
वडकशीवाले येथे म्हैशीचा बुडून मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी बाजाराच्या दिवशी थोडीशी उघडीप दिली.पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस सुरू असल्याचे समजते धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही जोरात पाऊस सुरू आहे.
घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथे ज्ञानेश बाबू पाटील यांची म्हैस पुराच्या पाण्यातून वाहून गेली व मृत पावली.
चरायला सोडलेली म्हैस पाण्यातून वाहून गेली. त्यामध्ये पाटील यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचे स्वमालकीच्या जागेत ॲड. लुईस शहा – विधीज्ञ व सहकार तज्ञ कोल्हापूर यांचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
याप्रसंगी मा. ॲड. लुईस शहा यांनी ३५ व्या फुलेवाडी शाखेचे उद्घाटन झालेचे जाहीर केले. श्री. अशोक अण्णा चराटी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षम पद्धतीने बँकेची वाटचाल चालली आहे बैंकिंग रेग्युलेशन ॲक्ट मधील बदलाप्रमाणे संचालक मंडळाचा ८ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाले नंतर संचालक पद कमी करावे लागणार आहेत त्यामुळे सहकारी बँकांनी आतापासूनच काही जुने व नवीन संचालक मंडळाची रचना करूनच बँकेचे संचालक मंडळ स्थापन करून सहकाराची प्रगती करण्याचे जाहीर केले आहे. तसेच बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक श्री. अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या स्थापने पासूनची माहिती दिली. तसेच कल्याण शाखेचे उदघाटन १५ ऑगस्ट पर्यंत करणार असलेचे जाहीर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व बँकेच्या आधुनिकीकरणबाबतची माहिती तसेच बँकेतील विविध सेवा सुविधांचीही माहिती दिली.
उदघाटन प्रसंगी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक व्हा. चेअरमन श्री. सुनिल मगदुम व श्री. सुरेश डांग, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण, ॲड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी बँकेचा पूर्ण आढावा घेवून सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक श्री.तानाजी गोईलकर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक श्री. विलास नाईक यांनी मानले.

पुस्तकं मस्तकं झाली पाहिजेत : डॉ.आनंद बल्लाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पुस्तकं मस्तकं झाली पाहिजेत. पुस्तकांनीच संस्कार व संस्कृती जपली जाते. पुस्तकांनी माणूस वाचता येतो. पुस्तकं अंधारल्या मनाला चैतन्याने भिजवतात. जगणं समृद्ध करायचे असेल तर वाचन करणे गरजेचे आहे.’असे मत डॉ . आनंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रात शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्य आजरा महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ.बल्लाळ बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते .मराठी विभागामार्फत कथाकथन, कविता वाचन, व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन व अभिप्राय असा उपक्रम घेण्यात आला.
कथाकथन व कविता वाचन कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील माधुरी कांबळे, सृष्टी जांभळे, श्रुती कांबळे, गायत्री शेंडे अल्सिफा जमादार यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले तर मनाली पाटील हिने ‘गुरुदक्षिणा’ ही सर्वांना भारावून टाकणारी कथा सादर केली तसेच सुदिक्षा बोलके,समृद्धी सुतार,प्रतीक्षा सुतार यांनीही कथा सादर केल्या . पायल डोंगरे या विद्यार्थिनीने ‘ती फुलराणी’ या नाटकातील काव्यात्मक स्वगत प्रभावीपणे सादर केले.
प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते . त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून ‘वाचन संस्कृती जपली पाहिजे. जीवन समृद्ध करण्यासाठी संस्कार व संस्कृतीचे जतन केले पाहिजे. वाचनातून जीवन समृद्ध होते. त्यासाठी महाविद्यालयात समृद्ध ग्रंथालय आहे त्याचा पुरेपूर वापर करावा ‘ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. पी. संकपाळ , कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. सुषमा पारकर, प्रा. संजीवनी कांबळे, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. संदीप देसाई उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. आभार प्रा. श्रीमती सुवर्णा धामणेकर यांनी मांनले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. वैशाली देसाई यांनी केले.


