रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५


पार्टीत राडा… एकाने घातला दुसऱ्याच्या डोक्यात रॉड… एक गंभीर जखमी… दुसऱ्यावर गुन्हा दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘बंबई से आया मेरा दोस्त…पार्टी तो बनती है…’ म्हणत मित्रासाठी पार्टी आयोजित केली. पार्टीत किरकोळ कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये कवटीला मार बसल्याने मित्र गंभीर जखमी झाला असून मुंबईतल्या या मित्राला गावाकडची पार्टी थेट कोल्हापूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यास कारणीभूत ठरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी…
सुलगाव ता. आजरा येथील मंगेश पांडुरंग सूर्यवंशी ( वय ४० वर्षे ) हा मुंबई येथून गावी आल्यानंतर सर्व स्धानिक मित्रांनी मिळून पार्टीचा बेत आखला. हाजगोळी तिठ्ठा परिसरात रविराज वर्देकर यांच्या शेळी- मेंढी पालन परिसरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्टी रंगात आली असताना पिण्यासाठी पाणी कोणी आणायचे ? यावरून वाद सुरू झाला या वादातून रवींद्र मुकुंद शिवगण याने मंगेश सूर्यवंशी याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये मंगेश सूर्यवंशीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला प्रथम गडहिंग्लज व त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
मंगेशचा भाऊ संदीप पांडुरंग सूर्यवंशी याने याप्रकरणी आजरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र शिवगण याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
पुढील तपास महिला पोलीस हवालदार रेश्मा नाईक करीत आहेत.


आज-यातील सिद्धी शेळकेचा ‘एनआयएस’ फुटबॉल प्रशिक्षक परीक्षेत डंका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील माद्याळ येथील सिद्धी रवी शेळके हिने भारतीय खेल प्राधिकरणच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘एनआयएस’ फुटबॉल प्रशिक्षक परीक्षेत यशस्वी घोडदौड करत डंका पिटवला.अशी कामगिरी करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे.
प्रसिद्ध फुटबॉल पंच व प्रशिक्षक राजू दळवी यांचे तिला मार्गदर्शन लाभले.सिद्धीला फुटबॉल खेळाची पार्श्वभूमी नसताना तिने किमया करून दाखवली आहे.
” रोजचा सराव, मेहनत, जिद्द, चिकाटी, आई-वडीलांचे प्रोत्साहन, वेळोवेळी राजू दळवी यांचे मार्गदर्शन आणि मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे सहकार्य यामुळे यश संपादन करता आले. “”
. …सिद्धी शेळके, फुटबॉल प्रशिक्षक


पुन्हा हत्ती रस्त्यावर…
मोरेवाडी येथे खुलेआम वावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ घालणारा हत्ती अद्यापही वाटंगी- मोरेवाडी परिसरात तळ ठोकून असून शनिवारी सायंकाळी हत्तीचा रस्त्यावरील वावर या भागातील वाहन चालकांनी अनुभवला.
अनेकांनी हत्ती रस्त्यावरून जाताना पाहिला. काहींनी मोबाईल वरून हत्तीचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. या भागात हत्कतीडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे.


विरोधानंतर प्रीपेड मीटर काढून टाकले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अंबाडे ता. आजरा येथे अदानी कंपनीच्या वतीने खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू होते दरम्यान ग्राहकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सदर प्रीपेड मीटर काढून टाकण्यात आले.
बाहेरगावी असणारे विष्णू पाटील यांच्यासह अन्य मंडळींच्या घरी सदर मीटर बसवले जात होते परंतु होणारा विरोध पाहून मीटर काढण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरुस्कर यांनी तातडीने गडहिंग्लज कार्यकारी अभियंत्यांची संपर्क साधून जोपर्यंत याबाबतची जनसुनावणी होत नाही तोपर्यंत असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असे सांगत यातून ग्राहकांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार ग्राहक राहणार नाहीत असा इशाराही दिला आहे.

पेरणोली येथे संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आदमापूरचे श्री संत सदगुरु बाळूमामा यांची मुक्या प्राण्यांची पालखी व मेंढ्यांचा कळप व पेरणोली ते पारेवाडी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
संत बाळूमामा कळप नंबर ६ हा कळप पेरणोली चार दिवस तळ ठोकून होता. सकाळ – संध्याकाळ आरतीसह विविध कार्यक्रम पार पडले. महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. स्थानिक तरुणांनी चार दिवस बाळुमामांची पालखीची सेवा केली. ही पालखी पारेवाडी येथे भंडारा उधळत सोडण्यात आली.
पालखीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मेंढ्यांना व पालखीला आपल्या घराजवळ आसरा दिल्यास पीक उत्तमरीत्या येते. घरातील आर्थिक स्थिती सुधारून दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


छायावृत्त…


साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




