शनिवार दिनांक १७ मे २०२५

वडापाव गाड्यावर गांजाचा धूर…?
पेरणोलीतील एका विरोधात गुन्हा नोंद
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथे बस स्थानक परिसरातील वाघाच्या चौकामध्ये वडापाव गाड्यावर गांजा सदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या हर्षवर्धन धनाजी लोंढे ( वय ३१ वर्षे, रा. पेरणोली ता. आजरा जि. कोल्हापुर ) याला पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती आजरा पोलिसांनी दिली आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी विकास सुरेश कांबळे यांनी दिली असून पोलीस उपनिरीक्षक धोंडे पुढील तपास करीत आहेत.

के.पी. पुन्हा स्वगृही…
२३ मे रोजी होणार प्रवेश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना उबाठा मधून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेले माजी आमदार के. पी. पाटील हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये प्रवेश करत असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सदर प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत गेलेले के. पी. पाटील हे शिवसेनेत रमलेच नाहीत. भविष्यातील राजकारण व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध यामुळे त्यांनी सदर निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
२३ मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.

संविधानाची महती तोंड गोड करून सांगा : राजवैभव शोभा रामचंद्र
मलिग्रे येथे बुद्धजयंती कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देशावर मालकी सांगणे हे संविधानाचे शस्त्र असून सर्वांनी मिळून सर्वांच्या हिताकरिता राहण्यासाठी संविधानमुळे आपण एकसंघ राहिलो आहोत. हे संविधान समजून घेण्याकरिता वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये तसेच विविध माध्यमातून अभंग, भारूड पोवाडे, लहान मुलांची बडबड गीते या माध्यमातून संविधान सर्वसामान्य लोकांना सांगणे आवश्यक आहे. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली यासाठी संविधानाची प्रत घेऊन गावातील लोकांना साखर वाटून तोंड गोड करून संविधानाची महती सांगावी असे प्रतिपादन राजवैभव शोभा रामचंद्र यांनी केले. मलिग्रे येथील बौद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
स्वागत व प्रास्ताविक महेश कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना राजवैभव यांनी या देशातील पाणी, हवा यावर सामुहिक अधिकार आहे. आरोग्य व शिक्षण याच्यावर सर्वसामान्यांचा अधिकार आहे ते मोफत व वेळेत जनतेला मिळणे आवश्यक आहेत. शिक्षण, आरोग्य व विविध क्षेत्रात खाजगीकरणाचे प्रस्थ येत असून यामुळे संविधानाची पायमल्ली होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच समीर पारदे, उपसरपंच चाळू केंगारे, शोभा जाधव, अनिसच्या राज्य सदस्या रेश्मा खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष हरी आवळे, जयभीम तरूण मंडळाचे अध्यक्ष बाळू कांबळे, मधुकर कांबळे, शशिकांत कांबळे, डॉ. सुदाम हरेर, चंद्रकांत कांबळे, दत्ता कांबळे, छाया कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कॉ. संजय घाटगे यांनी आभार मानले.

कुटीर उद्योगातून महीलांनी आर्थिक सक्षम व्हावे : आर. वाय. पाटील
कोळींद्रेत महीला रोजगार मार्गदर्शन मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामीण भागातील महीलांनी केवळ शेतीवर अवलंबून राहू नये. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुटीर उद्योग करता येवू शकतो. यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते. असे प्रतिपादन आर. वाय. पाटील यांनी केले.
कोळींद्रे (ता. आजरा) येथे जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेमार्फत महीला रोजगार मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिववक्ते अकलाख मुजावर प्रमुख उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते नरसु शिंदे यांनी स्वागत केले. सुरेश बुगडे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. महीलांनी स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वावलंबी बनावे कृटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी. महीला सक्षम व्हाव्यात यासाठी संस्था धडपडत असल्याचे सांगीतले. शांताराम कांबळे यांनी महीलांसाठीच्या सरकारी योजनांची माहीती दिली.
अकलाख मुजावर, महेश लाखे यांची भाषणे आली. अंकिता उद्योग समुहाच्या लता रेडेकर, आजरा तालुका संधाचे संचालक जयराम संकपाळ, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गोधळी, सुदाम हरेर, आनंदा सुतार, सुधाकर घोरपडे, कुणाल राजाराम, अमर मटकर, जयश्री सावंत, अरुण शिंदे, संतोष सुतार, अशोक पाटील, महादेव होडगे, राणोजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पुन्हा पावसाची हजेरी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात ठीकठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाचे वातावरण राहिले.
पावसाचा जोर नसला तरीही पावसाची रिपरीप मात्र कायम होती. पावसामुळे आजरा येथील आठवडा बाजारात थोडाफार व्यत्यय आला.
सलग दोन दिवस पावसाच्या हजेरीमुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

मलिग्रे हायस्कूलचा १०० टक्के निकाल

मलिग्रे हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला यामध्ये हायस्कूलची विद्यार्थीनी अर्पिता भगुत्रे हिने ९४.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम तर केंद्रात द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच तन्वी पारदे हिने ९२.८० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत केंद्रात पाचवा क्रमांक पटकाविला. प्राजंली निकम हिने ९०.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार…
अनेक विदेशी खेळाडू मैदानाबाहेर

भारत – पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा आजपासून पुन्हा सुरू होत आहे.
अंतिम टप्प्यातील सामन्यांना आज सुरुवात होत असली तरीही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये स्पर्धा स्थगित झाल्याने मायदेशी परतलेले अनेक संघांमधील परदेशी खेळाडू पुन्हा स्पर्धेत समाविष्ट होणार नाहीत असे चित्र आहे.


