mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.२ मार्च २०२५

धनगरमोळा येथील मधमाश्यांच्या हल्ल्यात आठ जण जखमी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       धनगरमोळा ता. आजरा येथे आगीच्या धुरामुळे उठलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात आठ जण जखमी झाले.जखमीमध्ये दिलीप तुकाराम शेटगे (वय ४७),रामचंद्र तुकाराम शेटगे( वय ६०),रवींद्र तुकाराम शेटगे (वय ५५),दिपाली दिलीप शेटगे (वय ४२),अंजना गणपत शेटगे (वय ४९),कु. नंदिनी गणपत शेटगे (वय २०),कु.नामदेव गणपत शेटगे (वय २३),योगेश रघुनाथ माळगे (वय ३२),कोरोची, इचलकरंजी अशी जखमींची नावे आहेत.

       येथील राई नावाच्या शेतात उसाच्या पालापाचोळ्याला आग लावण्यात आली होती. या आगीच्या धुराने तिथेच असलेल्या झाडावरील आग्या मोहोळातील मधमाशा आक्रमक झाल्या. त्यांनी तिथे असलेल्या सर्वांना दंश करायला सुरुवात केली. यामध्ये स्थानिक महिला आणि युवती मधमाशांच्या आकस्मिक हल्ल्यात जखमी झाल्या. तर इचलकरंजी मालवाहतूक करणारा माळगे टेम्पोचालक लघूशंकेसाठी उतरला असता, त्याच्यावरही मधमाश्यांनी हल्ला चढवला. या प्रकारामुळे घटनास्थळी धावपळ उडाली. जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

         सावधान… उन्हाचा तडाखा वाढतो आहे

      सध्या उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे एखाद्या झाडाखाली जेवण करताना, कचरा जाळताना काळजी घेण्याची गरज आहे. उन्हामध्ये मधाच्या पोळ्यांना धूर लागल्यास तातडीने मधमाशा आजूबाजूच्या लोकांवर हल्ला चढवत असल्याचे सांगितले जाते. इतर ऋतू पेक्षा उन्हाळ्यामध्ये असे प्रकार सर्रास घडताना दिसतात.

‘रवळनाथ’ चा मोलमजुरी करणाऱ्या जळीतग्रस्त कुटुंबाला आधार… १५ हजार रुपयांची तातडीची मदत

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील गांधीनगर परीसरातील श्री.राहुल गणपती गायकवाड व आरती राहुल गायकवाड यांच्या राहत्या घराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली, आर्थिक परीस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या गायकवाड कुटुंबियांसमोर या प्रसंगामुळे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली.

        या संदर्भातील बातमी वाचून श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी तातडीने गायकवाड कुटुंबियांची माहिती घेवून चौकशी केली आणि रु. १५ हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हॉसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ या उपक्रमातंर्गत ही मदत देण्यात आली

       मूळचे शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कांही वर्षापासून आजरा येथे स्थायिक झाले आहे. राहुल हे मिळेल ते काम करून आपले कुटुंब सांभाळत आहेत. आजरा येथे त्यांनी कष्टाने उभारलेल्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह राहत्या घराचे मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेमुळे गायकवाड कुटुंबासमोर बाका प्रसंग उभा राहिला आहे.

      ‘रवळनाथ’ मार्फत नेहमीच समाजातील अपघातग्रस्त, जळीतग्रस्त, गरीब आणि संकटांत सापडलेल्या दुर्बल घटकांसाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवांना धीर देण्याचे काम “रवळनाथ’ कडून केले जाते. ‘रवळनाथ’च्या या मदतीबद्दल गायकवाड कुटुंबियांनी तसेच श्री. विष्णू ससाणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

      याप्रसंगी रवळनाथचे संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार, आजरा शाखेचे चेअरमन प्रा. डॉ. विनायक आजगेकर, शाखा सल्लागार प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. गौतम सुतार, सीईओ श्री. डी. के. मागदेव, पत्रकार श्री. ज्योतीप्रसाद सावंत, जनसंपर्क अधिकारी श्री. बाबासो मार्तंड , शाखाधिकारी श्री. सागर माने यांच्यासह श्री. विष्णु ससाणे व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

                  २४ तासात मदत…

       सदर घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत ‘रवळनाथ हौसिंग’ ने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना आर्थिक मदत केली. यातून ‘रवळनाथ’ परिवाराचे सामाजिक भान निश्चितच अधोरेखित झाले आहे.

वडकशिवाले येथे नाम. हसन मुश्रीफ वैद्यकिय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       वडकशिवालेसारख्या छोट्या गावाने निवडणूकीत आर्थिक लाभ न घेणे, आदर्श वाचनालय, डेअरी असे उपक्रम राबवले. माझ्या विकासकामांची आठवण ठेवत निवडणूकीत मताधिक्य दिले. परंपरा , आदर्श जोपासणाऱ्या या गावच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केले.

       वडकशिवाले येथे सत्कारसोहळा व विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी आजरा कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे होते. स्वागत व प्रास्तविक सुनिल दिवटे यांनी केले .

      यावेळी बोलताना ना.मुश्रीफ यांनी अनेक प्रश्रांना हात घातला. आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसन प्रश्नासाठी पाठपुरावा, बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण कार्यालय, उत्तूर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालयाच्या कामाची माहिती देताना महिलांना एसटीची ५०% सवलत चालू रहाणार व लाडकी बहिणीची मदत १५०० रुपयांवरून २१०० रु. करण्याचा विचार असल्याचे सांगितले.

      अध्यक्षीय भाषणात वसंतराव धुरे यांनी विधानसभा निवडणूकीत वडकशिवाले गावाने मुश्रीफ यांना मताधिक्य दिल्याचा उल्लेख करत गावच्या विकासासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.मंत्री मुश्रीफ यांचा ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विविध संस्थांनी सत्कार केला .

         कार्यक्रम प्रसंगी सरपंच मयूरी कांबळे, उपसरपंच नितीन सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी उपसभापती शिरीष देसाई, तहसीलदार समीर माने, कारखाना संचालक काशिनाथ तेली, बबन पाटील, विजय वांगणेकर , पांडूरंग दिवटे, शशी लोखंडे, जयवंत शिंदे, शिवाजी पाटील, तानाजी चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार महेश शिंदे यांनी मानले.

कॅन्सर मुक्तीच्या दिशेने…….!

      मंत्री मुश्रीफ यांनी महिलांना गर्भाशय कॅन्सरपासून सुटका होण्यासाठी मतदार संघातील महिलांना मोफत लस देणार तसेच आंबेओहोळ प्रकल्पातील अतिरिक्त पाणीसाठा जाधेवाडी, मासेवाडी व बहिरेवाडी या गावांना शासकीय उपसासिंचनद्वारे देण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, जागा यांचा सर्व्हे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

टस्कर आला पळा पळा…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      अचानक  टस्कराला समोर पाहील्याने शेतकऱ्याने धूम ठोकल्याचा प्रकार किणे ता. आजरा येथे घडला.

      किणे येथे माळ नावाच्या शेतात शुक्रवार (ता. २८) रात्री घटना घडली. या परिसरात टस्कर तळ ठोकून असल्याने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

      किणेचे विजय पताडे यांचे आजरा -नेसरी रस्त्यावर शेत आहे. या शेतात त्यांनी उसाचे पिक घेतले आहे. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री अकरा वाजता उसाला पाणी पाजण्यासाठी शेत गेले. कृषीपंप सुरु करण्यासाठी गेले. या वेळी त्यांच्या समोर हत्तीचे काळे धुड समोर उभारलेले दिसले. त्याच्या चित्काराने पताडेंची घाबरगुंडी उडाली. त्यांनी गावाकडे धूम ठोकली. ग्रामस्थांना याबाबत माहीती दिली.

      गेले दोन महीने किणे परिसरात टस्कर तळ ठोकून आहे. शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुव टस्कराचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

निरोगी बालपण म्हणजे सुरक्षित भविष्य : डॉ.अमोल पाटील 

         आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेची
जिल्ह्यात सुरुवात झाली असून ० ते १८ वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार आहे. निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले.

      आजरा हायस्कूल, उर्दू हायस्कूल व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या अभियानामध्ये मुलांमधील दोष, आजारपण लवकर शोधणे व वेळीच उपचार करुन भविष्यात आरोग्य विषयक उद्भवणारे दोष कमी करणे आणि भविष्यकाळात देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती साधने हा उद्देश असल्याचे सांगितले.

       सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची होणार सर्वांगीण तपासणी या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रक्षेपण दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आले.

       डॉ. अनिल देशपांडे व डॉ. दीपक सातोस्कर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लहान मुला-मुलींना, सेवकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेबद्दल यावेळी आभार मानले.

       यावेळी रुग्णकल्याण समितीचे विजय थोरवत, माजी नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी, डॉ .दीपक सातोसकर, डॉ.अनिल देशपांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ठाकूर, राष्ट्रीय बाल स्वास्थ वैद्यकीय अधीकारी डॉ. दरवाजकर, डॉ. स्वाती रेडेकर डॉ. सातवेकर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   सुत्रसंचालन युनुस लाडजी व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजीत पांडव यांनी केले.

निधन वार्ता
सतिश पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कानोली (ता.आजरा ) येथील कानोली विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन सतिश पंडितराव पाटील (वय ६६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!