सोमवार १६ जून २०२५

आजऱ्यात मुसळधार
पावसाला सुट्टी नाही…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून रविवारी दिवसभर सुरू असणारा पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता. अखंडपणे सुरू असणाऱ्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आजपासून शाळा सुरू होत असल्याने शाळांबरोबर पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे.
हळूहळू पावसाचा जोर वाढू लागल्याने पावसाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे.

अन्याय निवारण समिती नगरपंचायतीच्या नगराध्यक्षसह सर्व जागा लढवणार : बैठकीत निर्णय

आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षसह १७ जागा लढवणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी दिली.
काल रविवारी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत आगामी आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५ संदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. अन्याय निवारण समितीच्या वतीने नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक पदांवर उमेदवार उभे करण्याचा एकमताने निर्णय घेतला.
जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी, आणि विकासाचा पर्याय ठरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून जनतेच्या हितासाठी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प समितीने या वेळी व्यक्त केला.या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जि.प. मतदारसंघ रद्द
आज नगरपंचायतीमध्ये सर्वपक्षीय बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद १ व पंचायत समिती २ जागा कमी केल्याने तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याप्रकरणी तालुकावासीय आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या पूर्ववत करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.शासनाचा हा निर्णय आजरा तालुक्यासाठी अन्यायकारक आहे.शासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात आज ( सोमवार) सकाळी ११ वाजता आजरा नगरपंचायत सभागृहात सर्व राजकीय पक्षीय नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे
या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अण्णा-भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले आहे.

मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज : सौ.भारती डेळेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते.
सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे बाची व देसाई हॉस्पिटल कार्डियाक केयर सेंटर गडहिंग्लज यांच्या सहकार्यातून व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मौजे सोहाळे येथील सुप्रभात वाचनालय सोहाळे च्या इमारती मध्ये केले. या शिबिरात मौ. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरामध्ये मोफत हृदयरोग, मूत्ररोग व नेत्ररोग निदान करून रक्त व लघवी तपासणी व ecg मोफत करण्यात आली. तसेच शिबिराचे औचित्य साधून ग्रामस्थांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चे वाटप करणेत आले.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सोहाळेच्या वतीने सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी यावेळी केले. मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी संपन्न पार पाडणेकामी डॉ. चंद्रशेखर देसाई व डॉ. रोहित देसाई, देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी सोहाळे गावचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ, देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज कडील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ व सुप्रभात वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगारांनी दलालांपासून सावध रहावे… सर्व श्रमिक संघटनेचे आवाहन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सद्यस्थिती मध्ये गिरणी कामगारांनी दलालांपासून सावध रहावे, मुंबईमध्ये सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा २००५ पासून सुरू झालेला लढा ग्रामीण भागात २००८ मध्ये सुरू झाला.
सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील गिरणी कामगारांना जागृत करण्यात आले, चळवळीच्या दबावामुळे २०१० व २०११साली गिरणी कामगारांचे माहिती संकलन करून, फॉर्म भरण्यासाठी सरकारला भाग पाडले. संघटनेच्या रेट्यामुळे, तत्कालीन कॉग्रेस सरकारने मुंबई मध्ये घरे बांधून, लॉटरी काढण्याचे काम सुरू केले.
पुढे २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांनी आजपर्यंत एकही घर मुंबई मध्ये बांधलेले नाही. उलट गिरणी कामगारांना कोनगाव, पनवेल या ठिकाणीची एम एम आर डी ची घरे, मुंबई बाहेर देण्याचे षडयंत्र या सरकारने रचले असून, आता तर मुंबई पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी, सेलू येथील घरे गिरणी कामगारांच्या माथी मारण्यासाठी दलालांमार्फत षडयंत्र रचले जात असून, गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घालविण्याचे पाप महायुती सरकार करत आहे.
अशा वेळी सर्व श्रमिक संघटना व इतर संघटनाच्या वतीने गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मोफत घर हा लढा अधिक तीव्र ताकदीने उभा करण्याचा प्रयत्न केला जात असताना, काही दलाल संघटना सरकारला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत, हा डाव हाणून पाडला पाहिजे. या विचाराने सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी मोठ्या ताकदीने जागरूकपणे संघर्षामध्ये उतरले पाहिजे, तसेच गिरणी कामगारांनी दलालांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष कॉ. शांताराम पाटील, नारायण भंडागे शिवाजी सांवत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.

चार सुत्री व श्री पध्दतीने भात पिक पद्धत महत्वाची : सुर्यकांत दोरुगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतीमध्ये अमुलाग्र बदल करुन शेतकऱ्याने विषमुक्त शेती करण्यासाठी सेंद्रीय शेती करण्यात यावी.आधुनिक तंत्र समजून घेऊन भात पिक कमी खर्चात जादा उत्पादन घेण्यासाठी चार सुत्री व श्री पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन शेती तज्ञ सुर्यकांत दोरुगडे यानी मलिग्रे येथील सभेत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विश्वास बुगडे होते.मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) कोल्हापूर याच्या वतीने खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
प्रास्ताविक अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.यावेळी पी. ए. माळी मंडळ कृषी अधिकारी यानी बदलते हवामान व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या संधर्भात मार्गदर्शन केले यावेळी योगेश जगताप सहाय्यक कृषी अधिकारी, तृप्ती पाटील कृषी विभाग,चाळू केंगारे उपसरपंच, शिवाजी भगुत्रे,बाबू बुगडे, परशराम बुगडे, शिवाजी ईक्के याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सुधाकर घोरपडे यानी मानले.

निधन वार्ता
हुसेन आगलावे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ज्येष्ठ किराणा माल व्यापारी श्री हुसैन अगलावे उर्फ चाचा यांचे ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते अमानुल्ला आगलावे यांचे ते वडील होत.


