mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


पाऊस उभा… झाडे, घरे आडवी
प्रकल्प तुडुंब… नुकसान सत्र सुरू

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे . गेल्या २४ तासात आजरा मंडल मध्ये तब्बल १२४ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. एक जूनपासून आजतागायत एकूण १६१० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्वच मध्यम पाणी प्रकल्पांसह छोटे-मोठे पाझर तलाव, लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग हिरण्यकेशी व चित्रा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे तर साळगाव, किटवडे बंधार्‍यावरही पाणी आहे. साळगाव मार्गावरील वाहतूक अद्यापही पर्यायी मार्गाने सुरू आहे.

       आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील सत्तरवर घरांची पडझड झाली आहे एकंदर आता तालुक्यात नुकसानीचे सत्र सुरू झाले आहे. सलग सहाव्या दिवशी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

      गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे गांधीनगर मार्गावरील पुरातन वटवृक्ष कोसळला आहे यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून काल दिवसभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता तर सोहाळे मार्गावरही वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मेंढोली, कासार कांडगावसह अनेक गावांमध्ये घरे कोसळली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे छप्पर व पत्रे उडून गेले आहेत.

नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले असून पाणी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला असल्याने हिरण्यकेशी  व चित्रा नदीकाठच्या  गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

वानरांना आवरा…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     ग्रामीण भागासह आजरा शहरांमध्ये वानरांनी धुमाकूळ घातला असून भर पावसामध्ये वानरांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वानरांना पकडण्याची मोहीम वन विभागाने राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

     भर पावसात वानर सेनेचा धुमाकूळ सुरू असून गेल्या सहा महिन्यापासून दर चार- सहा दिवसांनी वानरांच्या कळपांचा धुमाकूळ चालू आहे. एकाच वेळी सहा ते दहा वानरांचा कळप हजेरी लावत असल्याने घरांची कौले,सिमेंट पत्रे, फळांची झाडे याचे मोठे नुकसान होत आहे.

      दोन -चार च्या संख्येत असणारी ही वानरांची संख्या आता दहा ते पंधरा वानरांच्या कळपात रूपांतरित झाली आहे.आजरा शहरासह आरदाळ, साळगाव व ग्रामीण भागामध्ये वानरांकडून प्रचंड नुकसान सुरू झाले आहे. वनविभागाने तातडीने याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

रस्त्यावर कुत्री… शेतात गवे… आणि घरावर माकडे

एकीकडे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. तर शेतामध्ये गवे, हत्तींकडून मोठ्या प्रमाणावर नुकसानसत्र सुरू आहे, त्यामुळे शेतात जातानाही विचार करावा लागत आहे. आता वानरांकडूनही उपद्रव सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत.

सोहाळे येथे चार सूत्री भात शेती


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     सोहाळे ता. आजरा येथे चार सुत्री भात शेतीचा प्रयोग पुन्हा एक वेळ सुरू करण्यात आला आहे. गतवर्षीपासून हा प्रयोग यशस्वीरित्या राबवला जात आहे. यावेळी शेती शाळाही झाली

     प्रकल्प संचालक, आत्मा कोल्हापूर रक्षा शिंदे यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन कृषी व कृषी पूरक व्यवसायातून आर्थिक समृद्धी च साधावी असे आवाहन केले. यामध्ये विविध कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पादन करून गटाच्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड विकसित करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याबाबत मार्गदर्शन केले. मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) कोल्हापूर चे नोडल अधिकारी श्री प्रवीण आवटे यांनी स्मार्ट योजनेची माहिती दिली. महिलांनी संघटित होऊन बाजारभिमुख शेतमाल उत्पादित करून तसेच त्यावर प्रक्रिया करून त्याचे ब्रँडिंग पॅकिंग इत्यादी माध्यमातून मार्केटिंग करण्याबाबत माहिती दिली. पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ श्री. राजन कामत यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत येणारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमात संसाधन शेतकरी सूर्यकांत दोरूगडे यांनी चारसुत्री भात भात रोप लागण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

     प्रगतशील महिला शेतकरी रेखा परीट यांनी आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या मरगुबाई महिला शेतकरी उत्पादक गटाच्या कार्याबद्दल माहिती दिली.यावेळी प्रात्यक्षिकच्या माध्यमातून चार सूत्र रोप लागण बाबत तसेच युरिया डीएपी ब्रिकेट बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. अर्चना देसाई यांनी आभार मानले.

उद्घाटन…


       आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी शाखेचे उद्घाटन आज दिनांक २५ जुलै रोजी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.लुईस शहा यांच्या हस्ते विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!