गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५

प्रभाग सीमा रचनेबाबत आवंडी ग्रामस्थ आक्रमक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग सीमा आराखड्याबाबत आवंडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत मोठ्या संख्येने हरकती घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
नवीन सीमा रचनेमध्ये वसाहत प्रभाग क्रमांक १७ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये आवंडी वसाहती बरोबर कर्पेवाडी दुध संस्था, चाफे गल्ली, अभिषेक काजू फॅक्टरी परिसर, आवंडी वसाहत प्राथमिक शाळा,आदी भागांचा समावेश करण्यात आला आहे. अशी रचना आपणाला मान्य नाही असे आवंडी ग्रामस्थ यांच्याकडून स्पष्ट केले जात आहे. आवंडी वसाहतीतील सर्व नागरिक धरणग्रस्त असून धरणातील घरे व शेती यावरून विस्थापित होऊन आवंडी वसाहतीत स्थायिक झाले आहेत. पूर्वी त्यांचे स्वतंत्र ग्रामपंचायत क्षेत्र होते त्यामुळे त्यांना एकत्रितपणे विकासासाठी प्रयत्न करणे सोपे जात होते परंतु सध्या नगरपंचायत प्रभाग रचनेमध्ये प्रभाग १७ मध्ये समाविष्ट करताना गांधीनगर व चाफेगल्ली हे भाग घेण्यात आले आहेत या समावेशामुळे आवंडी वसाहतीतील धरणग्रस्त नागरिकांच्या मूलभूत गरजा व विकास कामांना बाधा निर्माण होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
या सर्व कारणामुळे या प्रभाग सीमा रचनेस हरकती घेण्याची तयारी सुरू केली आहे.

पावसाची थोडीशी विश्रांती
पन्नासवर घरांची पडझड

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर थोडा ओसरला असून तालुक्यातील पाण्याखाली गेलेले साळगाव वगळता अन्य बंधारे वाहतुकीकरता खुले झाले आहेत.
जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची मोठी पडझड सुरू झाली आहे. या पडझडीत लाखोंचे नुकसान झाले आहे.
सर्फनाला, चित्री, चिकोत्रा, आंबेओहोळ व उचंगी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे पाणी अद्यापही पात्राबाहेरच आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वाहतूक वाढली…
बुधवारी सकाळच्या सत्रामध्ये गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने आजरा मार्गे वाहतूक वाढली होती. दिवसभर एसटी महामंडळाच्या गाड्या व खाजगी चार चाकी गाड्या मोठ्या संख्येने कोकणच्या दिशेने जाताना दिसत होत्या.

उत्तूरचे ज्येष्ठ व्यापारी सुरेशआण्णा हजारे यांचे निधन...

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर शहरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यापारी सुरेशआण्णा हजारे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते उत्तूर मध्ये भांडी व्यवसाय करत होते. व्यापारी क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते. सध्या ते जोमकाईदेवी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत होते.अतिशय शांत, संयमी व सर्वांना सन्मान देणारा स्वभाव ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या निधनाने व्यापारी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उत्तुरचे ज्येष्ठ व्यापारी श्री.बाळूअण्णा हजारे यांचे ते बंधू होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

आरोग्यदायी जीवनासाठी सत्वयुक्त आहार गरजेचा : बाबासाहेब पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्याच्या धावत्या युगात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सत्वयुक्त आहार गरजेचा आहे. आहारात रानभाज्यांचा वापर केल्यास आरोग्य टिकवता येईल. असे प्रतिपादन रानभाज्यांचे अभ्यासक बाबासाहेब पाटील यांनी केले.
आरदाळ (ता. आजरा) येथे रानभाजी महोत्सव झाला. या वेळी महीलांसाठी पाककृती स्पर्धा झाल्या. आजरा तालुका कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजन केले होते. गडहिंग्लजचे उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच विद्याधर गुरव, चिमणेचे माजी सरपंच वसंतराव तारळेकर प्रमुख उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, रानभाज्यांचे महत्व आपल्या पुर्वजांना माहीत होते.
त्यांच्याकडून रानभाजी व त्यातील गुणधर्म याची माहीती पिढ्या दर पिढ्यांकडे चालत आलेली आहे. या रानभाज्यांचा वापर आहारात असायला हवा. या वेळी त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या व त्यांचे महत्व सांगीतले. शांताबाई पावले, सोनाबाई चोथे यांनी रानभाज्यांच्या विषयी अनुभव मांडले.
या वेळी कृषी अधिकारी दीपक मुळे, मंडल कृषी अधिकारी विजयसिंह दळवी, प्रदीप माळी, आमकार सुर्यवंशी, शिवाजी जाधव, शिवाजी गुरव, शिवाजी गडकरी, ग्राम महसुल अधिकारी अशोक कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब पाथरवट, मनिषा गुरव, महीला व ग्रामस्थ उपस्थित होते. परीक्षक म्हणून मनिषा पाटील, योगेश जगताप, श्रीकृष्ण पालवे, तृप्ती पाटील यांनी काम पाहीले. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) अमित यमगेकर यांनी स्वागत तर सुर्यकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विलास पुंडपळ यांनी सुत्रसंचालन तर पी. जी. पाटील यांनी आभार मानले. आभार मानले.
रानभाजी पाककला स्पर्धत विजेते :-
उज्वला बापूसाहेब शेळके, गीता संतोष पाटील (प्रथम), माया शिवाजी जाधव (द्वितीय), हौसाबाई शिवाजी कांडगळ (तृतीय). रेखा नेताजी पाटील, उज्वला प्रकाश पुंडपळ यांनी उत्तेजनार्थ बक्षिस पटकावले.

उत्तूरला लवकरच क्रीडांगणाची भेट ; खेळाडूंच्या २००२ पासूनच्या लढ्याला यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
उत्तूर गावातील तरुणाई व खेळाडूंनी २००२ पासून केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गावात स्वतंत्र क्रीडांगण व्हावे या मागणीसाठी अनेक युवकांनी सातत्याने लढा दिला. परंतु याची दखल कोणत्याही नेत्यांनी घेतली नव्हती. आजवर खेळाचे महत्त्वच न पटल्याने उत्तूर विभागातील अनेक खेळाडू संधीअभावी मागे राहिले. योग्य सुविधा मिळाल्या असत्या तर आजवर अनेक नावे क्रीडाक्षेत्रात चमकली असती.क्रीडांगणाच्या मागणीसाठी २००२ पासून अभिजीत झेंडे-पाटील, अनिल लोखंडे, संजय धुरे,सागर येसादे,मंदार हळवणकर, दत्ता माने, वैभव कुऱ्हाडे, महेश कांबळे, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, विल्यम्स रॉड्रीज, भारत लोखंडे,सुधीर सावेकर, सुहास पोतदार, राजू पाटील,अमित झेंडे पाटील,संदीप झेंडे-पाटील, अभिनंदन परुळेकर आदी खेळाडूंनी मोठा उठाव केला होता.
त्यानंतर २०१८ पासून ही मागणी पुन्हा जोर धरू लागली. यावेळी स्वप्निल मांडे, अनिकेत नाईक, गौरव कांबळे, अमोल नाईक, किरण मुळीक, राजू पुरी आदी नव्या खेळाडूंनीही या आंदोलनात सहभाग घेतला.आता ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी अमोल येडो यांना निवेदन देऊन गायरान गट क्र. १४९६ मधील पाच एकर जागा क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या मागणीला पाठिंबा देत सरपंच किरण आमणगी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, गावातील खेळाडूंना हक्काचे मैदान मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निवेदन देताना सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, राजेंद्र खोरोटे, मिलिंद कोळेकर आदी उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्यता व जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवर्गातील विविध योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करावी. हे यश मिळविणाऱ्यासाठी कठोर परिश्रमाची व संयमाची गरज आहे, असे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी केले. विद्यार्थी सहाय्यता व जनजागृती अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमात सामाजिक विभागाच्या सारथी, बार्टी, अमृत, महाज्योती या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन सारथी चे समन्वयक भिकाजी कांबळे यांनी करून दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी आजरा ग्रामीण भागांतील मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत असल्याचे सांगून विद्यार्थ्यानी या योजनांचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ. लता शेटे, आभार प्रा. स्वप्नील जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई व त्यांचे सहकारी, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील व डॉ. करपे, डॉ. सलमा आत्तार उपस्थित होत्या.

दोन सुधीर एकत्र...

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीरबापू कुंभार यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.



