

हरपवडे येथील तरुणाचा मसोली येथे विहिरीत पडून मृत्यू

. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता. आजरा येथील सागर महादेव चव्हाण या ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल मंगळवार दिनांक ९ रोजी मसोली येथील चराटी यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये आढळून आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
वाहन चालक म्हणून काम करणारा सागर गेल्या दोन दिवसापासून हरपवडे येथील घराकडे परतला नव्हता. दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मसोली येथील चराटी यांच्या विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांना सदर बातमी समजतात स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो सागर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पाय घसरून तो विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची वर्दी मुकुंद निर्मळे,रा. पारेवाडी यांनी पोलिसात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सागर याच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुली आहेत. ऐन पाडव्या दिवशी सदर घटना उघडकीस आल्याने हरपवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

भरत हातकर यांचे निधन…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याच्या प्रशासन विभगामधील भरत हरीबा हातकर (वय ४८ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंत्यसंस्कार बुधवार दिनांक दि.१० रोजी सकाळी ७.३० वाजता महागोंडवाडी येथे करण्यात येणार आहेत .

सोहाळे पैकी बाची येथे आग

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोहाळे पैकी बाची (ता.आजरा) येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले.
दुपारी साडेतीनच्या दरम्यान सुतारकी,गणेश काटा नावाच्या शेतात अचानक आग लागली. कडक ऊन व वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली. आगीमध्ये शेती पिकांसह काजू, मेसकाठी व इतर पिके जळाली.
या आगीत जनावरांसाठीचे गवत , सरपणही जळून गेले. या आगीचे वृत्त समजताच सोहाळे व बाचीतील ग्रामस्थ जमा झाले.ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे चिन्ह घराघरात पोहचवा : सतेज पाटील
आज-यात इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी आघाडीवर असून शाहु महाराजांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे चिन्ह घराराघरात कार्यकर्त्यांनी पोहचवावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.आजरा येथील इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात तीन लाख मतदारांना शाहु महाराज निवडणूकीसाठी उभे असल्याचे सर्व्हेक्षणातून माहीती मिळाली आहे.मात्र त्यांच्यापर्यंत चिन्ह पोहचवण्याची आवश्यकता आहे.आज-यातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्याचप्रमाणे संपर्क कार्यालय सुरू करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.यावेळी काँ.संपत देसाई यांनी स्वागत करून प्रचार यंत्रणेबाबत माहिती दिली.

याप्रसंगी मुकुंदराव देसाई, अंजनाताई रेडेकर, उमेश आपटे,उदयराज पवार,संभाजी पाटील,अभिषेक शिंपी,अशोक तर्डेकर,संजय सावंत,रशिद पठाण,राजेंद्र सावंत,युवराज पोवार, कृष्णा सावंत,नौशाद बुड्ढेखान,विजय गुरव,संकेत सावंत,रविंद्र भाटले,किरण आमणगी,संजय उत्तूरकर,विक्रम देसाई,राजू देसाई,संजय येसादे आदी उपस्थित होते.राजू होलम यांनी आभार मानले.

आजरा बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ४ कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाले असल्याची माहिती अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी दिली.
अध्यक्ष कुरुणकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला एकूण ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख इतका झाला आहे.
याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले.

आजरा साखर कारखान्याच्या तोडणी वाहतुक कराराचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ करीता उस तोडणी वाहतुकीसाठी यंत्रणा उभारणीचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर कारखान्याच्या संचालिक सौ रचना राजाराम होलम व राजाराम होलम या उभयतांचे हस्ते करणेत आला यावेळी कारखान्याकडे करार करणेसाठी आलेल्या पहिल्या ११ कंत्राटदारांशी करार करणेत आले.
यावेळी बोलतांना चेअरमन वसंतराव धुरे यांनी आजरा साखर कारखान्याचा येता गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालवून चार लाख में. टन उस गाळपाचे उद्दीष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक ती पुर्व तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे सक्षम तोडणी ओढणी यंत्रणा उभारणे हा आहे. त्याकरीता आज गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर तोडणी वाहतुक कंत्राटदारांचे करार करणेचे काम सुरू केल आहे.गत गळीत हंगामात संकेश्वर – बांदा महामार्गाचे कामामुळे उस वाहतुकीचे कामात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय येवून त्याचा गळीतावर परिणाम झाला व त्यामुळेच कारखान्याचे गाळप एक लाख में. टानने कमी झाले परंतु यावर्षी महामार्गाचे काम ९० ते ९५ टक्के पुर्ण होत आले आहे . हंगाम सुरू होणेपुर्वी १०० टक्के पुर्ण होणार आहे. त्यामुळे कारखान्याकडे वाहनधारकांना ऊस वाहतुक करणे या पुर्वीपेक्षा अत्यंत सुलभ व सुरक्षित झाले आहे. त्याचबरोबर आजरा कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसदर व तोडणी वाहतुकीची बिले वेळेवर देणेचा प्रयत्न कलेला आहे. त्यमुळे मोठ्या प्रमाणावर कंत्राटदारांकडून तोडणी वाहतुक करार मागणी सुरू आहे. तरी आजरा गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील विश्वासु व अनुभवी तोडणी ओढणी कंत्राटदारांनी लवकरात लवकर कारखान्याच्या शेती हेड ऑफिस व सेंटर ऑफिसशी संपर्क साधुन आपले कागदपत्राची पुर्तता करून करार करावेत असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे, व्हा. चेअरमन श्री. मधुकर देसाई, संचालक श्री. संभाजी रामचंद्र पाटील, श्री. राजेश जोशिलकर, श्री. राजेंद्र मुरकुटे, श्री. दिपक देसाई, प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती. मुख्य शेती अधिकारी श्री. युवराज पाटील, श्री. भुषण देसाई, जनरल मॅनेजर प्रोडक्शन श्री. संभाजी सावंत सिव्हील इंजिनिअर म्हणून शंकर आजगेकर व सर्व अॅग्रीओव्हरसिअर व तोडणी वाहतुक कंत्राटदार आणि कर्मचारी उपस्थित होते.

पं.दिनदयाळ विद्यालयात
सर अरविंद घोष जयंती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर अरविंद घोष यांच्या १५० व्या जयंती आणि ऑरोविल यांच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ पंडित दीनदयाळ विद्यालयात श्री. जगदीश, कुमारी अर्पिता, अग्नी, देवव्रत हे सर अरविंद घोष यांच्या विचारांचा देशभर प्रसार करण्यासाठी ओरिसा येथून आले होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज उपस्थित होते. सुरुवातीला भरत बुरुड यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी अरविंद घोष यांच्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून त्यांनी सर अरविंद घोष यांचे जीवन, त्यांचे बालपण, त्यांनी केलेले कार्य, त्यांचे विचार याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी नाथा देसाई, भिकाजी पाटील, सुधीर परळकर (कुंभार) उपस्थित होते.आभार सौ. सुनीता कुंभार यांनी मानले.




