



आजऱ्यात आजीच्या समोरच नातीचा विहिरीत पडून मृत्यू

आजरा शहरातील भारत नगर मध्ये रहाणाऱ्या कार्तिकी सचिन सुतार( वय वर्ष १४) या शालेय विद्यार्थिनीचा माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात दिलेली आहे .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कार्तिकी ही आपल्या आजीबरोबर (चांगुणा सुतार) शेतामध्ये विहिरीतील पाणी ओढत असताना झाडाच्या शेजारी बांधलेल्या म्हशीचा धक्का लागून कार्तिकी पाण्यात पडली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोरच झाली यावेळी आजीने आरडाओरड सुरू केला पण शेतामध्ये कोणी उपस्थित नव्हते. यावेळी झालेला गोंधळ पाहून काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी पाण्यातला मृतदेह बाहेर काढून याबाबत पोलिसांना कळविण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
कार्तिकी ही येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिकत होती.



गायन, वादन क्षेत्रातील आजरेकर एकाच मंचावर
विवेकानंद पतसंस्थतर्फे बुधवारी कार्यक्रम

गायन आणि वादन क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱे आजरेकर कलाकार बुधवार दि. १५ मार्च रोजी आजरा येथे पहिल्यांदाच एकाच मंचावर येत आहेत. येथील सुवर्णमहोत्सवी स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित ‘आपली माणसं,आपली गाणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा योग साधण्यात येत आहे. चेअरमन जनार्दन टोपले यांनी ही माहिती दिली.
टोपले म्हणाले,साहित्य,कला, क्रीडा, नाट्य, सहकाराची उज्ज्वल अशी आजऱ्याची परंपरा आहे. याच पध्दतीने गायन आणि वादन क्षेत्रातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक कलाकार कार्यरत आहेत. या सर्वांच्या सामूहिक कामगिरीचे दर्शन आजरेकरांना घडवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजऱ्याच्या नव्या पीढीन यातून प्रेरणा घ्यावी यासाठीच सुवर्ण महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम घेतला आहे. बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता बाजार मैदानात हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमामध्ये संगीत संयोजक सुनील सुतार, गायक राजू केळकर, प्रसिध्द हार्मोनियम वादक चिन्मय सुहास कोल्हटकर, गायक रघुनाथ बापट, गायिका शुभदा सबनीस/ भोगले, अजित तोडकर, केदार नितीन सोहनी, अभिषेक किशोर देशपांडे, अर्णव मच्छिंद्र बुवा, वादक डॉ. ओंकार गिरी, कृष्णा व्हरांबळे, रघुनंदन ऐतावडेकर, निवेदक मनिष आपटे हे सहभागी होणार आहे. समीर देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारणार आहे.
संस्थेचे व्हा. चेअरमन दयानंद भुसारी, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांच्यासह सर्व संचालक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद पतसंस्थेने आजऱ्यातील पहिले लक्ष्मीदेवी उद्यान उभारून ते गेल्याचवर्षी लोकार्पित केले होते. त्यानंतर या सर्व कलाकारांना पहिल्यांदा आजऱ्यामध्ये एकत्र आणण्याचे काम पतसंस्थेने केले आहे.



