मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५


आणखी एक फसवणूक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव ता. आजरा येथील संदेश बाबुराव लोहार यांची नवीन एटीएम व क्रेडिट कार्ड काढून देतो म्हणून ३३ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की…
कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून काम करणारे संदेश लोहार यांचे एटीएम कार्ड बंद होते.त्यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून संपर्क साधून आपणाला नवीन क्रेडिट कार्ड देण्यासह आपले एटीएम कार्ड चालू करून देतो असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा नंबर व इतर माहिती घेतली. संदेश यांनी संबंधिताना सदर माहिती दिल्यानंतर ओटीपी आल्यावर त्यांच्या खात्यावरील ३३,५०० रुपये गायब झाल्याचे आढळून आले.
याबाबतची लेखी तक्रार त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिली आहे.

आजऱ्यामध्ये घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक २ अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप झाले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. गटविकास अधिकारी संजय ढमाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती रचना होलम, वर्षा बागडी, माजी उपसभापती शिरीष देसाई प्रमुख उपस्थित होते.
सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, सन २०२४/२५ या आर्थिक वर्षमध्ये आजरा तालुक्याला २२११ इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी १७९४ घरकुले आतापर्यंत मंजूर करण्यात आली आहेत. आज पर्यंत सर्वाधिक घरकुले मंजूर झाली आहेत. गटविकास अधिकारी श्री. ढमाळ म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्ह्याला ४०,००० तर तालुक्याला २२११ घरकुलांचे उद्दिष्ट मिळालें. घरकुले मंजूर झाल्यामुळे जनतेमध्ये समाधानाची भावना आहे. प्रधानमंत्री आवासमधून लाभार्थ्याला १,२०,००० रुपये अनुदान तर रोजगार हमीतून २८,००० रुपये मिळणार आहेत. तसेच यापूर्वी लाभ घेतला नसल्यास स्वच्छ भारत मिशनमधून १२,००० चे अनुदान वैयक्तिक शौचालयासाठी मिळणार आहे. ३१ मे पूर्वी बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याचा लकी ड्रॉ जिल्हा परिषदेकडून काढण्यात येणार असून विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. सौ. होलम, सौ. बागडी, श्री. देसाई यांची भाषण झाली.
पशुधन विकास अधिकारी पुरुषोत्तम ढेकळे, उपअभियंता बांधकाम सुर्यकांत नाईक, विस्तार अधिकारी राजेंद्र गवळी, आबा मासाळ, बी.टी. कुंभार, नीता गुरव, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी ३ मार्च रोजी संघर्ष मोर्चा काढणार : संग्राम सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर गेली २० ते २२ वर्षापासून पायाभूत सुविधांपासून वंचित आहे.त्यामुळे पायाभूत सुविधा,विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.या संदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करणार असलेबाबत निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत,उपाभियंता सर्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले.
आजपर्यंत भारतनगर मधील रहिवाशांनी आपल्या मूलभूत सुविधा पूरवण्याबाबत अनेकवेळा वेगवेगळे तक्रार अर्ज दिलेले आहेत. मात्र याची दखल घेतली गेलेली नाही.या विषयासंदर्भात आणि मागण्या संदर्भात म्हणणे निवेदनाद्वारे तहसीलदार आजरा ,मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा व उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी आजरा यांना दिले आहे. तसेच प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी गारगोटी यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत.
यावेळी जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख,तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद , सलीम नाईकवडे, मुदस्सर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण,आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ, मोहम्मद नसरदी, फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी मुफीद काकतीकर उपस्थित होते.

लेझीम स्पर्धेत आदर्श विद्या मंदिर. भादवण प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठा महासंघ आजरा यांचे मार्फत शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या लेझीम स्पर्धेत आदर्श विद्या मंदिर भादवण यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मुरुडे महिला लेझीम संघ, मुरुडे व तृतीय क्रमांक दत्तगुरु लेझीम पथक बुरुडे यांनी पटकावला. आजरा महाविद्यालय, आजरा व मसवाईदेवी लेझीम पथक मसोली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
यावेळी कल्पना रामचंद्र डोंगरे, सरपंच मौजे खानापूर तालुका आजरा यांचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल मराठा महासंघामार्फत शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरता मराठा महासंघाचे पदाधिकारी मारुती मोरे, सी. आर. देसाई, बंडोपंत चव्हाण, शंकरराव शिंदे, शिवाजी पाटील, सी.डी.सरदेसाई,संभाजी इंजल. प्रकाश देसाई, सूर्यकांत आजगेकर, विष्णू सुपल, चंद्रकांत पारपोलकर, महादेव पवार, शिवाजी गुडूळकर, गणपतराव डोंगरे, शिवाजी इंजल, चंद्रकांत सरदेसाई, दत्तात्रय मोहिते, आनंदा गावडे, भाऊ निर्मळे, राजीव सावंत, आप्पा पावले, तसेच महिला पदाधिकारी भैरवी सावंत, मीनल इंजल, गीता नाईक, सुनंदा मोरे, रचना होलम, धनश्री देसाई, डॉ.गौरी भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जनता बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई, आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई, आजरा तालुका संघाचे माजी चेअरमन राजू होलम, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी- पाटील, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई व विकास कोलते , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर उपस्थित होते.

निवड…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुरुडे गावची सुकन्या स्नेहल राजेंद्र पाटील हिची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, (MSEB) मध्ये सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) पदी निवड झाली आहे.
स्नेहल हिचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर, मुरुडे येथे माध्यमिक शिक्षण आजरा हायस्कूल येथे झाले असून. बी.ई. इलेक्ट्रीकलची पदवी संत गजानन महाराज पॉलिटेक्निक, महागाव मधून मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

निधन वार्ता
गणपती देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील गणपती कृष्णा देसाई (वय ९१) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महालक्ष्मी सेवा संस्थेचे अध्यक्ष सयाजी देसाई यांचे ते वडील होत.
रक्षाविसर्जन आज मंगळवार (ता. २५) पेरणोली येथे सकाळी ९ वाजता होईल.
हिराबाई सांगले

उत्तुर येथील आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक गणपतराव सांगले यांच्या मातोश्री हिराबाई विष्णू सांगले (वय ७८ वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असे परिवार आहे.


छायावृत्त…

नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरांमध्ये ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यातून स्वच्छतेबाबतचे संदेश नागरिकांना देण्यात आले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




