


सावधान…
उभ्या गाड्यांमधील डिझेल चोरीचे प्रकार आज-यात वाढले…

आजरा शहरामध्ये रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी उभ्या केलेल्या ट्रकसह इतर गाड्यांमधील डिझेल टाक्यांची झाकणे फोडून त्यातील डिझेल लंपास करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे ट्रक व्यावसायिकांसह चारचाकी वाहनधारकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
यापूर्वी शहरांमध्ये दुचाकी मधील पेट्रोल चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते. गेल्या पंधरा दिवसात मात्र ट्रक व अन्य मोठ्या गाड्यांमधील शेकडो लिटर डिझेल चोरून नेले जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
दर्गा गल्ली आजरा व आंबोली मार्ग येथे असे प्रकार घडल्याने रात्रीच्या वेळी वाहने नेमकी लावायची कुठे ? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही असतानाही असे प्रकार घडत असल्याने या चोरीच्या प्रकारावर नियंत्रण ठेवताना अपयश येताना दिसते.


‘ एकता’ ने सहकारात नावलौकीक वाढवावा :
आमदार प्रकाश अबिटकरपेरणोलीत विकास कामे व एकता गृहतारण संस्थेचा शुभारंभ

तरूणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एकता गृहतारण संस्था विश्वासाला पात्र ठरावी. त्या विश्वासातून संचालक मंडळाने सहकारात नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन राधानगरी, भुदरगड व आजराचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी केले.
पेरणोली ता आजरा येथे पाझर तलाव, धनगरवाडा रस्ता व वीज, रवळनाथ मंदीर सूशोभिकरण, जलजीवन योजना,नावलकरवाडी रस्ता, तलाठी कार्यालय या पावणेसहा कोटींच्या कामाचा व एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार अबिटकर म्हणाले, सध्या सामाजिक, सहकार क्षेत्रांत काम करणारे तरुण कमी आहेत.आजरा तालूक्यात सहकारी संस्था चांगल्याप्रकारे चालवल्या जातात.संस्थेमूळे अनेकांचे संसार फुलतात.
रवळनाथ मंदीरासाठी २५ लाखाचा निधी देणार असून कोणत्याही परिस्थितीत सर्फनाल्याचे पाणी अडवणार आहे.तर गारगोटी ते आजरा रस्त्याच्या तरतुदीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
यावेळी सरपंच उषाताई जाधव,उपसरपंच उत्तम देसाई, काँ.संपत देसाई ,उदयराज पवार ,सुभाष विभूते, यांची भाषणे झाली.
यावेळी विविध पदावर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा प्रियांका जाधव,जयवंत कोडक,मुकुंद कांबळे, साळगाव सरपंच धनंजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीपतराव देसाई,राजेंद्र सावंत,पांडुरंग लोंढे,जयवंत कोडक,पांडुरंग जोशीलकर,जनार्दन देसाई,नाथा देसाई,भिमराव दळवी,संस्थापक संतोष जाधव,शिवाजी मस्कर ,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कळेकर,उज्वला मस्कर,लक्ष्मी जोशीलकर, नंदा कांबळे,ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
रवींद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. अविनाश जोशीलकर यांनी स्वागत केले.सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले.शेखर कळेकर यांनी आभार मानले.
मुलगीसाठी संस्थेकडून १००० रुपयाची ठेव
यावेळी पेरणोलीत मुलगी जन्माला आली तर संस्थेच्यावतीने १००० रूपयाची ठेव पावती करुन देण्याची घोषणा संस्थापक संतोष जाधव यांनी केली.

सरकारी आरोग्य सेवा सक्षम करण्याची गरज… काशिनाथ मोरे

राज्यातील ग्रामिण भागातील सरकारी आरोग्य सेवाना अनंत अडचणी तुन मार्ग काढताना , ग्राम सभामधून , चर्चा करून लोक सहभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरकारी आरोग्य सेवा सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तालूका समन्वयक काशिनाथ मोरे यांनी व्यक्त केले.
आजरा पंचायत समिती येथे तालूका पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती कार्यशाळा संपन्न झाली. प्रास्ताविक संजय घाटगे यांनी केले.
काशिनाथ मोरे यांनी बोलताना ग्रामिण भागात सरकारी आरोग्य सेवा मध्ये ब-याच जागा रिक्त असूनही शासकीय फंड व औषध साठा पुरेसा व वेळेवर उपलब्ध होत नाही , हि सर्वत्र अडचण असली तरी जन आरोग्य समिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यावेळी जिल्हा समन्वयक तायाप्पा कांबळे यांनी जन आरोग्य समिती बळकट करण्यासाठी दरमहा मिटींग घेणे व शासकीय योजनांची माहिती करून याबद्दल मार्गदर्शन केले.
तालूका आरोग्य विस्तार अधिकारी व्ही. ए. काटकर यांनी बोगस व फिरते डाॅक्टर यांची माहिती गाव पातळीवर घेणे आवश्यक आहे. यावेळी उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.विशाल शिंदे व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डाॅ. व्ही. जी. हतळगी यांनी आरोग्य केंद्राच्या प्रश्न व समस्या बाबतीत समितीला मार्गदर्शन केले. यावेळी पारेवाडी उपकेंद्र आजरा नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने कामाचा व खर्चाची वाढ होत असल्याने याची जबाबदारी आजरा नगरपंचायतने घ्यावी अशी मागणी पुढे आली. तसेच रिक्त जागा व पुरेसा औषध साठा या मागणी साठी ग्राम सभेत ठराव करणेचे ठरले. उपकेंद्र पातळीवर बाळंतपण सोयीस्कर होत असल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी वेळवट्टी सरपंच सौ. मनिषा देसाई , सरपंच डाॅ.संदीप देशपांडे ,युवराज पाटील, स्मिता पाटील, रूपाली पाटील, सुनिल कांबळे, शकुंतला सुतार,समिर पारदे याच्या सह जनआरोग्य समिती पदाधिकारी पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते.आभार सागर गुरव यानी मानले.


अण्णाभाऊ सुत गिरणीत आरोग्य निदान शिबिर संपन्न..

अण्णाभाऊ आजरा तालुका सूत गिरणी, पूर्वा हॉस्पिटल कोल्हापूर व डॉक्टर व्ही. टी. फाउंडेशन, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य निदान शिबिर आजरा सूत गिरणी येथे संपन्न झाले.
स्वागत व प्रास्ताविक आजरा बँकेचे चेअरमन व सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अनिल देशपांडे यांनी केले.महिलांनी कुटुंबाचे व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य व सकस आहाराचे सेवन करावे त्यामध्ये नाचणी, कुळीथ, तांदूळ, शेंगदाणे, गुळ यांचा भरपूर वापर करावा असे सांगितले. पूर्वा हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ.भारती अभ्यंकर यांनी ॲनिमिया व महिलांमधील विविध आजाराविषयी माहिती दिली विशेष करून स्तन व गर्भाशय कॅन्सर प्राथमिक अवस्थेत कसा ओळखावा याची माहिती दिली. ६० महिलांची पॅप स्मिअर ही तपासणी मोफत केली.
डॉक्टर सिद्धेश्वर इनामदार कोल्हापूर यांनी१०० शंभर महिलांची आरोग्य तपासणी केली व स्वयं सिद्धा कोल्हापूरच्या जयश्री गायकवाड संगीता कांबळे , तनवी कुडाळकर सौ. स्नेहल करंडे पूर्वा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी औषध वाटप केले. सदर कार्यक्रमास सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी,संचालिका मालुताई शेवाळे सौ. मनीषा कुरुणकर, डॉक्टर सौ. अंजनी देशपांडे जनरल मॅनेजर वाघ, ऑफिसर सचिन सटाले तसेच आजरा सुतगिरणी गारमेंट मधील महिला, खेडे व आजरा येथील महिला उपस्थित होत्या. सौ. शामली वाघ यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.


गिरणी कामगारांचा तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा व धरणे
गिरणी कामगारांना व वारसदाराना मुंबईतच घर मिळाले पाहीजे. या मागणी साठी गुरूवार दिनांक ९ मार्चला सर्व श्रमिक संघटना यांच्या वतीने गिरणी कामगारांना संघटित करून कोल्हापूर जिल्हयातील तहसील व प्रांत कार्यालय हजारोच्या संख्येने गिरणीकामगार मोर्चाने जावून आपले निवेदन शासकिय यंत्रणे मार्फत मुख्यमंत्री यांना आपले हक्काचे घर ताबडतोब मिळावे व गिरणीकामगार वारसदार हक्क कायम रहावा या बाबतचे निवेदन देणे व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यासाठी कोल्हापूर जिल्हातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कागल, शाहूवाडी येथून मोर्चा चे नियोजन केले असून १२ मार्चला मुख्यमंत्री यांचे ठाणे येथील घरावर राज्यातील गिरणीकामगार व वारसदाराचा धडक मोर्चा काढणार असलेचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
या नियोजनासाठी काॅ. अतूल दिघे, काॅ.दत्तात्रय अत्याळकर, काॅ. शांताराम पाटील, अमृत कोकितकर, गोपाळ गावडे, कृष्णात चौगले, सदाशिव खोपडे याच्या सह कार्यकर्ते गावपातळीवर बैठका घेत आहेत.

🟣 Influenza virus H3N2: कोरोनाप्रमाणे देशात पसरत आहे इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2, काय आहेत लक्षणे व उपाय?
♦️Influenza virus h3n2 symptoms : H3N2 हा इन्फ्लूएंजाचा नवा स्ट्रेन आहे आणि हा गतीने पसरतो तसेच प्रत्येक वर्षी म्यूटेट करतो. सध्या देशात या व्हायरसची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय बनली आहेत.
एम्स दिल्लीचे माजी डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इन्फ्यूएंजाच्या वाढत्या संक्रमणाविषयी बोलताना म्हटले की, H3N2 हा इन्फ्लूएंजाचा नवा स्ट्रेन आहे आणि हा गतीने पसरतो तसेच प्रत्येक वर्षी म्यूटेट करतो. डॉ. गुलेरिया इंस्टीट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन अँड रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षणाचे संचालक आहेत. त्यांनी सांगितले की, होली साजरी करताना सावधान राहणे गरजेचे आहे.
Influenza virus H3N2 ची लक्षणे
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, इन्फ्लूएंजा संक्रमणामध्ये ताप, त्याचबरोबर घशात खवखव, खोकला, अंगदुखी व सर्दी सारखी लक्षणे दिसतात. हा व्हायरस म्यूटेट झाला आहे आणि लोकांमध्ये याला प्रतिकार करण्यासाठी इम्यूनिटी कमी झाली आहे. यामुळे या व्हायरस गतीने पसरत आहे.
Influenza virus H3N2 कसा पसरतो…?
काही वर्षापूर्वी H1N1 व्हायरसमुळे महामारी सुरू झाली होती. H3N2 त्याच व्हायरसचा नवा स्ट्रेन आहे. त्यामुळे हा एक सामान्य इन्फ्लूएंजाचा स्ट्रेन आहे. सध्या याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, कारण व्हायरस म्यूटेट झाला आहे व लोकांमध्ये या नव्या स्ट्रेनचा प्रतिकार करण्यासाठी इम्यूनिटी कमी झाली आहे.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, हा व्हायरस दरवर्षी बदलत असतो. H3N2 व्हायरस इन्फ्लूएंजा व्हायरस कुटूंबातील आहे, जो आपल्या काही उप-प्रकारात म्यूटेट होतो. या व्हायरसमुळे लोकांना रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, याचा अर्थ असा नाही की चिंतेचे काही कारण आहे.
Influenza virus H3N2: व्हायरसपासून कसा कराल बचाव?
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, दोन कारणांमुळे संक्रमण वाढत आहे. पहिले हवामानात झालेला बदल आणि दुसरे म्हणजे कोविडनंतर लोकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. यामुळे या व्हायरसपासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर राखा. त्यांनी सांगितले की, वयोवृद्ध आणि आधीपासूनच आजारी असलेले लोक इन्फ्लूएंजाची लस घेऊ शकतात.
डॉ. गुलेरिया यांनी सर्वांनी सल्ला दिला आहे की, होळी साजरी करा मात्र सतर्कता बाळगा. विशेष करून वृद्ध लोक आणि जे क्रॉनिक श्वसन रोग, हृदय व किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत.
Source;-wp news


