मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५

तहसील कार्यालयासमोर निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवस्थान जमीन धारकांनी शेतकरी किसान सभेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर आज निदर्शने केली. यावेळी आजरा तहसिलदारांना निवेदन दिले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले.
देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांकडे परंपरेने चालत आलेल्या जमिनीला वारसा हक्काने सातबारा पत्रकी नोंद व्हावी. सातबारा पत्रकातील मालकी हक्काला परंपरागत नावे होती ती इतर हक्कात घालण्यात आली आहेत. ते चुकीचे आहे. पुर्वीच्या पध्दतीने मालकी हक्कात घालण्यात यावीत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमीटीने वेळेत खंड भरून घ्यावा. इतर हक्कात नोंदी असल्याने किंवा अन्य कारणाने पीक पाणी नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांची आँनलाईन होत नाही. निदर्शने संविधानिक मार्गाने मुद्द्द्यांची व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी करणार असल्याचे म्हंटले आहे.कॉ. संग्राम सावंत, ॲड. दशरथ दळवी, कॉ. शिवाजी गुरव, हणमंत गुरव, शिवाजी गिलबिले संजय गुरव, जानबा धडाम, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ठेवीदारांचा विश्वास आणि सभासदांच्या पाठबळावर सन्मित्र पतसंस्थेची वाटचाल : अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा
वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
ठेवीदारांचा विश्वास आणि सभासदांच्या पाठबळावर सन्मित्र पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे यामुळे अहवाल सालात २३ लाख ९९ हजार इतका निव्वळ नफा झाला आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा समाजभान ठेवून पूर्ण करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ बांधील आहे, असे प्रतिपादन सन्मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी केले संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. सभा उत्साहात पार पडली.
सभेच्या सुरुवातीस संस्थेच्या मुख्य प्रवर्तक मंडळाचे फोटो पूजन करण्यात आले. व्यवस्थापक परशराम गिलबिले यांनी अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संस्थेच्या वतीने १४% इतका लाभांश जाहीर करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, विष्णू कातकर, रेजिना फर्नांडिस आदींनी मनोगतपर मार्गदर्शनात संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
सभेचे औचित्य साधून डॉ. रोजारीओ डिसोझा यांनी उपस्थितांना अवयव दानाबद्दल मार्गदर्शन केले.
सभेस भीमराव वांद्रे, नारायण वांद्रे, मारुती सावंत,गुंडू सुतार, अर्जुन कबीर, वसंत अडसुळे, उपाध्यक्ष भीमराव सुतार, संचालक दत्तात्रय डोंगरे, रॉबर्ट डिसोजा, मार्शल मिनिंझिस, केरेबिन नोरेंज, केरोलीन डिसोझा, व्हायलेट डिसोझा, पांडुरंग माने, विश्वास कांबळे, बाबुराव चौगले, बाबुराव गिलबिले, संभाजी पाटील, इराण्णा पाटील , प्रकाश करवालो, विलास राजाराम, गोविंद कातकर, प्रियांका घोरपडे, नामदेव ढोकळे, सौरभ सावंत यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पोवार यांनी केले तर मोतीराम बारदेसकर यांनी आभार मानले.

शंका दूर करा मगच स्मार्ट मीटर बसवा, सक्ती नको : उत्तूरकरांची भूमिका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथे स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांनी सरकारची ऑर्डर आहे असे सांगत बंद घरांमध्ये मीटर बसवल्याने ग्रामस्थांत नाराजी निर्माण झाली आणि यावरून ग्राहक व कंत्राटदारांमध्ये वाद झाला. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानी संजय उत्तूरकर होते. बैठकीच्या सुरुवातीला महेश करंबळी यांनी हेतू स्पष्ट केला.
कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी केंद्र सरकारच्या RDSS योजनेअंतर्गत हे काम सुरू असल्याचे सांगून स्मार्ट मीटरचे फायदे सांगितले. अचूक बील मिळणे, वीज चोरी रोखणे, दररोजचा वीज वापर लक्षात येणे असे फायदे सांगत त्यांनी अदानी कंपनीला केवळ बसवणीचे कंत्राट असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना मीटर बसवताना महावितरणचा कर्मचारी सोबत असेल, प्रीपेडची सक्ती नाही, आतापर्यंत अगदी नगण्य तक्रारी आल्या असून त्या दूर करण्यात आल्या आहेत, मीटर जळण्याची भीती नाही अशी हमी दिली. मोबाईल, टीव्ही यांसारख्या बदलांप्रमाणे हा बदलही स्वीकारावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीस उमेश आपटे, गंगाधर हराळे, ग्राम.सदस्य भैरू कुंभार, ग्राम.सदस्य संदेश रायकर, ग्राम. सदस्य संभाजी कुराडे, सदानंद व्हनबट्टे, पांडूरंग मुळीक, कय्युम मकानदार, महेंद्र मिसाळ,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर महावितरणकडून सहायक अभियंता गुरुदास काटकर, संदीप पाटील, उप कार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर, निखिल काळोजी, रविंद्र रेडेकर उपस्थित होते.
शेवटी वाढीव बिलाबाबत खात्री करण्यासाठी काही ठिकाणी जुन्या व नव्या मीटरच्या रीडिंगवरून पडताळणी करण्याचे ठरवण्यात आले आणि आभार राजू खोराटे यांनी मानले.

‘मृत्युंजय’कारांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी कै. लक्ष्मण धोंडिबा पाटील यांचे स्मरणार्थ प्राथमिक गटाच्या व कै. रमेश वामन टोपले यांचे स्मरणार्थ माध्यमिक गटाच्या वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी कै. पांडुरंग बिडकर गुरूजी यांचे स्मरणार्थ खुल्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
दिनांक १८ सप्टेंबर रोजी ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन व ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.

जिल्हास्तरासाठी कबड्डी स्पर्धेत ‘व्यंकटराव ‘च्या मुले व मुलींच्या संघाची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून सतरा संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी तालुक्यात प्रथम व मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व कबड्डी या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री.एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार व वर्गशिक्षकांचे प्रोत्साहन लाभले तसेच क्रीडाशिक्षक श्री.एस.एम.पाटील , सहाय्यक विभाग प्रमुख श्रीम.आर एन पाटील, श्री.मस्कर ,श्री.आर. पी पाटील, श्रीम.एस.बी
कुपेकर, पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.

बेंटली सिस्टीम कंपनीच्या अभियंत्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना भेट…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पुणे स्थित बेंटली सिस्टीम या अमेरिकन आयटी कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास शंभर शाळांना ई-लर्निंगचे संच मोफत देण्यात आले आहेत.एका संचाची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये आहे.स्टेम ग्रांट अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांना ई-लर्निंग, शौचालय,पाण्याची सोय कंपनीकडून मोफत दिली जाते.आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाडा येथेही ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ई-लर्निंगचे संच दिल्यानंतर त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दुर करण्यासाठी कंपनीच्या अभियंत्यांनी शाळांना भेटी दिल्या.आजरा तालुक्यातील पंधरा शाळांना संच दिले आहेत त्यातील काही दुर्गम भागातील शाळांना संदीप भडगावकर ,सुश्रुत भोसले, तुषार शिंत्रे, अमेय खोपडे या अभियंत्यांनी भेट दिली व अडचणी समजून घेतल्या.

गिरणी कामगारांच्या संमतीपत्र रद्द मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद
धामणे येथे ऐतिहासिक बैठक एका दिवसात तब्बल २१ संमतीपत्रे रद्द
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणी कामगारांच्या घराच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला आता नवे बळ मिळाले आहे. गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. अंबाजी गुरव,धामणे गावातील गिरणी कामगार व वारसदार संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सागर चव्हाण यांच्या पुढाकारातून आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य गिरणी कामगार व वारस उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले होते.
एका दिवसात २१ संमतीपत्रे रद्द!
बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसात तब्बल २१ संमतीपत्रे रद्द करण्यात आली. अनेक दिवसांपासून म्हाडाचे नाव सांगून फसवणूक करून गिरणी कामगारांकडून घेतलेली OTP व संमतीपत्रे आता रद्द करण्याची प्रक्रिया जागेवरच करून देण्यात आली.
संस्थेने स्पष्ट केले की, “प्रत्येक दिवशी किमान १०० संमतीपत्रे रद्द करण्याचा निर्धार” केला असून, या उपक्रमाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे. पुढील काही दिवसांत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जाणार असल्याची माहिती गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कामगारांनी संस्थेच्या उपक्रमाला पाठिंबा देत हा लढा अधिक जोमाने लढण्याची तयारी दर्शवली.
जिल्हा अध्यक्ष श्री. अंबाजी गुरव म्हणाले,
“कोल्हापूर जिल्ह्यातून या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहून आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. एकही कामगार फसणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल, मुंबई मध्येच घर मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार हे आमचे ठाम आश्वासन आहे. लवकरच आम्ही जिल्ह्यात एक मोठा मेळावा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत.
उपाध्यक्ष श्री. सागर चव्हाण म्हणाले,
हा संघर्ष फक्त घरासाठी नाही, तर पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. प्रत्येक कामगाराने यात सक्रिय सहभाग घ्यावा. आता ही लढाई निर्णायक टप्प्यात आली आहे.
बैठकीस गिरणी कामगार व त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त

‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ अभियान अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती आजरा केंद्रस्तरीय ब गटातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविल्याबद्दल बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे या शाळेला आजरा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विलास पाटील यांचे हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मान पूर्वक गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी बसवराज गुरव, केंद्र प्रमुख रावसाहेब देसाई, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज शहरात…
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती, आजरा येथे दुपारी एक वाजता तालुकास्तरीय कार्यशाळा होणार आहे .या कार्यशाळेस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पाऊस पाणी
आजरा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. पावसामुळे शहरभर चिखल झाला असून नवरात्र उत्सवाच्या तयारीवर मर्यादा येताना दिसत आहेत.


