

कै. केदारी रेडेकर हे लढवय्या कार्यकर्ते...
२५ व्या स्मृतिदिनानिमित्त पेद्रेवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतींचा जागर

कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे नाते बहीण- भावाचे आहे. कै. केदारी रेडेकर यांनी हे नाते जोपासण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यांनी शिवसेनेशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. रेडेकर परिवाराने मिळवलेली पुण्याई पुढे समर्थपणे वाहून नेण्याचे काम केले पाहिजे. श्रीमती अंजनाताई रेडकर यांनी कै. केदारी रेडेकर यांच्या पश्चात सुरू केलेल्या विकास कामाच्या यज्ञात यापुढेही कामाची आहुती पडत राहिली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या माजी महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी केले. कै. केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडीचा रौप्यमहोत्सव व कै. केदारी रेडेकर यांचा २५ वा स्मृतिदिन मुंबईचे माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
सौ. पेडणेकर पुढे म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत पक्षाला योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्मृती निश्चितच जागवल्या जातात. केदारी यांची हयात शिवसेनेत गेली असल्यामुळे त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर यांनीही कोणताही राजकीय निर्णय घेताना तो विचार करून घ्यावा असा सल्लाही दिला.
स्वागतपर भाषणात गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी कै. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या विविध संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात मच्छिंद्र कचरे म्हणाले, शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले कै. केदारी रेडेकर हे लढवय्या कार्यकर्ते होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून देखील परिचित होते. अत्यंत अल्प अशा कारकीर्दीत त्यांनी आपली सामाजिक व राजकीय वाटचाल वेगाने केली. शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्र जगला तर देश जगेल याचा विसर कदापिही पडू देऊ नये.
स्थानिक नागरिक व प्रशालीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमांमध्ये स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्रीमती अंजना रेडेकर यांच्या पुढाकारातून फार्मर्स पॅकेज विमा पॉलिसिंचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी विजय कदम, राम साळगावकर,गोपाळ खाडे, शशिकांत पाटील -चुयेकर यांचीही भाषणे झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम.के. देसाई, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव बोलके, कॉम्रेड संपत देसाई, अल्बर्ट डिसोझा, नामदेवराव नार्वेकर, युवराज पोवार, राजेंद्र सावंत, अनिल फडके, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, सुधीर कुंभार, मारुती मोरे, सुभाष देसाई, भिवा जाधव, अनिल कातकर, स्मिता चव्हाण, पांडुरंग ढवळे, विश्वनाथ देऊसकर, सुनील चव्हाण, सविता जाधव, सुनील डोंगरे यांच्यासह मुंबई येथील शिवसेना शाखांचे (ठाकरे गट) पदाधिकारी, कै. केदारी रेडेकर संस्था समूहातील अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेद्रेवाडी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
स्व.बाळासाहेब व नारायण राणेंनी सहकार्य केले…
कै. केदारी यांच्या पश्चात रेडेकर कुटुंबीयांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संस्था उभारणीसाठी मोठे सहकार्य केले अशी प्रांजळ कबुली किशोरीताईंनी यावेळी दिली. तर मनसेचे राज ठाकरे व कै. केदारी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आज केदारी असते तर ते निश्चितच मनसेमध्ये असते असे जाहीररित्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र कचरे यांनी सांगितले.



धक्कादायक..
चिमणे येथे आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू

चिमणे (ता. आजरा) येथे शेतातील गवताचा बांध जाळताना आगीत होरपळून शेतकरी विठोबा भीमा नादवडेकर (वय ८०) यांचा मृत्यू झाला. दुपारी एकला ‘रांग’ नावाच्या शेतात ही घटना घडली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नादवडेकर सकाळी दहाला शेताकडे गेले होते. शेतातील पालापाचोळा गोळा करुन त्यांनी बांधाजवळ पेटविला. बांधाला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात रौद्ररूप धारण केले. नादवडेकर यांच्या डोळ्यांवर चष्मा असल्याने व झालेल्या धुरामुळे त्यांना परिस्थितीचा अंदाज आला नाही. आगीने त्यांना घेरले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणी नसल्याने मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यातच त्यांचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने एक ग्रामस्थ कोणी आग लावली हे पाहण्यासाठी आले असता त्यांना नादवडेकर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मागे मुलगी व जावई आहे.



गिरणी कामगारांची आजरा तहसीलवर धडक…
गिरणीच्या ठिकाणीच घरे मिळण्यावर ठाम

सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यातील गिरणी कामगारांनी मुंबईतच घर देऊन कामगारांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी मोर्चाने आजरा तहसीलवर धडक दिली. गिरणी कामगार पुनर्वसनाचा प्रश्न हा आर्थिक किंवा तांत्रिक प्रश्न नसून सरकारच्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे असे स्पष्ट दिसत आहे. सध्याचे राज्यातील सरकार हे गरिबांचे सरकार आहे असे वारंवार सांगितले जाते. नोकरी गेल्यामुळे उध्वस्त झालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. कॉ. शांताराम पाटील, नारायण भडांगे नारायण राणे, तानाजी गडकरी, निवृत्ती सुतार, गोपाळ रेडेकर, आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाचे आजरा तहसील समोर सभेत रूपांतर झाले.
यावेळी बोलताना कॉ. शांताराम पाटील म्हणाले,एसटीसी च्या गिरण्या बंद झाल्या. जमीन कायद्याप्रमाणे गिरणी कामगारांना घरासाठी उपलब्ध करून देण्याऐवजी ३० वर्षाच्या लिजने दिली गेली आहे हे सर्वथा गैर आहे. ती जमीन कामगारांच्या घरासाठी तातडीने ताब्यात घेऊन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गेली तीस ते पस्तीस वर्षे कामगारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. शासनाने या प्रश्नांची गांभीर्याने सोडवणे केली पाहिजे.
नारायण भडांगे म्हणाले, राष्ट्रीय मिल मजूर संघाने गिरणी कामगारांचे वाटोळे केले. एक एक करत गिरणी कामगारांना देशोधडीला लावले. मीलच्या जागीच घरे मिळावी यासाठी आपण आग्रही आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक लाख ४८ हजार कामगारांच्या घराच्या प्रस्तावावर सह्या केल्या. १०५ जणांनी गिरणी कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी बलिदान दिले आहे. गिरणी कामगार अजूनही जिवंत आहे हे शासनाला दाखवून देण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय घाडगे, गोपाळ रेडेकर, निवृत्ती नुसार आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आंदोलन प्रसंगी तानाजी पाटील, दादासाहेब मोकाशी, ज्ञानबा धडाम, निलेश सुतार, आबा पाटील तानाजी गडकरी यांच्यासह तालुक्यातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





