रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४



आजऱ्यात दसरा उत्साहात

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात दसरा उत्साहात पार पडला. ठिकठिकाणी दुर्गामाता विसर्जन मिरवणूकांसह सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
आजरा येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा पालखी सोहळ्यासह निमजगा मैदान येथे सीमोल्लंघनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रवळनाथ मंदिर उपसमितीचे पदाधिकारी व मानकरीही उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. बाजारपेठेतील खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सोन्यासह इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत होते.
रात्री उशिरापर्यंत दुर्गा माता मुर्ती विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू होत्या.


आजरा उपजिल्हा रुग्णालयासह ३१ कोटींच्या विविध विकास कामांचे आज उद्घाटन व भूमिपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या सर्फनाला प्रकल्पाच्या पाणी पुजनाचा कार्यक्रम आज रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आमदार आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर आजरा शहरातील माजी सैनिक सभागृहाचे दुपारी एक वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. आजरा शहरातील आमराई गल्ली नदीवरील पुलासाठी आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ दुपारी ३ वाजता होणार आहे. दुपारी चार वाजता बौद्ध विहाराचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. सायंकाळी पाच वाजता आजरा तालुक्यासाठी मंजूर झालेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.


पोळगाव येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोळगांव. ता. आजरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करणेत आला. भारतीय बोद्ध सभेचे तालुका अध्यक्ष. आयु. जीवन शेवाळे हे अध्यक्ष स्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड. काशिनाथ मोरे होते. त्यानी सम्राट अशोक यांचा धम्माचा प्रचार प्रसार आणि संताचे विचार यां बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोळगांव गावच्या सरपंच माधुरी गुरव यांनी धम्म चक्र परिवर्तन च्या शुभेच्छा दिल्या.
आजरा तालुका खरेदी विक्री संघांचे माजी चेअरमन राजू होलम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा आणि त्यांनी दिलेल्या घटनेबाबत मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच संजय सुतार. गावातील लक्ष्मण खामकर वंचित चे आजरा तालुका युवा अध्यक्ष संतोष मासोळे. जिल्हा उपाध्यक्ष डि. के. कांबळे.संदीप कांबळे.भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन प्रमुख. तर वंचित च्या ग्राम शाखेचे. हात्तीवडे. मलिग्रे, मुरुडे. हाळोली. सारंबळवाडी. कासारकांडगाव. आणि पोळगांव ग्रामस्थ होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाजी कांबळे यांनी केले.आभार भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष जीवन शेवाळे यांनी मानले.

‘ गंगामाई ‘ च्या वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात कु. भक्त्री सुधीर साळोखे – पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर व माध्यमिक गटात कु. सोहम संतोष पाटील पार्वती शकर विद्यालय, उत्तूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कै. पांडुरंग बिडकर गुरूजी खुल्या वक्तृत्व स्पर्धेत पूर्व तयारी गटात कु. गणेश ज्ञानदेव लोळगे पारगांव, हातकणंगले व उत्स्फुर्त गटात श्री. राजेंद्र मारुती पटेकर आजरा यांनी प्रथम क्रमांक मिळवीला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्राथमिक गट : इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक-
कु. भक्ती सुधीर साळोखे
व्दितीय क्रमांक- कु. श्रेया संदिप चौगुले तृतीय क्रमांक- कु. जानवी सागर पाटील पार्वती शंकर विद्यालय, उत्तर विद्यामंदिर, कोरीवडे विद्यामंदिर, साळगाव
माध्यमिक गट: इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक- कु. सोहम संतोष पाटील पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर
व्दितीय क्रमांक : कु. समृद्धी उत्तम वांद्रे पेरणोली हायस्कूल, पेरणोली
तृतीय क्रमांक: कु. सिमरन भिकाजी पाटील व्यंकटराव हायस्कूल, आजरा
खुली स्पर्धा – पूर्वतयारी गट
प्रथम क्रमांक: गणेश ज्ञानदेव लोळगे पारगांव, हातकणंगले व्दितीय क्रमांक: कु. चैतन्य कुंडलिक कावळे कोळवण, भुदरगड तृतीय क्रमांक : कु. संकेत कृष्णात पाटील वरणगे, पाडळी
खुली स्पर्धा – उत्स्फूर्त गट
प्रथम क्रमांक- श्री. राजेंद्र मारुती पटेकर आजरा व्दितीय क्रमांक – कु. राखी राजू नवार गवसे तृतीय क्रमांक- कु. प्रतीक्षा वसंत पाटील सौंदलगा, चिकोडी
वाचनालयाचे अध्यक्ष डॉ .अशोक बाचूळकर,संजय बिडकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
संचालक वामन सामंत यांनी आभार मानले.


उत्तूर विद्यालयात गणित व बुद्धिमत्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर विद्यालय उत्तूर मध्ये इयत्ता आठवी स्कॉलरशिप व एन. एम. एम. एस. परीक्षेचे विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
ए. आर. पाटील, सावर्डे यांनी गणित व बुद्धिमत्ता या विषयावर यापूर्वी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी विविध व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांच्या गुणांचे संवर्धन केले आहे. गेली दोन वर्षे ए. आर. पाटील यांचे सखोल मार्गदर्शन उत्तूर विद्यालय व परिसरातील विद्यार्थ्यांना शैलेंद्र आमणगी सेवापूर्ती समितीमार्फत दिले जाते.या वर्षीही उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उत्तूर आणि पंचक्रोशीतील विविध शाळांना व्हावा या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २४० विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे विशेष मार्गदर्शन देण्यात आले.
याप्रसंगी विविध शाळातील विशेष शिक्षक व मान्यवर मुख्याध्यापक यांची उपस्थिती या ठिकाणी उल्लेखनीय होती. विद्यार्थ्यांनी सामूहिक चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला.आपले दिवसभराचे अनुभव कथन केले.या एक दिवशीय शिबिरामध्ये गणित व बुद्धिमत्ता या काठीन्य पातळीवरील विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच किरण आमणगी यांनी या कार्यशाळेबद्दल आपल्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी अनिल लोखंडे, सुहास पोतदार, यांच्याबरोबरच ग्रामपंचायत उत्तूर चे सदस्य महेश करंबळी, मुख्याध्यापक मुंडे, शरद पाटील, टी. के.पाटील, प्रा.ईश्वर शिवणे,सौ. अमणगी व इतर उत्तूर पंचक्रोशीतील शाळातील विविध मान्यवर मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक उपस्थित होते.


महाराष्ट्र …
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू !
अज्ञात व्यक्तींनी चार ते पाच गोळ्या झाडल्या !!

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी आली होती धमकी
बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
कोण आहेत बाबा सिद्दिकी ?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.१९९९,२०९४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.
बाबा सिद्दिकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२०१४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.


जिल्हा…
कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा दिमाखात संपन्न!

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला अनेक वर्षांची प्रसिद्ध परंपरा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे शनिवारी (दि.१२) सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी शमीपूजनाचा सोहळा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याची जय्यत तयारी कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासह महापालिका व प्रशासनाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात व कोल्हापूर: विजयादशमीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौक येथे करण्यात आली होती.
दरम्यान, दसरा मैदानात लकडकोट उभारून त्यावर शमीपूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या पूर्वेकडे स्वराज्याचा भगवा ध्वज व जरीपटका उभारण्यात आला होता. हुजूर स्वाऱ्यांसह सरदार, जहांगीरदार, मानकरी यांसह प्रशासकीय अधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी मैदानाच्या पश्चिम व उत्तर बाजूस मंडप (शामियाना) उभारण्यात आला होता.
हिल रायडर्सचे नगारखान्यास तोरण
दसरा सणानिमित्त हिल रायडर्स ग्रुपतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे जुना राजवाड्याच्या नगारखाना या मुख्य प्रवेशद्वारास तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. यंदा उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम पार पडला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, आपला शौर्यशाली इतिहास आजच्या युवा पिढीला माहिती व्हावा, कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रीडा…
संजू सॅमसनचे पहिले टी-२० शतक !
रोहितचा मोठा विक्रम मोडत ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज !!

हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर संजू सॅमसन खळबळ उडवून दिली आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संजूने तुफानी शैलीत फलंदाजी करत अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर नंतर अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावत रोहित शर्माचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.
संजू सॅमसन बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता, परंतु त्याने हैदराबादमध्ये अप्रतिम पुनरागमन केले आणि त्याच्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. संजूने २०१५ मध्ये त्याच्या T20 क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही तर कारकिर्दीतील ३३ व्या सामन्यात पहिले शतक झळकावले.
बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरताच संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. त्याने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने फटकेबाजीचा वेग वाढवला आणि त्याने या सामन्यात ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ९ चौकारही लगावले.
बातम्या सौजन्य….online news service


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



