बुधवार दि.२७ नोव्हेंबर २०२४




ताई तुमच चुकलच…

ज्योतिप्रसाद सावंत
गत विधानसभा निवडणुकीवेळी आयती चालून आलेली संधी ताई तुम्ही सोडली तिथच तुमच चुकलं…
‘चित्री’ कार म्हणून विकास कामाचा डोंगर उभा करणाऱ्या व समाजभान असणारे जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून नावारूपास आलेल्या स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे चंदगड विधानसभा मतदारसंघात विणले आहे. कार्यकर्त्यांनाही याचे भान होते म्हणूनच गत विधानसभा निवडणुकीवेळी ते पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची विनंती करत होते.आईसाहेब व स्व. बाबांच्या पश्चात तुम्हाला आमदार म्हणून स्विकारण्याची त्यांची मानसिकता तयार झाली होती. या मानसिकतेतूनच निवडणुकीत तुमच्याकरता राबण्याची प्रचंड तयारी ठेवून हा तुम्हाला प्रेमाचा आग्रह होता. पण तुम्ही २०१९ ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांपुढेच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
राष्ट्रवादीतील दुसरा पर्याय म्हणून माजी आमदार राजेश पाटील यांना कार्यकर्त्यांनी पसंती दिली. इच्छा नसतानाही निवडणूक रिंगणात उतरलेले राजेश पाटील यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली . साधा व सरळ राजकारणी अशी प्रतिमा जपत माजी आमदार राजेश पाटील यांनी या भागाचे गेली पाच वर्षे प्रतिनिधित्व केले. आपले पाच वर्ष या मतदारसंघाकडे थोडे दुर्लक्षच झाले हेही नाकारता येणार नाही. दरम्यान राष्ट्रवादीची कार्यकर्ते मंडळी राजेश पाटील यांच्यासोबत गेली व तेथेच ती रमलीही.
आपले कुठेतरी चुकले आहे असे तुम्हाला वेळ निघून गेल्यानंतर वाटू लागले. पाच वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले. अनेक नव्या ताकतीचे व नव्या जोमाचे नेते या पाच वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघात तयार झाले. पुन्हा एक वेळ विधानसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागल्यानंतर झाल्या चुका टाळून पाच वर्षापूर्वी चालून आलेले व यावेळी टप्प्याच्या पलीकडे गेलेले प्रतिनिधित्व पुन्हा मिळवण्यासाठी आपली धडपड सुरू झाली. आईसाहेब संध्याताईंची निवडणूक कालावधीत जेव्हा भेट झाली तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही आता प्रवाहाच्या विरोधी दिशेने चाललो आहोत. बघू… आईसाहेबांची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. मध्यंतरीच्या कालावधीत आपले हक्काचे कार्यकर्ते आपण गमावून बसलो आहोत याचे शल्य त्यांच्या बोलण्यातून निश्चित जाणवत होते.
राष्ट्रवादीत पडलेली उभी फुट, भाजपाची असणारी शिवाजीराव पाटील यांच्या मागील प्रचंड ताकद व माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत गेलेले आपल्या गटाचे कार्यकर्ते अशा विचित्र परिस्थितीत आपण निवडणुकीला सामोरे गेलात. आपल्या उमेदवारीला होणारा महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उघड विरोध पाहून आपण शांत बसणे गरजेचे होते. परंतु ही सर्व परिस्थिती लक्षात येऊनही आपण निवडणूकीच्या आखाड्यात उतरलात. स्व.बाबांचे कांही कार्यकर्ते पुन्हा एक वेळ तुमच्या सोबत लढण्यासाठी सज्ज झाले. परंतु त्यांची संख्या अत्यल्प होती. त्यांना अनेक मर्यादाही होत्या. स्व. बाबांच्या तालमीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते आपल्या विरोधात गेलेले पाहून निश्चितच आपली घालमेल होत होती. पण कार्यकर्त्यांचाही नाईलाज होता. त्यांना पाच वर्षांपूर्वी तुम्हीच मुक्त केले होते.
पक्षाचे अधिकृत लेबल न मिळताही अपक्ष म्हणून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवाजीभाऊंनी विजयापर्यंत मारलेली उडी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. आपणाला मिळालेली एकूण मते ही निश्चितच कमी नाहीत.
भविष्यात पुन्हा संधी येईल परंतु त्यासाठी पाच वर्षे मशागत करण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही कारण… ताई तुमच चुकलच…आज नाही तर पाच वर्षापूर्वी…



मल्लिकार्जुन विकास सेवा संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे (ता. आजरा) येथील मल्लिकार्जुन विकास सेवा संस्थेची आज पदाधिकारी निवड होती. निवडी दिवशी पाच संचालकांनी राजीनामे दिल्याने कोरम अभावी सभा तहकूब करावी लागली. त्यामुळे संस्थेवर प्रशासक येण्याची शक्यता आहे. संस्थेमध्ये सत्ता संघर्ष चिघळला आहे.
दोन वर्षापुर्वी मल्लिकार्जुन संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली होती.
एका गटाकडे बहुमत असल्याने विष्णु जाधव हे अध्यक्ष होते. दरम्यान श्री. जाधव यांचे अपघाती निधन झाले. तर संचालक बाबुराव निऊंगरे यांचेही निधन झाले. संस्थेची संचालक संख्या १३ वरून ११ वर आले. उपाध्यक्षा जिजाबाई बुगडे यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु होता. दरम्यान त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरु, महादेव बुगडे, शिवाजी निऊंगरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दिले असल्याने पदाधिकारी निवड सभा कोरम अभावी तहकूब झाली.
‘ संस्थेच्या कामकाजासाठी किमान सात संचालक लागतात. मल्लिकार्जुन संस्थेतील पाच संचालकांनी राजीनामे दिले असल्याने संख्याबळ सहावर आले आहे. एका संचालकाची थकबाकी प्रकरणी चौकशी सुरु आहे. संचालकांचे राजीनामे सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यांचा लेखी अहवाल आल्यावर प्रशासक नेमणेसाठी पुढील कार्यवाही केली जाईल..”
सुजयकुमार येजरे (सहाय्यक निबंधक आजरा)



गुठ्ठा शर्यतीचा ‘ राजा ‘ गेला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘ गुठ्ठा शर्यतीचा राजा ‘ अशी ओळख असणाऱ्या पोळगाव येथील भिकाजी सुतार यांच्या मालकीच्या ‘लक्ष्या’ बैलाचे नुकतेच निधन झाले .
पंचक्रोशीत होणाऱ्या गुठ्ठा शर्यतीचे लक्ष्या म्हणजे प्रमुख आकर्षण असायचे. सदर बैलाने आजरा पंचक्रोशीसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रथम व द्वितीय क्रमांकाची अनेक बक्षिसे जिंकली होती.
त्याच्या निधनाने गुठ्ठाशर्यतप्रेमी नागरिकातून हळहळ व्यक्त होत आहे.


उद्यापासून मरगुबाई देवीची यात्रा…
विविध कार्यक्रमांचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उद्या गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर पासून आजरा शहरातील सुतार गल्ली येथील श्री मरगुबाई देवीची यात्रा सुरू होत आहे. यात्रेनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता जुगारी महादेव मंदिर येथे कार्तिक लावण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता श्री मरगुबाई देवीची महापूजा व रात्री नऊ वाजता श्री सन्मित्र भजनी मंडळ, आजरा यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद तर रात्री नऊ वाजता निरवडे /सावंतवाडी येथील अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती प्रशांत सुतार व संयोजकांनी दिली.


निधन वार्ता
कृष्णा निकम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी वसाहत, आजरा येथील कृष्णा दौलत निकम / देवकरी मामा (वय ९२ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच मुलं आणि दोन मुली सुना, जावई नातवंडे, असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष निकम यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजता आवंडी वसाहत स्मशान भूमी येथे करण्यात येणार आहे.
सरस्वती देसाई

पेरणोली ता. आजरा येथील श्रीमती सरस्वती श्रीपती देसाई यांचे यांचे अल्पश: आजाराने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
‘ स्वाभिमानी ‘चे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई आणि पाटबंधारे विभागाचे निवृत्त शाखा अभियंता जनार्दन देसाई यांच्या आई होत.






