सोमवार दि.२४ फेब्रुवारी २०२५

आजरा पुन्हा एकदा जगाच्या पटलावर…
‘छावा ‘ मुळे ‘मृत्युंजय ‘ कारांच्या स्मृतींना उजाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले आठ-दहा दिवस देशभरासह जगामध्ये ‘छावा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला असून यामुळे ‘छावा’ कादंबरीचे आजऱ्याच्या लाल मातीत जन्मलेले लेखक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्यासह आजरा पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आले आहे.
विकी कौशल, अक्षय खन्ना व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छ. संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा ‘मृत्युंजय’ कारांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील बहुतांशी मंडळींनी हा चित्रपट पाहून गौरवोद्गार काढले आहेत. दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी साहित्यामध्ये शिवाजी सावंत यांच्या साहित्यिक योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर देखील सध्या ‘छावा’ने स्थान मिळवले आहे.
या सर्व बाबींमुळे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या व ज्ञानपीठच्या मूर्ती देवी पुरस्कार विजेत्या ‘मृत्युंजय’कारांच्या छावा कादंबरीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. केवळ ‘मृत्युंजय ‘कारच नाहीत तर आजराही प्रकाशझोतात आले आहे.
प्राधान्याने तरुणाई आता छावा कादंबरीची वाचण्याच्या दृष्टीने उपलब्धतेबाबत विचारणा करू लागली आहे हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. आजऱ्याच्या लाल मातीचा सुगंध पुन्हा एकदा जगभर दरवळला आहे हे निश्चित.
‘मृत्युंजय’ कारांच्या साहित्यावर आजऱ्याच्या निसर्गाची मोहिनी…
सह्याद्रीच्या कुशीत कोकण आणि घाटमाथ्याच्या सीमेवर, हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या काठावर वसलेल्या ‘आजरा’ या निसर्गरम्य गावात ‘मृत्युंजय’कारांची जडणघडण झाली. येथील कुमार भवन येथे प्राथमिक शिक्षण आणि व्यंकटराव प्रशालेत माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर शिवाजीरावांनी ‘मृत्यूंजय’ची बांधणी केली. त्यांच्या साहित्यामध्ये आजऱ्याचा निसर्ग निश्चितच डोकावताना दिसतो. ‘मृत्युंजय’ च्या अफाट लोकप्रियतेनंतर छत्रपती संभाजीराजेंवर आधारित छावा व श्रीकृष्णावर आधारित युगंधर या कादंबऱ्या मराठी साहित्यातील मुकुटमणी ठरले आहेत.
कादंबरीने खपाचे तर चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडले
मराठी भाषेत असणाऱ्या मृत्युंजय चे इंग्रजी, हिंदीसह भारतातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘मृत्युंजय’ने खपाचे तर छावा कादंबरीवर आधारित चित्रपटाने हिंदी चित्रपट सृष्टीतील बॉक्स ऑफिस वरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. यातून मृत्युंजयकारांच्या लेखणीची ताकद निश्चितच अधोरेखित होते.



