mrityunjaymahanews
अन्य

तरुणाचा मृत्यू

 

तरुणाचे आकस्मिक निधन

                     आजरा : प्रतिनिधी

        फिरोज अशकरअल्ली माणगावकर रा..पटेल कॉलनी,आजरा या २४ वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्याच्या पश्चात आई,पत्नी, २ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

       गवंडी काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या व मेंढ्यांच्या टक्करींचा शौकीन असणाऱ्या फिरोज याचे ऐन रमजान महिन्याच्या तोंडावर निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रामतीर्थ यात्रा उत्साहात
भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

                    आजरा : प्रतिनिधी

        आज-यापासून जवळच असलेल्या रामतीर्थ परिसरात भरणारी यात्रा उत्साहात पार पडली. आजरा तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी यात्रेस हजेरी लावली होती.

          यात्रेनिमित्त ठिकठिकाणी मिठाई,अल्पोपहार, शीतपेये ,खेळणी यासह विविध प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले होते.

         दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास श्री रवळनाथ मंदिर येथून यात्रास्थळी पालखी नेण्यात आली. पालखी सोहळ्यासह यात्रेला हजेरी लावण्याकरता दुपारी तीन वाजल्यानंतर भाविकांनी रामतीर्थ परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत यात्रा सुरू राहिली.

        यात्रेच्या पार्श्वभूमीवर एसटी आगारातून विशेष बसफे-या सोडण्यात आल्या होत्या. पोलीस व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्याकरता विशेष प्रयत्न केले.नगरपंचायतीचे कर्मचारीही यात्रास्थळी उशिरापर्यंत थांबून होते. यात्रेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली. तालुक्यात गजरगाव, निगुडगे,खेतोबा परिसरातील महाशिवरात्री उत्साहात पार पडली.

अन्याय निवारण समिती व संवेदना फाउंडेशन चर्चेत

        यात्रा सुरळीत पार पाडण्याकरिता सुरुवातीपासून प्रयत्नशील असणाऱ्या अन्याय निवारण समितीने यात्रेमध्ये बंदोबस्ताकरीता असणारे पोलीस, गृह रक्षक दलाचे जवान, नगरपंचायत व एस. टी. महामंडळाचे कर्मचारी आदींची पिण्याच्या पाण्यासह चहा-पाणी, अल्पोपहार व्यवस्था केली होती. संवेदना फाउंडेशन च्या वतीनेही विविध उपक्रम राबवण्यात आले.

मडिलगे येथे आग…
कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान 

                     आजरा: प्रतिनिधी 

         शुक्रवारी रात्री मडीलगे ता.आजरा येथील गळीगोप या परिसरामध्ये अचानक आग लागली. गावाशेजारी असणाऱ्या या परिसरामध्ये शेतकऱ्यांची शेतातील घरे व घरामध्ये शेती उपयुक्त औजारे व साहित्य असल्याने या घरांचा आगीपासून बचाव करण्यासाठी सरपंच बापू नेउंगरे यांच्यासह स्थानिक तरुणांनी तातडीने या भागाकडे धाव घेतली. चारही बाजूंनी आगीच्या विळख्यात असणाऱ्या घरांचे संरक्षण करण्यात मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले. सुदैवाने यामध्ये किरकोळ नुकसान वगळता अन्य कोणतीही मोठे नुकसान झाले नाही.

        विनोद लकमले, हणमंत येसणे, सचिन लकमले, मारूती जानबा येसणे यांची शेतातील घरे या परिसरात आहेत. सरपंच बापू नेउंगरे व त्यांच्या दहा- बारा साथीदारांनी आग विझविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

सोमवार पासून दोन दिवस तालुक्यात संविधान बचाव दिंडी

                     आजरा: प्रतिनिधी

         देशाचे संविधान आज अडचणीत आले असून ते वाचवले तर भविष्यात नागरिक म्हणून आपले हक्क अबाधित राहतील. यासाठी आजरा तालुक्यात निघणारी संविधान दिंडी मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार आज आजरा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.

       सुरवातीला कॉ. संपत देसाई यांनी संविधान दिंडी मागील भूमिका सांगून गडहिंग्लज व चंदगड येथील रॅलीचा आढावा घेतला. गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथून सुरू झालेली संविधान बचाव दिंडी चंदगड तालुक्यातून आता आजरा तालुक्यात येणार आहे. सरोळी येथून सोमवारी सकाळी ही दिंडी निघून ती निंगुडगे कोवाडे, पेंद्रवाडी, हजगोळी येथून आजरा येथे सायंकाळी ४ वाजता येईल त्यानंतर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे अध्यक्षतेखाली सभा होईल.

        दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९ वाजता संविधान दिंडी महागोंड येथून निघून वझरे, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देव कांडगाव, दांभिल, शेळप येथून गवसे येथे येईल. तेथे आल्यानंतर सभा घेऊन या दिंडीची सांगता होईल.

        यावेळी उमेश आपटे, संभाजी पाटील, उदय पवार, नौशाद बुडडेखान, रशीद पठाण, संजय तरडेकर, युवराज पोवार, संजय सावंत, राजू होलम, रणजित देसाई, उदय कोडक, किरण पाटील, जोतिबा चाळके, रवी भाटले, ओंकार माद्याळकर, दशरथ घुरे, समीर चांद, संकेत सावंत यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बसफे-या व्यवस्थापनातील विस्कळीतपणा थांबवा…
मनसेचे आगारप्रमुखांना निवेदन

                     आजरा : प्रतिनिधी

         सध्या आजरा आगाराच्या बसफे-यांमध्ये विस्कळीतपणा आला असून जादा घराच्या बस फेऱ्या चालू आहेत. परंतु यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आगाराने बसफेऱ्या सुरळीत करण्याबरोबरच साध्या दराच्या बसेस सुरू कराव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन आगार व्यवस्थापकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

         आजरा आगारामध्ये बसची कमतरता असलेने वेळेचे व्यवस्थापण विस्कळीत झालेले आहे.सध्या महामार्गाचे काम युध्द पातळीवर चालू असलेने सर्वत्र रस्त्याची खुप दुरवस्था झालेली आहे. वाहन चालक गाडी निष्काळजीपणे चालवताना दिसतात .तर अशा वाहन चालकांवर त्वरित समज देऊन कारवाई करावी. लोकांच्या सेवेसाठी ग्रामीण भागाला जोडणारी एस.टी. टीकली पाहिज यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील आहे.

       मुख्यमंत्री, जिल्हयाचे आमदार, खासदार, मंत्री-संत्री कोणीही स्वत:च्या पक्षाच्या विवि कार्यक्रमासाठी बसेस मागवतात त्यावेळी ठामपणे आपल्या विभागातून नकार देणे गरचेजे आहे. आधी बसेसची कमतरता असलेने विदयार्थी वर्गात व ग्रामिण भागातून प्रवाशांना ये-जा करण्यास खुप त्रास सहन करावा लागतो. याला नेत्यां बरोबरच अधिकारीसुद्धा जबाबदार असून इथून पुढे असे निदर्शनास आल्यास आजरा आगारातून एकही बस बाहेर जाऊ दिली जाणार नाही आणि यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास आपले आजरा आगार व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे.

     या निवेदनावर तालुका अध्यक्ष आनंदा घंटे, जिल्हा सरचिटणीस सुधीर सुपल, तालुका अध्यक्ष सुशांत पोवार ,अंकुश लोहार, परशुराम पाथरवट, चंद्रकांत इंगळे, सुनील पाटील, अश्विन राणे आदींच्या सह्या आहेत.

मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची यात्रा उत्साहात

                     आजरा: प्रतिनिधी

         मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची प्रतिवर्षाप्रमाणे काल, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करणेत आले , सुरुवातीला चाळोबा देवाची पालखी प्रदक्षिणा करण्यात आली . हा सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांसह महिला व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती .

         यावर्षी प्रथमच मलिग्रे ग्रामपंचायत व देवस्थान कमिटी ग्रामस्थ मार्फत महाप्रसादाचे आयोजन केले होते.

देऊळवाडी येथे रस्सीखेच स्पर्धा

                      आजरा:प्रतिनिधी

         देऊळवाडी ता. आजरा येथे जय भवानी कला क्रीडा मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक १४ मार्च रोजी रात्री आठ वाजता रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७७७७/- रू.रोख व ५ फुटी ढाल,५५५५/-रु. रोख व ४ फुटी ढाल, ३३३३/- रुपये रोख व तीन फुटी ढाल,११११/-रु.रोख व २ फुटी ढाल असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे आणखी एका तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!