सोमवार दि.२४ फेब्रुवारी २०२५


आजरा पुन्हा एकदा जगाच्या पटलावर…
‘छावा ‘ मुळे ‘मृत्युंजय’ कारांच्या स्मृतींना उजाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले आठ-दहा दिवस देशभरासह जगामध्ये ‘छावा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला असून यामुळे ‘छावा’ कादंबरीचे आजऱ्याच्या लाल मातीत जन्मलेले लेखक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्यासह आजरा पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आले आहे.
विकी कौशल, अक्षय खन्ना व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छ. संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा ‘मृत्युंजय’कारांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील बहुतांशी मंडळींनी हा चित्रपट पाहून गौरवोद्गार काढले आहेत. दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी साहित्यामध्ये शिवाजी सावंत यांच्या साहित्यिक योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर देखील सध्या ‘छावा’ने स्थान मिळवले आहे.
या सर्व बाबींमुळे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या व ज्ञानपीठच्या मूर्ती देवी पुरस्कार विजेत्या ‘मृत्युंजय’कारांच्या छावा कादंबरीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. केवळ ‘मृत्युंजय ‘कारच नाहीत तर आजराही प्रकाशझोतात आले आहे.
प्राधान्याने तरुणाई आता छावा कादंबरीची वाचण्याच्या दृष्टीने उपलब्धतेबाबत विचारणा करू लागली आहे हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. आजऱ्याच्या लाल मातीचा सुगंध पुन्हा एकदा जगभर दरवळला आहे हे निश्चित.


आजरा येथील बैलगाडा शर्यती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीने आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये मडिलगे येथील सैराट-लक्षा या जोडीच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक मिळवला.
बोलकेवाडीच्या गायरान पटांगणावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी आणि देवराज बारदेस्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.स्पर्धेमध्ये मानवले येथील संतोष डाकरे यांच्या बैलगाड्याने द्वितीय, आजरा येथील आयुब खेडेकर यांच्या बैलगाड्याने तृतीय, तर फये येतील तानाजी पाटील यांच्या बैलगाड्याने चतुर्थ क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पशुवैद्यकीय अधिकारी पी.डी.ढेकळे, मंजूर मुजावर, विलास जोशीलकर ,दिलावर चांद,गौतम भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .


भारत जिंकताच आजऱ्यात जल्लोष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेमधील पाचव्या सामन्यात भारताने रविवारी पाकिस्तानचा ६ विकेटने दणदणीत पराभव करताच आजरा येथे जोरदार आतषबाजी करत जल्लोष केला.
दिवसभर शहरवासीयांचे लक्ष या सामन्याकडे लागून होते. शहरातील घराघरांसह बाजारपेठेतील दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या येथे नागरिक टीव्हीवर सामना पहात असताना दिसत होते.
भारतीय संघाने विजय मिळवताच शहरात सर्वत्र फटाक्यांचा आवाज घुमला. सोशल मीडियावर विजयाचे संदेश रात्री उशिरापर्यंत व्हायरल होताना दिसत होते.


अपंगांचे आंदोलन तात्पुरते स्थगित : संग्राम सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुक्ती संघर्ष समितीचे अपंगांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढून व ठिय्या आंदोलन आजरा नगरपंचायतीच्या आवारात सुरू होते.
जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील.अपंगांच्या -दिव्यागांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या ताबडतोब सोडणूक होत नाही तोपर्यंत आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु ठेवणार अशी भूमिका मुक्ती संघर्ष समितीने घेतली होती. त्याला अखेर यश आले. जबाबदार अधिकाऱ्यांच्या अपंगांचे प्रश्न सोडवण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत यांनी दिली.
येत्या आठ दिवसात पहिला हप्ता अपंगाच्या-दिव्यांगांच्या खात्यात अनुशेषाची जमा करण्याचा ठराव करून वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिलेले आहे. नायब तहसीलदार विकास कोलते यांनी आंदोलनाच्या स्थळी येऊन तहसीलदार कार्यालयाच्या संदर्भातील मागण्या संदर्भात लेखी पत्र देऊन याबाबतीतल्या मागण्यांच्या पूर्तता करण्याची हमी लेखी स्वरूपात दिली आहे. त्यानुसार त्यांनी लगेच दिव्यांगांच्या पेन्शन बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे. अशा पद्धतीने आंदोलनाला यश आलेले आहे.
याच दरम्यान पालकमंत्री तथा प्रकाश आबिटकर यांना अपंगांच्या/ दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भातले निवेदन देण्यात आले.
पुढील काळामध्ये अपंगांच्या न्याय्य हक्कासाठी मेळावा घेऊन अपंगांचा/दिव्यांगाचा जाहीरनामा जाहीर करून राज्यभर आंदोलन उभे करणार आहोत. अशी माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली.
यावेळी आनंद भाऊ कांबळे, रविंद्र भोसले, मजीद मुल्ला, समीर खेडेकर , यलुबाई गोंधळी, रामचंद्र डोंगरे, सागर होडगे, निलेश चिमणे, रुजाय डिसोझा,आसिफ मुजावर, अहमदसाब नेसरीकर, सुलेमान दरवाजकर, जमील निशानदार, जगदीश कुरुणकर, बाळू सुतार, इम्तियाज दीडबाग, इरफान दीडबाग, सकीना माणगावकर, ताजुद्दीन तकीलदार,खदिजा शिराज, रकिबा नालबंद, रिजवाना इंचनाळकर, अस्मा नसरदी, यास्मिन लतीफ, सुश्मिता चंदनवाले, नामदेव पाटील, मुस्ताक बेपारी, अशोक हरेर, रमेश शेंद्रेकर, रणजित सावंत, अब्दुलकरीम नसरदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


वेलकम टू रामतीर्थ…
वन विभागाकडून स्वागत कमान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा वनविभागाकडून रामतीर्थ मार्गावरील रस्त्यावर आकर्षक अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
रामतीर्थच्या परिसरात गेल्या पाच – दहा वर्षांमध्ये सुशोभीकरणाच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबवले गेले आहेत. प्रवेशद्वारावर कमान असावी अशी मागणी केल्या कित्येक दिवसापासून केली जात होती.
अखेर येथील परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी यांच्या पुढाकाराने स्वागत कमान उभारण्यात आली आहे. या आकर्षक कमानीमुळे शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.



साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




