकर,डॉ. संदीप देशपांडे , डॉ. हेमंत भोसले , डॉ. युवराज सुतार , डॉ. सुरजित पांडव , यांच्यासह डॉ. रश्मी राऊत – गाडगीळ , डॉ. गौरी भोसले , डॉ. स्मिता कुंभार , डॉ. पल्लवी निंबाळकर , डॉ. आरती बेळगुंदकर , डॉ. श्रीकांत सावंत , डॉ. अमित बेळगुंदकर व पदाधिकारी उपस्थित होते.

‘त्या’ बातमीने आज-यात खळबळ… मालमत्तांवर बँकांचे बोजेही चढले

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ‘आजरेकरांनो सावधान…’ या मथळ्याखाली मृत्युंजय महान्यूज वरून शुक्रवारी जमीन, फ्लॅट, बिगर शेती भूखंड यासह जादा पैशाचे आमिष दाखवून पशुपालकांची कांही मंडळींकडून होत असलेल्या फसवणुकीचा पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली. संबंधितांनी लाखो रुपयांचा चुना लावल्याचे स्पष्ट होत आहे.

        स्थावर मालमत्तांचे सुरुवातीला संचकारापोटी नाममात्र किमती देऊन त्यानंतर उर्वरित रकमा देण्याच्या बोलीवर मालमत्ता नावावर करून घेणे व त्या मालमत्तांवर बँका व इतर संस्थांचे बोजे चढवून संबंधित मूळ मालकांना अडचणीत आणण्याचे हे उद्योग गेल्या दोन ते तीन वर्षापासून शहरात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

       नाममात्र रकमा खर्च करून लाखो रुपयांच्या संपत्तीचे मालक बनलेल्या या मंडळींमध्ये शुक्रवारी बातमी प्रसिद्ध होताच चांगलीच खळबळ उडाली.

     फसवणूक झालेली मंडळी संघटित होऊ लागली असून अडकलेल्या पैशांसाठी तगादा लावण्यास सुरुवात झाली आहे. काल शुक्रवारी दिवसभर ही मंडळी संबंधितांच्या मागावर होती. कांही जणांना तोंडी आश्वासन देऊन तर कांही जणांना पैसे परतीची लेखी हमी देण्याचे काम सुरू झाले आहे. तर काही मी आता कायदेशीर लढाईला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे.

वैयक्तिक पैसे देणारे मंडळी
हवालदील

      हात उसने अथवा आगाऊ धनादेश देऊन ज्यांच्याकडून रोख रकमा घेतल्या आहेत ती मंडळी मात्र चांगलीच हवालदिल झाली आहेत. धनादेश वटत नाहीत परंतु आयकर विभागाच्या ससेमिरा मागे लागण्याची शक्यता असल्याने कायदेशीर दादही मागता येत नाही अशा विचित्र परिस्थितीत ही मंडळी अडकली आहेत.

बातमी एक… घायाळ अनेक…

     सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अशा व्यवहारात गुंतलेल्या अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आपल्याबद्दल तर सदर बातमी नाही ना याची खात्री करून घेतली. बातमी एक… पण घायाळ अनेक अशी अवस्था तयार झाली आहे.

 

 

टोल मुक्ती संघर्ष समिती आक्रमक…
२८ ऑगस्ट रोजी टोल नाक्यावर बेमुदत रस्ता रोको

           आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहरालगत प्रस्तावित असलेल्या टोल नाक्याला तीव्र विरोध दर्शवत शासनाकडून आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी टोलनाका स्थळी बेमुदत रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन आजरा तहसीलदारांना दिले आहे.

      दि २४ जून रोजी प्रस्तावित टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेने मोर्चाने येत आपल्या तीव्र भावना दाखवून दिल्या आहेत. या मोर्चावेळी या विभागाचे विध्यमान आमदार प्रकाश आबिटकर या टोल नाक्याला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन स्वतः मोर्चात सहभागी झाले होते. त्याचवेळी या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांनी मोबाईलवरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांचे सोबत बैठक घेऊन टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याला जवळजवळ दोन महिन्याहून अधिक काळ उलटून गेला. पण याबाबत आजअखेर कांहीही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

     २२ जुलै २०२४ तहसिल कार्यालयासमोर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन झाले. या कार्यालयाकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळताना दिसत नाही. मोर्चा, धरणे, निवेदने देऊनही जर शासन प्रशासनाला जाग येत नसल्याने तालुक्यातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे जनतेने आर या पारची लढाई करण्याचा निर्णय केला आहे. या टोल नाक्याला आमचा विरोध का हे आम्ही यापूर्वी संबंधित यंत्रणेला, या विभागाचे लोकप्रतिनिधी यांना सर्व मुद्यांसह कळविले आहे. जोपर्यंत हा रस्ता टोल मुक्त होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून बुधवार दि २८ ऑगस्ट २०२४ रोजी टोल नाका ज्या ठिकाणी उभा केला जात आहे त्याच ठिकाणी बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

      यावेळी कॉ. संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, सी.डी. सरदेसाई, रवी भाटले, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, वाय. बी. चव्हाण, गौरव देशपांडे यांच्यासह टोलमुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संपात सहभागी...

     आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्या आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांनी काल दि. १६ रोजी होणाऱ्या राज्य व्यापी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला.

      आजरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन आजरा गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.

     यामध्ये किमान वेतन मिळणेसाठी अडथळा निर्माण करणारा वसुलीची, उत्पन्नाची अट घालणारा दि २८/०४/२०२० चा शासन निर्णय रद्द करवा, शासन मान्य नवीन किमान वेतन व राहणीमान भत्ता पूर्णपणे मिळालाच पाहिजे, कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंख्येचा आकृतिबंध रद्द करा, कपात केलेल्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कर्मचा-यांच्या खात्यावर त्वरित जमा
करावी. वेतन निश्चिती समितीच्या (यावलकर समिती) च्या शिफारसी मान्य कराव्यात,निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन योजना ताबडतोब लागू करावी या मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी संघटनेचे संघटक राजेश कोकितकर सचीव काशिनाथ कुंभार,उपाध्यक्ष
तुकाराम कांबळे, अध्यक्ष अशोक गेंगे, दयानंद पाटील संजय पाटील प्रियांका जाधव यांच्यासह सरपंच व मान्यवर उपस्थित होते.

एक झाड एक आठवण…

ग्रा. पं. कानोली यांच्या  उपक्रमास प्रतिसाद…


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कानोली ता.आजरा येथील आपगे कुटूंबियानी त दिवंगत माजी कृषी अधिकारी कै. रामचंद्र आपगे यांच्या दिवसकार्या निमित्त..एक झाड -एक आठवण या उपक्रमास प्रतिसाद देऊन वडिलांच्या आठवणी कायम राहव्यात म्हणून एक आंबा वृक्ष झाड लावून त्याची तीन वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

     झाड मोठे झाल्यानंतर त्या झाडावर त्यांच्या वडिलांच्या नावाची पाटी लावण्यात येणार आहे, व त्याची नोंद ग्रा. पं. दप्तरी होणार आहे.यावेळी वृक्षारोपण करताना सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील, उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर ग्रा. पं सदस्य सुधीकुमार पाटील, चंद्रकांत पाटील अनिल पाटील शुभांगी पाटील सारिका भोसले आरती देसाई दीपाली सुतार व सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

निधन वार्ता
कमळाबाई राणे

      कमळाबाई दत्तू राणे रा. वेळवट्टी ता. आजरा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

     त्यांच्या पश्चात तिन विवाहित मुलगे, तिन सुना, एक विवाहित मुलगी, जावई ,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे‌.

वेळवट्टी येथील प्रसिद्ध गवंडी कारागीर आनंदराव राणे यांच्या त्या आई होत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!