शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५




गायब कुत्री सापडत आहेत मृतावस्थेत…
हल्लेखोर बिबट्या की तरस…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे ता.आजरा परिसरात कुत्री गायब होण्यासंदर्भातील बातमी ‘मृत्युंजय महान्यूज’ने प्रसिद्ध केल्यानंतर येथील ग्रामस्थ सतर्क झाले असून ठीक ठिकाणी गायब कुत्र्यांचे काही ठिकाणी डोके नसलेल्या अवस्थेतील तर काही ठिकाणी धड नसलेल्या परिस्थितीतील मृतदेह आढळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
एकंदर हा प्रकार बिबट्याकडून सुरू आहे की तरसाकडून याबद्दल संभ्रमावस्था आहे. कांही ग्रामस्थ या भागामध्ये तरस या प्राण्यांचा वावर असल्याचेही सांगतात व त्यांनी प्रत्यक्ष या प्राण्यांना पाहिल्याचेही सांगितले जाते.

एसटी वाहतूक नियंत्रकांकडून अपमानित चाफवडे ग्रामस्थांनी बस स्थानकावर अडविल्या गाड्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आठवडा बाजाराचा दिवस असूनही शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून आजरा बसस्थानकातून चाफवडे (ता. आजरा) या गावी जाण्यासाठी एसटी बस सोडण्यात न आल्याने बससाठी थांबलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.
प्रवाशांनी आजरा बस स्थानकावर उपस्थित असलेले वाहतूक नियंत्रक राम मुंडे यांच्याशी संपर्क साधत गाडी बाबत विचारणा केली असता मुंडे यांनी प्रवाशांना चालत गावी जा, अशी भाषा वापरली. त्यामुळे या संतापात भरच पडत गेली.
चाफवडे गावच्या बस अभावी खोळंबलेल्या प्रवाशांनी बस स्थानकातून बाहेर जाणाऱ्या गाड्या अडवल्या व आवारातच ठिय्या मांडला. अखेर आजऱ्याचे पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे पोलीस पथकासह आजरा बस स्थानकावर आले व चाफवडे ग्रामस्थांची समजूत काढली. आजरा आगार व्यवस्थापनाला चाफवडेला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर बस स्थानकावरील तणाव निवळला.
आजरा आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी ? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून होत आहे.


सहकार भारतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी डॉ. अनिल देशपांडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इचलकरंजी येथील यशवंत प्रोसेसिंग येथे सहकार भारती कोल्हापूरची बैठक प्रदेश महिला प्रमुख सौ. वैशाली आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आजरा तालुक्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यानुसार तालुकाध्यक्ष म्हणून डॉ. अनिल देशपांडे यांची तर महामंत्री पदावर श्रीपाद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. इतर पदांवर मिलिंद पूजारी, रमेश कारेकर, जयवंत येरुडकर, महादेव खाडे आदिंची निवड करुन त्यांना सहकार भारती कोल्हापूर अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना कोल्हापूर विभाग सहसंघटक जवाहर छाबडा यांनी केली. सौ. वैशाली आवाडे यांचेसह प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले यांनी सहकार भारती चे कार्य व उद्देशांची माहिती दिली. जिल्हा महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी आभारप्रदर्शन केले.
यावेळी संघटन प्रमुख सागर हुपरे, सचिव संजय सातपुते, महिला प्रमुख सुषमा पाटील, कोषाध्यक्ष अमोल कनवाडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.


‘बिरेश्वर’ कडून आजरा येथील मृत सभासदाच्या वारसास आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., एक्संबा (मल्टी स्टेट), शाखा- आजरा येथील बचत कर्जदार हिना फय्याज मुल्ला रा. आजरा यांचे आकस्मित निधन झाल्याने यांचे वारस रियाज आप्पा मदार (वडील ) यांना संस्थेकडून सदस्य कर्जदार मरणोत्तर निधीतून रु. ३०,०००/- इतके आर्थिक धनसहाय्य, शाखा चेअरमन श्री. ज्योतिप्रसाद सावंत याच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी शाखेचे संचालक श्री.महेश कुरुणकर, श्री.अनिकेत शिंत्रे, श्री.सुशांत निकम, श्री सुनील डोणकर, श्री.सुरेश मिटके व सभासद, शाखा कर्मचारी उपस्थित होते.
निधी मंजूरीसाठी संस्थापक माजी खासदार श्री. आण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका माजी मंत्री आमदार सौ.शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले.


उपवनसंरक्षक यांच्या उपस्थितीत बैठक ठरल्याने ७ एप्रिलचा मोर्चा स्थगित….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपावा, शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. वनविभागाने १६ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याचे पत्र दिले.
यावर बैठकीत चर्चा झाली, उपवनसंरक्षक यांचे सोबतच्या बैठकीत कशी चर्चा होते हे पाहून चळवळीची पुढील दिशा ठरवावी असे एकमताने ठरले. १६ तारखेला सकारात्मक चर्चा न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत ठरला.
बैठकीला कॉ. संपत देसाई, संजय सावंत, प्रकाश मोरुस्कर, गोविंद पाटील, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, प्रकाश शेटगे, अशोक मालव, बाबू येडगे, नारायण भडांगे, सचिन बिरजे, भीमराव माधव, शंकर पाटील, विष्णू पाटील,मारुती पाटील, ज्ञानदेव गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अभ्यागतांसाठी तहसील कार्यालयात वाचन सुविधा कक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तहसिलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांना थोडासा विसावा घेत शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी अभ्यास पुस्तके ठेवून अभ्यागत वाचन कक्ष सुरू करण्यात आला असून या ठिकाणी बसण्याची व्श व पिण्याच्या पिण्याची सोय केली असल्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी सांगितले.
यावेळी काशिनाथ मोरे, किरण के. के. , संजय घाटगे, डाॅ सुदाम हारेर, गोविंद वांजोळे , सुमन कांबळे यांनी अभ्यासगत कक्षाला भेट दिली.


एन .एम .एम.एस. परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलची यशस्वी गरुड भरारी…
तब्बल १६ लाख २२ हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एन.एम.एम.एस.परीक्षतील व्यंकटराव हायस्कूल आजरा या प्रशालेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी :-तेजम संस्कार संजय,दळवी कार्तिक रमेश ,गुरव रुद्र विशाल,कातकर रुद्र राहुल ,जावळे विभावरी विक्रम,गिरी आयुष ओंकार,देसाई धनश्री महेश,पाटील श्रावणी शिवाजी
सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी :-
चौगुले सानवी लक्ष्मण,चौगुले स्वराली प्रशांत,पाटील स्वरांजली उत्तम,जाधव राजवीर सुरज ,सोले सानवी लक्ष्मण,कदम सृष्टी दशरथ,पाटील वैष्णवी बाबासो,अमृता बाळकृष्ण दोरुगडे
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी:- कांबळे आदर्श प्रकाश
सारथी पात्र विद्यार्थी :-
कोंडुसकर मधुरा शिवाजी, मातले वैष्णवी भिकाजी, सरदेसाई राजवर्धन राजेंद्र,देसाई जान्हवी चंद्रकांत,मांगले तनिष्का तानाजी,नाईक हंसिका सुनिल,बोलके हर्षद प्रकाश, देसाई पार्थ महेंद्र, नाईक अधिराज अनिल,नांदवडे वेदांत जितेंद्र,भोगुलकर चिन्मयी गिरीश,पाटील सिमरण अशोक,पाटील निरंजन गणेश,देसाई स्मिता उदय,जाधव स्नेहा संजय,देसाई अंकिता संदिप,पाटील प्रज्वल मोहन,पाटील प्रतिक मनोहर,इलगे अर्चना सागर,पाटील अर्णव योगेश,गिलबिले सुमित संतोष, पाटील स्वराज संजय,येसादे आयुष सुनिल
श्री.पी.व्ही.पाटील, श्री.एस.वाय.भोये, श्री.एम.एस.पाटील,श्री.आर.पी.पाटील,श्री.के.बी.खोत, सौ.ए.एस.गुरव,सौ. अे. डी.पाटील, श्री.पी.एस.गुरव,श्री.व्ही.अे.चौगुले,श्रीम.एम.व्ही.बिल्ले यांचे सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


फोटो क्लिक…

चाफे गल्ली,आजरा येथील मुख्य रस्त्यावर गटर्सच्या पार्श्वभूमीवर चर मारून खुदाई केली आहे.सदर खुदाईकाम तसेच ठेवूले असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची मोठी अडचण होत आहे.



