mrityunjaymahanews
अन्य

मुश्रीफ जिंकले… अण्णा हरले… जिल्हा बँकेचा आजरा तालुक्यातील निकाल धक्कादायक

नामदार मुश्रीफ जिंकले…. अण्णा हरले

आजरा तालुक्यात धक्कादायक निकाल.

 …….ज्योतिप्रसाद सावंत 

राजकारणात कोणतीही निवडणूक सहज घेऊ नये असे म्हटले जाते निवडणुकीतील तंत्रे, निकष,व्यूहरचना ही निवडणुकीप्रमाणे असावी अन्यथा दगाफटका अटळ असतो नेमका हाच प्रकार जिल्हा बँक निवडणुकीत अशोकअण्णा चराटी यांनी अनुभवला. सुधिर देसाई यांची उमेदवारी सहज घेऊन त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर आव्हान देणाऱ्या चराटी यांनाच अखेर पराभवाला सामोरे जावे लागले व जिल्ह्यातील धक्कादायक निकालांमध्ये आजरा तालुक्याच्या निकालाचा समावेश झाला या लढतीत घडलेल्या घडामोडी पाहता सुधीर भाऊ जिंकले असे म्हणण्यापेक्षा आमदार हसन मुश्रीफ जिंकले असेच म्हणावे लागेल.

अशोकअण्णांचा संचालक म्हणून जिल्हा बँकेतील प्रवेश हा मंत्री मुश्रीफ आमदार विनय कोरे यांच्यामुळे झाला. परंतु कालांतराने चराटी यांच्यात दुरावा निर्माण झाला. चराटी यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर ना. मुश्रीफ व चराटी यांच्यामधील संबंध बऱ्यापैकी ताणत गेले. याच कालावधीत आजरा नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची ‘टीम सतेज’ च्या माध्यमातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक, वर्षभरापूर्वी पंचायत समिती पदाधिकारी निवडीवेळी झालेला संघर्ष राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दुखावणारा होती. याचा परिणाम म्हणून शिंपी यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला.

अलीकडेच झालेल्या ‘गोकुळ’ निवडणुकीच्या उमेदवारीसाठी शिंपी प्रयत्नशील होते. परंतु राष्ट्रवादीच्या तालुक्यासह जिल्ह्यातील लॉबीने त्यांना उमेदवारीपासून दूरच ठेवले याची सल शिंपी यांना होती या प्रकरणात सुधिर देसाई यांनी महत्त्वाची भूमिका घेतली असा आरोप शिंपी गटाकडून केला गेला जिल्हा बँकेचे निवडणूक नगारे वाजू लागल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सुधिर देसाई यांचे नाव निश्चित होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंपी यांनी थेट अशोकअण्णा चराटी यांच्याशी हात मिळवणी केली. इकडे भाजपा प्रवेशानंतर एकाकी पडलेल्या अशोकअण्णांना शिंपी यांच्यामुळे चांगलेच बळ मिळाले तालुक्यातील दोन प्रबळ गट एकत्र आल्याने देसाई यांचा या निवडणुकीत कितपत निभाव लागणार ? असा प्रश्नही चर्चेत आला चराटी यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात जाहीर विधाने करण्यास सुरुवात केली. जिल्हा पातळीवरील बँकेच्या राजकीय घडामोडीत भविष्यात राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ आवश्यक होते आणि ते वाढवण्याची जबाबदारी अर्थातच मुश्रीफ यांच्यावर होती. अशोकअण्णांची वक्तव्ये, शिंपी यांची भूमिका व संचालकांच्या संख्याबळाचे अधोरेखित झालेले महत्त्व विचारात घेऊन शेवटच्या टप्प्यात निवडणूक स्वतःच्या हातात घेत मंत्री मुश्रिफ यांनी देसाई यांना विजयापर्यंत नेले. सुरुवातीला अशोकअण्णाना सोपी असणारी निवडणूक अखेरच्या क्षणी पराभवास सामोरे जाण्यास कारणीभूत ठरली.

एकीकडे मुश्रीफ यांच्यासारखा जिल्ह्यातील नेता देसाई यांना रसद पुरवत असताना भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चराटी यांना एकाकी लढावयास लावून आपापले सोयीचे राजकारण सांभाळले असे म्हटले तरी ते चुकीचे होणार नाही तसा आरोपही आता चराटी यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. या निवडणुकीत ना. मुश्रीफ जिंकले चराटी हरले असेच म्हणावे लागेल.

3

जयवंतराव शिंपी गटाच्या भवितव्याचा प्रश्न

पारंपारिक विरोधक चराटी यांच्याशी संधान बांधल्याने शिंपी यांचा हा निर्णय काही कार्यकर्त्यांना रुचला नाही. परिणामी त्यांच्या बर्‍यापैकी ठराव धारकांनी थेट सुधीर देसाई यांना मदत केली. यांच्या पराभवाची मोठी राजकीय किंमत चराटी यांच्यापेक्षा शिंपी यांना भविष्यात मोजावी लागणार आहे. बॅकफूटवर गेलेल्या चराटी यांच्यासोबत जाताना जिल्हा परिषद पंचायत समिती आजरा साखर कारखाना निवडणुकीला सामोरे जाताना शिंपी यांना अनेक अडचणी येणार आहेत. तर जनता बँक व तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकवेळ त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीची मंडळी कमी पडतील असे वाटत नाही.

मृत्युंजय महान्यूज’ च्या अंदाजाची चर्चा

मृत्युंजय महान्यूजच्या वतीने तीन डिसेंबर रोजीच्या बुलेटीन मध्ये आजरा तालुक्याचा जिल्हा बँक कल ५८ विरुद्ध ४८ असा राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. तब्बल महिनाभरापूर्वी जाहीर केलेला हा निकालाचा कल आज तंतोतंत असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. याची तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

संदीप देऊसकर यांना विशेष पुरस्कार

‘मृत्युंजय महान्यूज’ चे प्रतिनिधी संदीप उत्तमराव देऊसकर यांची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांचा राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव ( कार्यक्षेत्र-, सामाजिक) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . त्यामूळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

छत्रपती युवा ग्रुप बस स्थानक लोकार्पण सोहळा

छत्रपती युवा ग्रुप यांनी सामजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. या ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मी मंदीर येथे उत्तूर ते बेडिव व उत्तूर ते गारगोटी प्रवासासाठी बस स्थानक उभे केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सरपंच वैशाली आपटे, उमेश आपटे, संभाजी कुराडे,संजय धुरे, महेश करबळी, ग्रुप चे अध्यक्ष योगेश भाईगडे  शिवणे,संग्राम घोडके यांनी  ग्रामस्थ , व ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

मेढेवाडी येथे हत्तीचा धुमाकूळ… चार चाकी नेली फरफटत

मेढेवाडी (ता. आजरा ) येथे हत्तीने धुमाकूळ घालत पाण्याच्या टाक्या फोडल्या तर मारुती ओमनी चारचाकी तब्बल ८० फूट फरफटत नेली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजी रामचंद्र शेटगे रा. मेढेवाडी यांच्या शेतात तर अक्षरश: हत्तीने धुमाकूळ घातला. पाण्याची टाकी फोड्ली तसेच मारुती ओमनी गाड़ी सुमारे ८० फुट फरफटत नेऊन उचलुन आपटली. गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुधीर देसाई यांची जंगी मिरवणूक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नूतन संचालक सुधीर देसाई यांचे आजरा शहरासह तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले .येथील शासकीय विश्राम गृह जवळिल  पेट्रोल पंपापासून तालुका खरेदी-विक्री संघाच्या इमारतीपर्यंत कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व सवाद्य जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली. यामध्ये सभापती उदय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, युवा तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, रणजित देसाई,अनिल फडके, राजलक्ष्मी देसाई, महादेव पोवार, जोतीबा चाळके, जनार्दन बामणे, राजेंद्र देसाई, राजू मुरकुटे, विक्रम देसाई, आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा, पंचायत समिती सदस्या रचना होलम, राजलक्ष्मी देसाई, विठ्ठल देसाई, संभाजी पाटील, संभाजी पाटील (हात्तीवडेकर) अबुताहेर तकीलदार, जयवंत पाटील, बाळासाहेब देसाई, सिद्धार्थ तेजम, निशांत जोशी, वृशाल हुक्केरी, नामदेव पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व देसाई समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विजयानंतर बोलताना सुधीर देसाई यांनी कार्यकर्त्यांच्या संघटीत प्रयत्नांचा हा विजय असल्याचे सांगितले.

रोझरी इंग्लिश स्कूल वाटंगीच्या  सुवर्णमहोत्सव समारंभाचे आज उद्घाटन

वाटंगीतील रोझरी इंग्लिश स्कूल शाळेचे सन २०२१-२२ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, या हे महोत्सवाचे उद्धघाटन ०८ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना • हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री ना. सतेज पाटील, चंदगडचे आमदार मा. राजेश पाटील, गोव्याच्या सि. वरना उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग क्रिस्ती धर्मप्रांत डायसिसचे रेव्हरंड विशप अल्विन बरेटो हे अध्यक्ष स्थानि असणार आहेत. यांच्यासह समाजातील मान्यवर सदस्य, पदाधिकारी, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. शाळेला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन शालेय प्रशासन व माजी विद्यार्थी संघटनेकडून केले आहे. त्यामध्ये भागातील मुलांसाठी व ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिविर, विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, वौद्धिक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्याच्या जागरूकतेसाठी कार्यशाळा, पालकांसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी क्षेत्रभेट, फनी गेम्स, वृक्षारोपण, विविध गुणदर्शन कार्यक्रम, संस्थापकांचा व शिक्षकांचा सत्कार, स्नेहभोजन या व अशा अनेक विविध भरगच्च उपक्रमांची रेलचेल या सुवर्णमहोत्सवी वर्षा त चालणार आहे.
स्वर्गीय फादर जोव डिसिल्व्हा यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनातून रोझरी ट्रस्ट, आजरा या संस्थेची रोझरी इंग्लिश स्कूल हि इंग्रजी माध्यमाची शाळा १९७२ मध्ये वांटगी येथे स्थापन झाली. त्यानंतर फादर प्रभुदर यांनी या शाळेचा सर्वांगीन विकास केला. शाळेने स्थानिक संस्थापकीय मंडळ व शालेय प्रशासन यांच्या योगदानतून, अथक परिश्रमातून असंख्य अडचणी पार पाडत आपले अर्धशतक पार केले आहे. शाळेने सुसंस्कारीत केलेले असंख्य विद्यार्थी स्वावलंबी होऊन आपापल्या क्षेत्रात यशस्वी घोडदौड करत आहेत.

या शाळेशी असलेला आपला ऋणानुबंध जपत माजी विद्यार्थ्यांनी नोंदणीकृत रोझरी माजी
विद्यार्थी संघटना वाटंगी स्थापन करून त्या माध्यमातून शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरे केले जाणार आहेत.
तरी या महोत्सवास भागातील सर्व नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शाळेशी ऋणानुबंध असणा-या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन फा फेलीक्स लोबो ( मॅनेजर रोझरी स्कुल, बाटंगी ), सिस्टर अल्का रोझारिओ एस. एफ. एन. (मुख्याद्यपिका रोझरी इंग्लिश स्कुल वांटगी) व डॉ. रोझारिओ पास्कल डिसोझा (अध्यक्ष रोझरी माजी विद्यार्थी संघटना वाटंगी ) यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यातील युवक अपघातात ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी: आज-यात जि. प. उपाध्यक्ष शिंपी यांची मागणी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!