



तालुकावासीय आक्रमक…
शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या घराच्या दिशेने आजरा ते सावंतवाडी शिक्षण हक्क यात्रा (लॉंग मार्च) काढण्याचा निर्णय…

……………..आजरा-प्रतिनिधी…………………
. महाराष्ट्र शासनाच्या २० पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आजरा येथून शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या घराच्या दिशेने लॉंग मार्च काढण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला.
मेळाव्याला कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर, संभाजी पाटील, तानाजी देसाई, शिवाजी गुरव, शिवाजी बोलके संभाजी बापट, सुनील शिंदे, सुभाष विभुते, प्रकाश तिबिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना कॉ. संपत देसाई म्हणाले, वीस पटाखालील शाळा बंद करून खेड्या- पाड्यातल्या, वाड्या- वस्तीवरील कष्टकरी जातवर्गातील मुलांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेतला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आपल्याला आर या पारची लढाई करावी लागणार आहे. आणि ती लढाई आपण आजऱ्यातून सुरु करू. राज्याने दखल घ्यावी असे अभूतपूर्व आंदोलन उभा करू. ज्या खात्याने हा निर्णय घेतला आहे त्या खात्याच्या मंत्री महोदयांच्या म्हणजे शिक्षणमंत्री दिपक केसरकरांच्या घराच्या दिशेने आजऱ्यातून शिक्षण हक्काची यात्रा अर्थात लॉंग मार्च सुरु करू.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, बहुजन समाजातील मुलांना शिक्षणातून हद्दपार करण्याचा हा शासनाचा डाव आहे. याविरोधात जनजागृती करून व्यापक आंदोलन आपण उभा करूया. त्यासाठी गाववार बैठका घेऊन या निर्णयाचे धोके लोकांना समजावून सांगूया आणि व्यापक जनआंदोलन उभा करूया.
यावेळी तानाजी देसाई, शिवाजी गुरव यांचीही भाषणे झाली. सुरवातीला प्रकाश तिबिले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेनेचे संभाजी पाटील, प्रकाश पाटील, युवराज पवार, अजित हरेर यांच्यासह उमाजी कुंभार, मायकेल फर्नांडिस, एकनाथ आजगेकर, वंदन जाधव, सुनील कांबळे, रवी दोरुगडे, एकनाथ खरुडे, आनंदा राणे, तानाजी मिसाळ यांच्यासह शाळा व्यस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
यावेळी झालेले निर्णय
♦२७ ऑक्टोबर २०२३ पासून आजरा ते सावंतवाडी अशी पायी शिक्षण हक्क यात्रा (लॉंग मार्च) शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या घराच्या दिशेने काढण्यात येईल.
♦तालुक्यातील ज्या ४४ शाळा बंद होणार आहेत त्या गावांच्यामध्ये सभा बैठकांचे नियोजन करण्यात आले.
♦या शिक्षण हक्क यात्रेत (लॉंग मार्च) किमान दोन हजार लोक उतरतील असे नियोजन करण्याचे ठरले.
♦ही शिक्षण हक्क यात्रा पायी निघणार असल्याने आजरा ते सावंतवाडी या मार्गांवर मुक्कामच्या व दुपारच्या विश्रांतीच्या जागा निश्चित करण्यासाठी पायलट दौरा करण्यात येणार आहे.


महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

…………….आजरा : प्रतिनिधी……………….
महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालय समोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने एक महिन्यांमध्ये बैठक घेण्याच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
प्राधिकरणाचे अभियंता यांनी आज आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सदर चर्चा सकारात्मक झाल्यानंतर एक महिन्याची मुदत बैठकीकरता आंदोलनकर्त्यांनी दिली. या मुदतीत जर बैठक होऊन प्रश्न निकाली लागले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी काँ. शिवाजी गुरव, गणपती येसणे, शिवाजी येसणे, यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.


गुरव बांधवांचे आंदोलन सुरूच…
सोमवारी मिटण्याची शक्यता

……………..आजरा – प्रतिनिधी………………
हरपवडे येथील श्री रासाई देवी मंदिराच्या पूजेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले गुरव समाजाचे आजरा तहसील समोर आंदोलन सुरूच आहे.आज शनिवारी तहसीलदार सुरज माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, पश्चिम देवस्थान कमिटीच्या शितल इंगवले, स्थानिक देवस्थान कमिटीचे सदस्य व गुरव समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
यावेळी गुरव समाजाने नवरात्र पूजेचा मुद्दा लावून धरला. कोणत्याही परिस्थितीत पूजेचा मान मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवण्यात येणार नाही असा इशारा दिला तर इंगवले व तहसीलदार माने यांनी सध्या आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे आचारसंहितेचा भंग न होता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ असेही स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गुरव समाजाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मनीषा गुरव गोविंद गुरव, देवदास गुरव, कॉ. शिवाजी गुरव आदींनी भाग घेतला. तर स्थानिक कमिटीच्या संजय हळवणकर, धनाजी सावंत, राजाराम पाटील, शंकर हळवणकर,शामराव जाधव, धनाजी पाटील, यांनी स्थानिक समितीची बाजू मांडली.
यावेळी पोलीस पाटील निलोफर मुल्ला यांच्यासह गुरव समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर सोमवार नंतर हा तिढा सुटण्याची शक्यता असून तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय गुरव समाजाने जाहीर केला आहे.


नवरात्रीसाठी आजरा शहर नटले…
झेंडूचीही मोठी उलाढाल

…………….. आजरा प्रतिनिधी……………….
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी आजरा शहर नटले असून ठीक – ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल झाली.
शहरामध्ये सहा ठिकाणी दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दुर्गादेवीच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. दुर्गा माता प्रतिष्ठापना होणाऱ्या परिसरामध्ये जोरदार विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज रविवारी मुर्ती प्रतिष्ठापणा मिरवणुकांची जय्यत तयारी झाली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज करंबळी, महागाव,हरळी परिसरातून मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाली. ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने झेंडूची विक्री करण्यात आली असे विक्रेत्यांनी सांगितले.


कॅन्सर मुक्तीसाठी ‘ गर्जना ‘ चा पुढाकार

………………आजरा – प्रतिनिधी……………..
आजरा तालुका गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुक्त करण्याचे अभियान गर्जना प्रतिष्ठान ने हाती घेतले आहे. मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे आणि बुधवार दि.१८ ऑक्टोबर रोजी आजरा हायस्कुल, आजरा येथे १००० मुलींना लसीकरण केले जाणार आहे.
९ ते १८ वयोगटातील सर्व मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. त्याबद्दल सर्वांना माहिती देण्याचे सत्र झाले. लसी विषयी माहिती, कॅन्सर ची कारणे व विद्यार्थिनीच्या लसी विषयी शंका याबद्दल उत्तूर विद्यालय व आजरा हायस्कुल येथे कोल्हापूर कॅन्सर सेंटर च्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांच्या सहकार्याने डॉ. आरती देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
देण्यात येणारी लस ही अत्यंत सुरक्षित असून गर्भाशयाच्या कॅन्सर चा धोका टाळण्याचा एकमेव पर्याय आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी , आजरा हायस्कुल चे मुख्याध्यापक कुलकर्णी , उत्तूर विद्यालय चे मुख्याध्यापक अमनगी ,गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर मिसाळ, सचिव संतोष बेलवाडे, उमेश पारपोलकर, राहुल कांबळे,शिक्षक वृंद, उपस्थित होत्या. ६०० विद्यार्थीनी आणि पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
बाहेरून ही लस घ्यायची झाली तर एका डोस साठी ४ हजार रुपये इतका एका व्यक्तीला खर्च येतो त्यामुळे मोफत उपलब्ध करून दिलेल्या या लसीचा जास्तीत जास्त मुलींनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन गर्जना प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.


व्यंकटराव प्रशालेत ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

………………आजरा:- प्रतिनिधी……………..
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करणयात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्रशालेचे प्राचार्य आर.जी.कुंभार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, एन.ए. मोरे सौ. एस.डी. इलगे एम.एम.देसाई पी.एस.गुरव,टी. एम.गुरव, कृष्णा दावणे यांसह शिक्षक -शिक्षिका,कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले.वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्राचार्य आर.जी. कुंभार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त’वाचाल तर वाचाल’या विषयावर व्ही.टी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेतील विज्ञान विषयाचे शिक्षक प्रशांत गुरव यांनी ‘जागतिक हात धुवा दिना’चे महत्त्व प्रात्यक्षिकातून विध्यार्थ्यांना सांगितले.
कु.रोहिणी नेवरेकर व कु.शीतल कस्तुरे या विद्यार्थिनींनी वाचन प्रेरणा दिन विषयी भाषण केले. आर.पी.पाटील व सर्व विध्यार्थी यांनी प्रशालेतील ग्रंथालयासाठी ५१ पुस्तके भेट दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.मनस्वी तर्डेकर हिने केले. आभार कु.समीर साबळे याने मानले.


श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा

………………आजरा – प्रतिनिधी………………
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरल डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ” ३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा” या संकल्पनेनुसार ग्रंथालयातील शिवचरित्रपर पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले .
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष डॉ. अशोक वाचूळकर व उपाध्यक्षा सौ. गीता पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले . ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालयाच्या स्पर्धापरीक्षा विभागाचे अभ्यासक पंकज कांबळे व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर दिवसभर ग्रंथ अभिवाचन व “वाचनध्यास… ” हा सलग वाचनाचा उपक्रम आयोजित करणेत आला . आजरा महाविद्यालयाच्या कु. वर्षा लोखंडे, सुमन येडगे, सुप्रिया चौगुले, रोहित पाटील, भरत कांबळे व डॉ. अशोक वाचूळकर यांनी ग्रंथ अभिवाचन केले. आजरा शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, ग्रंथालयाचे वाचक, सभासद व नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी वाचनालयाचे माजी कार्यवाह अब्दुल नेसरीकर, संचालक विजय राजोपाध्ये, रविंद्र हुक्केरी, विठोबा चव्हाण, डॉ अंजनी देशपांडे, ग्रंथपाल चंदकांत कोंडुसकर, रसिका अडकुरकर, प्रा. अलका मुगुर्डेकर, डॉ. आप्पासाहेब बुडके, गोविंद मस्कर, आनंदराव साठे, निखिल कळेकर, महादेव पाटील, शिवाजी नाईक उपस्थीत होते.


निधन वार्ता.
मंजाबाई घाटगे

मडिलगे येथील मंजाबाई दत्तू घाटगे ( वय वर्ष ७३) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा नातू नातवंडे असा परिवार आहे.




