

शिवसेना शिंदे गट व जाहीर आघाडीचा काहीही संबंध नाही
पत्रकार बैठकीत शिवसेना पदाधिकारी यांची माहिती

आजरा:प्रतिनिधी
काल बुधवारी जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी आजरा साखर कारखाना पार्श्वभूमीवर विविध पक्ष व गटांच्या नेत्यांना एकत्र करून जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित केल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाचा आमदार, खासदार व मुख्यमंत्री असतानाही कोणत्याही प्रकारचा विचार यामध्ये करण्यात आलेला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. एकीकडे ज्या शिवसेनेकडे कोणतेही सत्ता नाही अशा शिवसेनेला तीन जागा देण्याचे मान्य केले आहे.
परंतु दुसरीकडे जिल्ह्यात व राज्यात आमदार, खासदार व मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे गटाला मात्र डावलण्यात आले आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेत शिंदे गटाला कोठेही विश्वासात घेतले गेलेले नाही अथवा शिंदे गटाच्या कोणत्याही प्रतिनिधीला या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलेले नाही. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत ही आघाडी स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेल्या स्थानिक नेते मंडळींनी आपली शिंदे गटाबाबतची भूमिका जाहीर न केल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्ते करीत आहेत अशी भावना पत्रकार बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आली.
झाल्या घडामोडी स्थानिक आमदार प्रकाशराव आबीटकर यांच्या कानावर घालण्यात आल्या आहेत. ते जो निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढील हालचाली करण्यात येतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय पाटील, विजय थोरवत, दत्तात्रय पाटील, काका देसाई, अनिल डोंगरे, दयानंद पाटील, इंद्रजीत देसाई, संतोष भाटले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ते ठरवणारे कोण?
कालच्या वरिष्ठ नेते मंडळींनी कारखान्यावरील निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये म्हणून तडजोडीची भूमिका घेण्यात पुढाकार घेतला त्या मंडळींच्या हातातच तीन वर्षांपूर्वी आजरा साखर कारखान्याला साडेतीन कोटी रुपये देण्याची सर्व सूत्रे असताना त्या मंडळींनी पुढाकार त्यावेळी का घेतला नाही ? केवळ या मंडळींच्या दुर्लक्षामुळे कारखाना दीडशे कोटीच्या कर्जामध्ये जाऊन पोहोचला आहे आताच या मंडळींना कारखान्यावरील निवडणूक खर्चाचा बोजा का आठवत आहे असा सवाल ही यावेळी उपस्थित करण्यात आला.
आमची काही किंमत आहे की नाही?
कुणीतरी उठायचे कोणाशी तरी तडजोडी करायच्या आणि रिकामे व्हायचे असा प्रकार सध्या सुरू आहे याबाबतच्या वाटाघाटी गेले पंधरा दिवस सुरू असताना शिंदे गटाला का विश्वासात घेतले गेले नाही ? आम्हाला काही किंमत आहे की नाही ? असा संतप्त सवाल यावेळी संजय पाटील यांनी उपस्थित केला.

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला…
बिनविरोध च्या हालचाली वेगावल्या

आजरा:प्रतिनिधी
आजरा शेतकरी साखर कारखान्या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस व दोन्ही शिवसेना गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रीत आले आहेत. वारणा येथे नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये भारतीय जनता पाटींचे अशोकअण्णा चराटी यांच्या गटाला १०, राष्ट्रीय काँग्रेसला ८ तर शिवसेना( उध्दव ठाकरे) गटाला ३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
१ डिसेंबरला माघारीचा अंतीम दिवस असून आज गुरुवारी (ता. ३०) पॅनेल रचनेला अंतीम स्वरुप मिळणार आहे. आमदार विनय कोरे व आमदार सतेज पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे.
एकीकडे पक्षीय पातळीवर व तालुक्यातील राजकीय गटांची पॅनेल रचना झाली असली तरी साखर कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध करण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्याचे या वेळी ठरले.बुधवारी कोल्हापूर व वारणा या दोन ठिकाणी राजकीय घडामोडी झाल्या, कोल्हापूर येथील अजिंक्यतारा येथे दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत बैठक झाली. वारणानगर येथे सायंकाळी सात वाजता आमदार कोरे यांच्या सोबत बैठक झाली.
या वेळी अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, संभाजी पाटील, मलिककुमार बुरुड,विलास नाईक, युवराज पोवार दशरथ अमृते, दिनेश कांबळे, अभिषेक शिंपी,जनार्दन टोपले, आदी प्रमुख उपस्थित होते.
सर्वांनी कारखान्याच्या हितासाठी एकत्रित याचे आहे. निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. प्रमुख नेतेमंडळी निवडणूकीतून बाजूला गेले तर सभासद, शेतकरी व कर्मचा-यांचे दायित्व कोण घेणार ? असा विचार पुढे आला. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूवीच निवडणूक रिंगणातून बाजूला राहणार असल्याचे सांगीतल्याने उर्वरीत सर्वांनी एकत्रित येवून पॅनेल करावयाचे ठरले.

असे झाले जागावाटप….
🔴भाजपचे अशोकअण्णा चराटी गट :- १० जागा (यामध्ये भाजपा, स्वाभिमानी संघटना, आमदार प्रकाश आबिटकर/ शिंदे गट यांचा समावेश )
🔴राष्ट्रीय काँग्रेस (आमदार सतेज पाटील गट):- ८ जागा
(यामध्ये जयवंतराव शिंपी गट- ४. गोकुळच्या संचालिका श्रीमती अजनालाई रेहेकर गट ३ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे-१ जागा)
🔴कारखान्याचे विदयमान अध्यक्ष व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे गट-३ जागा
⬛अधिकृत घोषणा आज होणार...⬛
राष्ट्रवादी सुट्टीतून बाजूला गेल्यानंतर उर्वरित प्रमुख पक्ष बघताना भक्कम आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला असून या आघाडीची अधिकृत घोषणा आज गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
⬛शिवसेनेसह शिंपी गट फायद्यात⬛
राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीला मिळणाऱ्या जागा या जयवंतराव शिंपी गट व शिवसेनेला वाढून मिळाल्या. यामुळे दोन्ही शिवसेना गटाला एकूण चार तर जयवंतराव शिंपी यांना चार जणांना प्रतिनिधीत्व देण्याची संधी मिळाली आहे.
⬛आता अपक्षांची भूमिका महत्त्वाची…⬛
निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेतेमंडळींनी बऱ्यापैकी समीकरणे जुळवून आणलेली आहेत. पण वरिष्ठांच्या या प्रयत्नांना अपक्ष मंडळी कितपत साथ देणार यावरही मतदान प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे. तर राष्ट्रवादीची मदत आपणाला मिळण्याची शक्यता कांही अपक्ष मंडळी वर्तवू लागली आहेत.
⬛निवडणुकीतील हवाच गेली…⬛
राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीतील हवाच गेली असून निवडणुकीतील चुरस, ईर्षा, आरोप- प्रत्यारोप व राजकीय खेळ्यांना बऱ्यापैकी पूर्णविराम मिळाला आहे.


पुनर्वसन प्रलंबीत प्रश्न प्रकरणी काम बंद आंदोलन :
सर्फनाला धरण व प्रकल्पग्रस्त संघटना

आजरा: प्रतिनिधी
सर्फनाला प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न अदयाप सुलटलेले नाहीत. प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. यंदा घळभरणी करून पाणी अडवण्याचे नियोजन सूरु आहे. यामुळे प्रकल्पाचे प्रश्न अनुत्तरीतच रहाण्याची शक्यता असल्याने त्यावर ठोस निर्णय होवून मागी लागावेत. या मागणीसाठी सर्पनाला घरण व प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतीने बुधवार (ता. ६) काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या कामाबरोबरच पुनर्वसनाचे कामही त्याच गतीने व्हावे, अशी मागणी सुरुवातीपासून संघटनेकडून केली जात आहे. प्रशासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी शेवटच्या टप्प्यात काही प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. शेळप व देवर्डे येथे होत असलेल्या नवीन वसाहतीमध्ये अदयाप वीज व पाण्याची सुविधा नाही. लाभक्षेत्रातील जमिनीचे सपाटीकरण झालेले नाही. शेळप व देवर्ड येथील घरे बांधणी सुरु असलेल्या भूखंड धारकांना पत्रा शेड देण्याची मागणी कायम आहे.
बुडीत क्षेत्रातील शेत घरे संपादन झालेली आहेत. अशा सर्वच शेत घरांचे अनुदान तयार करण्यात यावे, लाभक्षेत्रात वाटप झालेल्या जमिनीचे नकाशे व बदली प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सुरेश मिटके, मास्ती जाधव, एकनाथ गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, सखाराम सावंत, लक्ष्मण गुंजाळ, संकेत शेटगे, लक्ष्मण कांबळे, तुकाराम वाकर आदीच्या सह्या आहेत.


सर्व श्रमिक संघटना यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन

आजरा: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ श्रमिक शेतकरी संघटना, याच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. यावेळी गिरणीकामगार संघटना च्या वतीने महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर आजरा तहसील कार्यालय मध्ये नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले,
कष्टकरी, शेतकरी कामगार, श्रमिकांच्या विविध मागण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने कंत्राटीकरण थांबवून, किमान वेतन लागू करावे. कामगार कपात न करता , सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. त्याचप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा. वाढती महागाई, बेरोजगारी यांच्यासह शेतीला हमीभाव मिळावा. समन्वय पाणी वाटप व्हावे, दूध भाव वाढवावा, केंद्र शासनाने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत, स्वामीनाथन आयोग लागू करावा. आधी गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी , शेतकरी कामगार श्रमिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने स्थानिक पातळीवरील प्रश्नांच्यासाठी सुद्धा निवेदन देण्यात आले ,यामध्ये शेतकऱ्यांच्या काजू बियांना हमी भाव मिळावा , तसेच आजरा सहकारी साखर कारखाना कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्त्वाने चालावा, यासाठी शासनाने लक्ष द्यावे, नदीवरील मोटरीना पाणी मीटर बसवण्यास येवू नये, पाणी धोरणात व लाईट बिलात बदल करू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी काँ. शांताराम पाटील, नारायण राणे, निवृत्ती मिसाळ, हिंदुराव कांबळे, काॅ. संजय घाटगे, शांताराम हरेर, हरिभाऊ कांबळे, अशोक तानवडे, राजाराम मांगले, गोपाळ चाळके इत्यादी उपस्थित होते .


‘व्यंकटराव ‘मध्ये म. फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन

आजरा: प्रतिनिधी
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे हस्ते करण्यात आले.. यावेळी व्ही. पी. गावडे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. विठ्ठल विजय दळवी, अस्मिता उत्तम नावलकर, सक्षम शशिकांत कांबळे, समृद्धी नामदेव दोरूगडे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. समीक्षा शिवाजी मांगले, साक्षी शिवाजी कुंभार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केल्या.
व्ही.टी.कांबळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विषयी सांगताना ते थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते व जातीवादाला कडाडून विरोध करणारे एक धाडसी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व अंधश्रद्धेचे निर्मूलन आणि महाराष्ट्रात स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे क्रातींकारी कार्य,यांचे शिक्षणावर असणारे प्रेम, त्यांनी पहिली स्त्री शिक्षिका घडविली, तसेच त्यांचा गोरगरीब ,दिन दलित यांच्या विषयी असणारा जिव्हाळा आपल्या भाषणात सांगितला.
एम.एम.देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन समृद्धी सिताराम पाटील व सान्वी ज्ञानदेव निऊंगरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


