


सावधान…
बोगस बियाणे खते व कीटकनाशकांपासून सावध रहा

ज्योतिप्रसाद सावंत
सध्या खरिपाची लगबग सुरू असून मान्सूनची चाहूल लागल्याने बळीराजा खते, बी- बियाणे कीटकनाशके यांच्या जोडणीला लागला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विक्रेत्यांकडून बी- बियाणे, खतांसह कीटकनाशकांमध्ये होणारी फसवणूक नित्याचीच बाब झाली आहे. याकरिता शेतकऱ्यांनी विविध खबरदारी घेऊन असे प्रकार आढळल्यास तालुका कृषी विभागासह संबंधित विभागांची तातडीने संपर्क साधण्याची गरज आहे.
खरीपाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर बोगस बी- बियाणे, खाते व कीटकनाशकांची आवक होताना दिसते. उत्पादन वाढीचे अमिष दाखवून विविध कंपन्यांची बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. प्रत्यक्षात मात्र पेरणीचा हंगाम निघून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात येते. परंतु त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. तीच अवस्था खतांबाबत व कीटकनाशकांबाबत दिसून येते.
वास्तविक शासनाच्या कृषी विभागाची यावर प्रतिबंध घालण्याची जबाबदारी आहे. यासाठी तालुका पातळीवर भरारी पथकेही नेमण्यात येतात. असे असतानाही बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात कशी ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा किती विक्रेत्यांवर याबाबत कारवाई झाली हे देखील समजू शकत नाही.
रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यामध्ये फसवणूक झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईसह तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे पण भरारी पथके या कायद्याची कितपत अंमलबजावणी करणार हा विषय संशोधनाचा आहे.
खतांच्या लिंकिंगची डोकेदुखी...
चांगल्या कंपन्यांची दर्जेदार खते मिळवताना शेतकरी वर्गास बराच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एकाच प्रकारच्या खताची मागणी वाढत असल्याने अशावेळी इतर कंपन्यांची व इतर खते लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांना घेणे बंधनकारक केले जाते हा प्रकारही थांबवण्याची गरज आहे.

टोलबाबत आज बैठक…
आंदोलनाची दिशा ठरणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर- बांदा महामार्गावर मसोली नजीक उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याला विरोध दर्शवण्यासह स्थानिक नागरिकांना टोल मधून सवलत मिळावी या प्रमुख मागण्यांच्या पार्श्वभूमीवर तालुकावासीय आक्रमक झाले असून आज शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी अकरा वाजता याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रवळनाथ मंदिर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा प्रचंड पावसाचा व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. बाजारहाटीसह शासकीय कामाकरिता आजरा या तालुक्याच्या ठिकाणी या भागातील ग्रामस्थांना वारंवार ये- जा करावी लागते. महामार्ग प्राधिकरणाने मसोली येथे पथकर /टोल वसुली नाका उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या नाक्याच्या पलीकडे साखर कारखान्यासह सुमारे १५ गावे आहेत. या पंधरा गावातील वाहनधारकांना व कारखान्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मंडळींना प्रचंड त्रास होणार आहे.
याबाबत तालुकावासीयांनी संघटितरित्या विरोध करण्याचा निर्धार केला असून आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे.यामुळे आजच्या बैठकीत नेमकी कोणती भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उम्मेरुमानची यशाला गवसणी

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा हायस्कुलची विद्यार्थिनी कु. उम्मेरुमान रहिमतुल्ला बुडडेखान हिने अगदी प्रतिकूल परस्थितीतही दहावीच्या केंद्र परीक्षेत ९५% गुण मिळवून यशाला गवसणी घातली आहे.
दर्गागल्ली येथील रहीमतुल्ला हे सेंट्रिंग मजुरी करतात. घरची परिस्थिती बेताचीच आहे. सेंट्रिंग काम करून उम्मेरुमानला शिकवण्याचे ध्येय बाळगलेल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करीत उम्मेरुमानने दहावी बोर्ड परीक्षेत ९५% गुण मिळवून यशाचे शिखर गाठलेबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

निधन वार्ता
शांताबाई गुरव

. आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील शांताबाई तुकाराम गुरव (वय ७५) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,मुली असा परिवार आहे.येथील पुजारी शिवराम गुरव यांच्या त्या आई होत.शुक्रवार दि ३१ रोजी सकाळी रक्षा विसर्जन आहे.


