रविवार दि.१ डिसेंबर २०२४




पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ…
विस जणांचा चावा...
शहरवासीय दहशतीखाली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये काल शनिवारी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल विस जणांचा चावा घेऊन जखमी करत शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. सायंकाळी स्थानिक नागरिकांनी एका कुत्र्याला ठार मारले तर व्हिक्टोरिया पुलानजीक आणखी एका कुत्र्याने धुमाकूळ घालत चांदेवाडी, सोहाळे व खेडे येथील सुमारे दहा जणांना जखमी केले आहे.
शनिवारी सकाळी शिवाजीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्याला चावण्याचे सत्र आरंभले. या प्रकाराने मॉर्निंग वॉकला गेलेल्या मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी फिरण्यासाठी व कामानिमित्त गेलेल्या अश्विनी सुजित देसाई (रा. बाजारपेठ आजरा) व कल्पना सुरेश सांबरेकर( रा. रामदेव गल्ली, आजरा) या महिलांवर हल्ला चढविला. यामध्ये देसाई या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यानंतर दिवसभर अनेक ठिकाणी कुत्र्यांकडून हल्ल्याचे प्रकार घडले. हल्ला झालेल्यांची संख्या मोठी असल्याने आजरा ग्रामीण रुग्णालयात हेच रुग्ण सर्वत्र दिसत होते. रात्री उशिरापर्यंत उपचारासाठी रूग्णांना दाखल केले जात होते.
दरम्यान सायंकाळी उशिरा एका पिसाळलेल्या कुत्र्याने संभाजी चौकातील पादचाऱ्यावर हल्ला चढविला. स्थानिक नागरिकांनी सदर कुत्र्याला ठार मारले.
दिवसभरात शेळप, हरपवडे गवसे, एरंडोळ, चांदेवाडी, मेढेवाडी येथे कुत्र्यांकडून हल्ला झाल्याचे प्रकार घडले आहेत.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर…
आजरा शहरासह परिसरातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.



२४६ कोटींच्या आजरा -गारगोटी रस्त्याचे काम सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा -गारगोटी या देवकांडगाव मार्गे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वनविभागाची हद्द वगळता रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबर सात मीटर रुंदीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे .२४६ कोटी रुपये इतका या रस्त्याला खर्च होणार असून प्रवास सुखकारक होण्यास मदत होणार आहे. रस्त्याची बाजूपट्टी साफ करण्याचे काम केले जात आहे. एशियन डेव्हलपमेंट बैंक (एडीबी) , राज्य शासनाच्यावतीने रस्ता होल आहे.
आजरा- देवकांडगाव मार्गे गारगोटी हा रस्ता सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी झाला. आजरा तालुका हा पश्चिम भुदरगडला जोडला गेला आहे. या रस्त्यामुळे आजरा- गारगोटी अंतर पाच किलोमीटरने झाले. पश्चिम भुदरगडमधील सुमारे पंचवीस गावे आजरा तालुक्याशी जोडली गेली. आजरा तालुक्यातील नाते व व्यापारी संबंध भुदरगड तालुक्याशी असल्याने संपर्काला हा रस्ता फायदेशीर आहे. सदरचा रस्ता डोंगररांगातून जात असल्याने या मार्गात धोकादायक वळणे अधिक असून अरुंद आहे. दोन वाहने समोरून आल्यावर बाजू देतांना अडचण येत असते. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नवीन रस्त्याच्या आराखड्यात रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. प्रवास वेगवान होणार असून रहदारी वाढणार आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे प्रवास सुखकारक होण्यास मदत होणार आहे. गोव्याला जाणारे पर्यटक या मार्गाचा वापर करत असतात.
या रस्त्याचा मुळ खर्च २४६ कोटी रुपये इतका असून सिमेंटचा रस्ता ७ मीटर रुंदीचा तर वनविभागाच्या हद्दीतील सुमारे ६. २ किलोमीटरमध्ये साडेपाच मीटर रुंदीने डांबरीकरण होणार आहे.



आजरा कारखान्याच्या गळीतास दणक्यात सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याल ऊस गळीत हंगाम जोरात सुरू झाला आहे. गवसे (ता. आजरा) येथील आजरा साखर कारखान्याचा अड्डा ऊस वाहतुकीच्या गाड्यांनी भरून गेला आहे. ऊसाने भरलेले ट्रॅक्टर्स, ट्रक्सची गर्दी दिसून येत आहे. कारखाना प्रशासन परिसरातही वहाने लागून राहीली आहेत. गेल्या १२ दिवसात २५ हजार टन ऊसाचे गाळप झाले आहे.
गळीत हंगाम सुरु झाल्यापासून आजरा साखर कारखान्याने वेग पकडला आहे. दसरोज सुमारे ३४०० टनाने गाळप सुरु आहे. कारखान्याच्या परिसरात वाहनांची रेलचेल व कर्मचाऱ्यांची लगबग दिसून येत आहे. अड्डा ऊस वहानांनी फुल्ल झाला असून कारखाना प्रशासन कार्यालयाकडे वहानांची रांग दिसून येत आहे. कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रात सुमारे १८० ऊस तोडणी टोळ्या तर कार्यक्षेत्राबाहेर १०० टोळ्या कार्यरत आहेत. नोव्हेंबर महीन्याच्या १७ तारखेला कारखान्याच्या गळीताला सुरुवात झाली.
२९ नोव्हेंबर अखेर ३५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. ३२ हजार क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने ऊस तोडणीचे वेळापत्रक निश्चित केले असून काटेकोर नियोजन केले आहे. शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


शिवप्रेमी तरुण मंडळ गजरगावचे कौतुकास्पद कार्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्याच्या डिजिटल शिक्षण प्रणालीचा युगात आपल्या गावच्या विद्यार्थ्याना सहज आणि सुलभ शिक्षण प्रणालीचा उपयोग व्हावा म्हणून शिवप्रेमी तरुण मंडळ गजरगाव यांच्या वतीने श्री सरस्वती विद्या मंदिर, गजरगाव शाळेस शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग , विद्यार्थी आणि शिवप्रेमी तरुण मंडळाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डिजिटल प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसाद व दशावतारीचा कार्यक्रम पार पडला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला शहरवासीय व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.





