

शासनाच्या आरोग्य विषयक सुविधांचा लाभ घ्या आमदार प्रकाश
आजरा येथे माहेर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड लक्षात घेऊन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासारखी योजना याचाच एक भाग असून डॉक्टर गॉडद दांपत्याच्या प्रयत्नातून आजऱ्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी एक आरोग्य विषयक नवे दालन सुरू होत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले.
येथील माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार आबीटकर म्हणाले, अलीकडे उपचाराअभावी रुग्णांची फरफट होताना दिसते मुळातच आजारांचे प्रकार इतके वाढले आहेत की निदान होईपर्यंत व झाल्यावर रुग्णांना औषधोपचारासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळे अनेकांना उपचारापासून वंचित राहावे लागते. यासाठी रुग्णांनी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे व तेथून उपचार घेतल्यास अत्यंत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने उपचार होणे सोपे जाते. त्यातूनही ज्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे आहेत त्यांनी प्रथम त्या रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा आहे का याची शहानिशा करून त्यानंतरच उपचारास प्राधान्य द्यावे. सर्व सेवांमध्ये आरोग्य विषयक सेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा बनत आहे. गॉडद दाम्पत्याने यापुढेही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार विकास अहिर नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, डॉ अनिल देशपांडे, फादर फेलिक्स लोबो, अनिकेत चराटी, नगरसेवक आनंदा कुंभार, संपतराव देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, निलेश घाटगे,संजय पाटील,विजय थोरवत,संतोष भाटले, अश्विन डोंगरे,डॉ.रिया गॉडद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत डॉ. बर्नाड गॉडद यांनी केले तर आभार डॉ. बर्नडेट गॉडद यांनी मानले.


जनता बँक आजराला सलग पाचव्यादा बँको ब्ल्यु रिबन अँवाँर्ड
आजऱ्यातील जनता सहकारी बँक लि. आजराला बँको ब्ल्यु रिबन अँवाँर्डने पुन्हा एकदा सन्मानित करणेत आले. रु २५० ते ३०० कोटी ठेवी असणाऱ्या देशभरातील सर्व बँकांच्यामधून दि. २८/०२/२०२३ रोजी महाबळेश्वर येथे उत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करणेत आले. आज बँकेच्या एकूण ठेवी रु. ३१० कोटी व कर्जे रु. २१० कोटी असून बँकेचा शुन्य टक्के नेट एन.पी.ए. आहे. बँकेच्या एकूण १७ शाखा कार्यरत असून परत मुंबई येथे दोन शाखा चालू करणेसाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठविला आहे.
बँकेच्या एकूण १७ शाखा पैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. बँकेकडे सर्व प्रकारचे अद्यावत टेक्नॉलोजी उदा. स्वतःचे डी.सी व डी. आर सेंटर, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रो ए टी एम, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी. इ. सुविधा आहेत.
बँकेने तरुण होतकरु व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळातर्फे व पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत दिल्या जाणार व्याज सवलत व सबसिडी कर्ज आज अखेर रु. २० कोटीची कर्ज आदा करुन कार्यक्षेत्रातील तरुण उद्योजकांना उभा करणेचे काम करत आहोत असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई यांनी स्पष्ट केले.
बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक व कर्मचारी यांच्याबरोबर सभासदांचाही सिंहाचा वाटा आहे. या विश्वासाच्या जोरावरच येणाऱ्या पाच वर्षात बँकेचा व्यवसाय दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई, ज्येष्ठ संचालक श्री. जयवंतराव शिंपी व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम.बी. पाटील यांनी सांगितले.


आजरा कारखान्याची ३१ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा :
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दि.१६ ते ३१ जानेवारी या कालावधीत गाळप झालेल्या ४९८१५ मे. टन ऊसाची रू.३०००/- प्र. मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रू.१४.७५ कोटीची ऊस बिले विनाकपात संबंधीत शेतक-यांच्या खातेवरती बँकेत जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी दिली.
आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत ३ लाख ३६ हजार मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उता-याने ४,०६,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्यवस्थापनाने ४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ट ठेवले होते. पण अती पावसामुळे उस उता-यामध्ये १० टक्के घट झाली. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणा कांही अंशी कमी पडली. त्यामुळे ठरविलेले उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. तरीपण संपुर्ण अडचणींना तोंड देत कारखान्याने ३ लाख ३६ हजार मे. टनाचे गाळप केले. त्याकरीता कारखान्याकडे आलेल्या ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत आदा करणेचे नियोजन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने कारखान्याने केलेले आहे. त्याचप्रमाणे चालु लागवड हंगामाकरीता ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयात देखील सुरू आहे असेही याप्रसंगी त्यांनी सांगीतले. तसेच फेब्रुवारी मध्ये गळीतास आलेल्या सर्व ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले लवकरच आदा करणेत येणार आहेत.
यावेळी कारखान्याचे मा. व्हा. चेअरमन श्री. आनंदा कुलकर्णी व मा.संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. वसंतराव धुरे, मा. संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. दिगंबर देसाई, श्री. सुधीर देसाई, श्री.मारूती घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, मा.संचालक, श्री.उदयसिंह उर्फ मुकुंदराव देसाई, श्री. दशरथ अमृते, श्री. राजेंद्र सावंत, श्री. अनिल फडके, श्री.मलिककुमार बुरूड, श्री.तानाजी देसाई तसेच मा.कार्यकारी संचालक, डॉ.टी.ए.भोसले सेक्रेटरी,श्री. व्ही.के. ज्योती उपस्थित होते.











