

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

आजरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रतिभाताई भिकाजी कांबळे(वय ५४ ) यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. येथील व्यंकटराव प्रशालेचे सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक भिकाजी कांबळे(बी के.) यांच्या त्या पत्नी होत. आजऱ्यातील सामाजिक चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांचा पश्चात दोन मुली, मुलगा, पती असा परिवार आहे. त्यांच्यावर मुळगाव सरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


किशोरीताई शुक्रवारी पेद्रेवाडीत…
कै.केदारी रेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईचे माजी नगरसेवक कै. केदारी बाळकृष्ण रेडेकर यांच्या २५वा स्मृतिदिन व कै. केदारी रेडेकर हायस्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कै. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी दिली.
सकाळी आठ वाजता प्रतिमापूजन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सौ. किशोरीताईंच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन करण्यात येईल. मुंबईचे माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते फार्मर्स पॅकेज पॉलिसी वाटप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास कै. केदारी रेडेकर यांच्या मित्र परिवारासह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, कै. केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र टोपले, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी बोलके, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही श्रीमती रेडेकर यांनी सांगितले.



जनता बँकेच्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई,
बापू टोपले उपाध्यक्ष
सभासद, हितचिंतक यांचे आभार : मुकुंददादा देसाई

नुकतीच जनता बँक आजरा या बँकेची २०२३ ते २०२८ ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध) झाली, बँकेच्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई यांची तर उपाध्यक्षपदी बापू टोपले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्याबद्दल सर्व सभासद, हितचिंतक व समाजातील विविध घटकांचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी जाहिर आभार मानले.
निवडीनंतर बोलताना चेअरमन देसाई म्हणाले,जनता बँक आजरा ही बँक सन १९६३ साली अल्पशः भागभांडवलवर स्थापन झाली. आजपर्यंत या बँकेची निवडणूक कधीच बिनविरोध झालेली नव्हती. गेल्या १० वर्षात सभासदांनी व संचालक मंडळनी विश्वासाने आपल्यावर बँकेच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली. त्या विश्वासाला सार्थ ठरवून बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक व सर्वांना विश्वासात घेवून केला. ज्यावेळी आपण बँकेचा पहिल्यांदा चेअरमन झालो त्यावेळी बँकेचे भागभांडवल केवळ रु. ९८ लाख, ठेवी रु. ७० कोटी व कर्ज रु. ५० कोटीची होती.
गेल्या १० वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय पाचपट वाढला असून आज बँकेचे भागभांडवल रु. १३ कोटी, ठेवी रु. ३१० कोटी व कर्ज रु. २१० कोटीची असून बँकेचा ढोबळ नफा रु. ६.५० कोटी असून बँकेने नेत्रदिपक कामगिरी करून रिझर्व बँकेचा FSWM क्रायटेरिया पूर्ण केला आहे. गेल्या १० वर्षामध्ये बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख बघून बँकींग फ्रंटीअर, बँको ब्ल्यु रिबन, बँक असोसिएशन यांचेकडून सलग १५ अॅवार्डस प्राप्त झालेले आहेत.
बँकेच्या एकूण १७ शाखा पैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. बँकेकडे सर्व प्रकारचे अद्यावत टेक्नॉलोजी उदा. स्वतःचे डी.सी व डी.आर सेंटर, मोबाईल बँकींग, आय. एम. पी. एस. गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रो एटीएम, आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी. इ. सुविधा आहेत.
बँकेने तरुण होतकरु व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळातर्फे व पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत दिल्या जाणार व्याज सवलत व सबसिडी कर्ज आज अखेर रु.२० कोटीची कर्ज आदा करुन कार्यक्षेत्रातील तरुण उद्योजकांना उभा करणेचे काम करत आहोत. इथुन पुढेही रिझर्व बँकेचे व सहकार खात्याचे नियमांच्या चौकटीच्या अधीन राहून कार्यक्षेत्रातील सर्व समाजातील उद्योजक, व्यावसायिक यांना सुलभ कर्ज देवून उभारी देणेचे काम यापुढेही करत राहू असेही बँकेचे चेअरमन देसाई म्हणाले.
बँकेने पुन्हा नवीन मुंबईसहित तीन शाखांचा प्रस्ताव रिझर्व बँकेकडे पाठविला असून मंजूरी मिळताच तिन्ही शाखा लवकरात लवकर चालू करणेचा मानस आहे असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन श्री. महादेव टोपले, बँकेचे जेष्ठ संचालक श्री. जयवंत शिंपी, संचालक श्री. रणजित देसाई, श्री. बाबाजी नाईक, श्री. शिवाजी पाटील, श्री. जयवंत कोडक, श्री. शशिकांत नार्वेकर, श्री. विक्रमसिंह देसाई, श्री. अमित सामंत, श्री. पांडुरंग तोरगले, श्री. महेश कांबळे, श्री संतोष पाटील, सौ. रेखा देसाई व सौ. नंदा केसरकर उपस्थित होते.






