mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


वाटंगी येथून तरुणी बेपत्ता

           आजरा : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा

      वाटंगी ता. आजरा येथून तीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित मुलीच्या वडिलांनी आजरा पोलिसांत दिली आहे.

       याबाबत अधिक माहिती की, लोअर परेल , मुंबई येथे रहाणारे संबंधित कुटुंबीय गावी वाटंगी येथे आले होते. दरम्यान या कुटुंबातील तरुणी १० जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेली ती अद्याप परतलेली नाही.

       याबाबतची वर्दी मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली असून आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नो चर्चा …
 टोल नाक्यावर थेट मोर्चा…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर-बांदा महामार्गाचे ठेकेदार, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सोबत यापूर्वी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी आठ दिवसात आजरा तालुकावासीयांना टोलमुक्ती संदर्भातील मागण्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कळवण्यात येईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र या बैठकीनंतर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास संबंधितांनी संपर्क साधून पुढे काय झाले याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

     याचाच अर्थ तालुका वासियांना सर्व मंडळी हलक्यात घेत आहेत त्यामुळे यापुढे कोणतीही चर्चा न करता २४ जून रोजी टोल नाक्यावर प्रचंड संख्येने सर्वपक्षीय मोर्चाने जाण्याचा निर्धार टोलमुक्त संघर्ष समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.

       आता यापुढे कोणतीही चर्चा करावयाची झाल्यास ती चर्चा मोर्चादिवशी थेट टोलनाक्यावरच केली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम बामणे, कॉ. संपत देसाई, प्रभाकर कोरवी, रणजीत सरदेसाई,विलास नाईक, बंडोपंत चव्हाण,ज्योतीप्रसाद सावंत, तानाजी देसाई आदींनी भाग घेतला.

     बैठकीस काशिनाथ मोरे, जोतिबा चाळके,, सलीम लतीफ ,जोतिबा आजगेकर, आबासाहेब पाटील, शंकरराव शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य घरेलु कामगारांच्या घोषित योजनांची अंमलबजावणी करा- संग्राम सावंत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       राज्यातील लाखो घरेलु कामगारांच्या  सामाजिक श्रमाला आणि श्रमिकाला सामाजिक न्याय, संरक्षण आणि आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्ती वेतन या सारख्या सामाजिक सुरक्षा आणि संरक्षण देण्याच्या अंगाने महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्या अंतर्गत सुधारणा व सद्य स्थितीत घोषित योजनांची अंमलबजावणी या बाबत राज्य शासनाकडे निवेदन केलेले आहे.परंतु अमंलबजावणी झालेली नाही. ती त्वरित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन समन्वयक संग्राम सावंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

      महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन आणि नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट हे राज्यातील घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावे म्हणून अथक लढा देत आहे, ‘कोविड १९ च्या महामारीच्या काळात घरेलू कामगारांवर खूप मोठे आर्थिक आरिष्ट्य ओढवलेले होते. घरेलू कामगारांना त्यांचा काम करण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. कोविड सारख्या या महामारीने कामगारांना सामाजिक सुरक्षेचे महत्व, त्यांचे श्रमिक म्हणून हक्क काय याची चांगलीच जाणीव करून दिली. समाजाला उभे करतांना आम्ही दिलेल्या बहुपेढी योगदानाचा विचार करता पुढील मागण्या करण्यात आल्या..

१) सद्य स्थितीत बंद असलेली घरेलु कामगार कल्याण मंडळात नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी.

२) मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक १८ फेब्रुवारी, २०२१ च्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय घरेलु कामगार मंडळाची स्थापना करावी

३) घरेलु कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टीने सक्षम व निरंतर रहावे या हेतूने शासनाकडे विचारधिन व मंजूरी साठी मंडळाने पाठवलेला सेस चा प्रस्ताव ठोस स्वरुपात व कायदेशीर तरतुदींनुसार राज्य शासनासमोर सादर करावा.

४) २००८ च्या कल्याणकारी काय‌द्याला कामगार हक्क आधारित कायद्यांचे स्वरूप देण्याच्या अंगाने योग्य त्या तरतुदी वा सुधारणा करण्यात याव्यात, अथवा मंचा तर्फे घरेलू कामगारांना कामगार काय‌द्यांतर्गत कामगार कायदे लागू होतील असा एक काय‌द्याचा मसुदा तयार केला आहे तो मसुदा आपल्या कार्य कक्षेत राज्य शासना समोर मंजुरी साठी पाठवावा.

५) एक वेळ नोंदीत, ६० वर्षांवरील सर्व घरकामगार महीलांना मंडळाची पैन्शन सुरु करावी. व घरेलु कामगार कल्याण मंडळातील नोंदणीची वयोमर्यादा ही वय वर्षे १८ ते ६५ एवढी करण्याची तरतुद करावी.

६) मंडळा मार्फत होणारी नोंदणी प्रक्रिया ही विभागीय कामगार आयुक्त कार्यालयांच्या कक्षेत न ठेवता ती स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायत स्तरावर त्या संस्थांना अधिकार देवून सुरू करावी सोबतच राज्य वा जिल्हा स्तरावर होणारे देश व राज्य पातळीवरील घरकामागारांचे स्थलांतर नमुद होण्यासाठी स्वतंत्र जबाबदारी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावी.

७) किमान वेतन, घरकामात घातलेल्या काही वर्षांच्या सेवेची आर्थिक रुपात भरपाई, बोनस व महागाई नुसार वेतन वाढ तसेच अतिरिक्त श्रमाचा योग्य मोबदला व रोजगाराच्या सेवा शर्ती या अंतर्गत निर्माण होणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी मंडळ कायद्या अंतर्गत तक्रार निवारण समिती ची निर्मिती केली जावी.

८) मंडळाला कामगार राज्य विमा योजना लागू करावी.

      यावेळी संग्राम सावंत, लक्ष्मी कांबळे, विद्या शिंदे,जयश्री कांबळे रेश्मा कांबळे, मंगल चौगुले,पौर्णिमा जाधव उपस्थित होत्या.


 

संबंधित पोस्ट

तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणाची आत्महत्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!